साहेब... तुम्हीच सांगा कसं सावरायचं?

केंद्रीय पथक पाहणी
केंद्रीय पथक पाहणी

कऱ्हाड ः साहेब पुरानं आमच व्हत नव्हतं तवेढ सगळं गेलय. पीक तर सगळीच गेलीत. घरही पडताहेत. ओलीनं घरात राहताही येईना, आता तुम्हीच सांगा यातून सावरायच कसं? अशी आर्त साद पूरग्रस्त तांबवेतील पूरग्रस्तांनी गुरुवारी (ता. २९) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाला घालून तांबवे गाव पूर्णतः पूरग्रस्त जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी केली.  केंद्रीय पथकाने पूरग्रस्त तांबवे गावची पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकात चित्तरंजन दास, आर. पी. सिंग, व्ही. पी. राजवेदी, मिलिंद पाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर यांचा समावेश होता. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठले, शल्य चिकित्सक अमोल गडीकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार आदी उपस्थित होते. समितीने पहिल्यांदा गावातील पुराच्या पाण्यात राहिलेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी पूर्णतः वाया गेलेले सोयाबीन पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पुढे येऊन पुरात बुडालेल्या उसाची पाहणी केली. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी पिकांची माहिती दिली. त्यानंतर सदस्यांनी उसासारखी नगदी पिके न घेता भाताचे पीक घेण्याचा सल्ला दिला. या वेळी शेतकऱ्यांनी समितीच्या सदस्यांना ऊस नाही घेतले तर आर्थिक भरपाई कशी होणार ? भातातून उसाएवढे उत्पन्न मिळत नाही, असे सांगून केंद्राकडून पीक नुकसानभरपाई द्या, अशी मागणी केली. त्यानंतर महापुरात ज्यांच्या घरात पाणी जाऊन पडझड झाली होती त्याची पाहणी करून त्या बाधित कुटुंबांशी चर्चा केली. सरपंच मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, शंकर पाटील यांनी गावातील महापुराच्या दरम्यानची माहिती दिली.  पावसातच केली पाहणी  केंद्रीय पथक गावात येण्यापूर्वीच काहीवेळ मुसळधार पाऊस पडू लागला. पथक गावातून बाहेर जाईपर्यंत पावसाचा जोर कायमच होता. त्यामुळे सदस्यांसह अधिकाऱ्यांनाही पावसात भिजतच गावची आणि पिकांची पाहणी करावी लागली. पावसाच्या उभ्या धारेत अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी चर्चेचा विषय ठरली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com