नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अर्ली बागा घेण्यात आघाडीवर आहेत. बागलाणचे नाव निर्यातीमुळे जगप्रसिद्ध झाले. नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षबागा वाचविणे अवघड झाल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, कृषी विभागाने बाराही महिने विमा कवच संरक्षणाची तरतूद करावी अशी मागणी आहे. - जिभाऊ चिंतामण कापडणीस, द्राक्ष उत्पादक, टेंभे खालचे, जि. नाशिक
पीक नुकसान
पीक नुकसान

नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे फळबागा, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आशा परिस्थितीत शासनाने सरसकट नुकसानीचे पंचनामे करून ''ओला दुष्काळ'' जाहीर करावा, अशी मागणी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली.  बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे येथे खासदार भामरे यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा संचालक द्राक्ष बागायतदार संघ (नाशिक) संचालक कृष्णा भामरे यांनी तालुक्यातील नुकसानीबाबत कैफियत मांडली.  या वेळी खासदार भामरे यांनी नुकसानबाबत माहिती जाणून घेतली. यंदा पावसाळा उशिरा आल्याने त्यामुळे सुरवातीला पडलेला दुष्काळ व नंतर दोन महिन्यांच्या अतिवृष्टी होऊन द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, भाजीपाला पिकांसह मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग पिके खराब झाली आहेत. खरीप कांदा, उन्हाळी लागवडीचे टाकण्यात आलेले कांद्याचे बियाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे द्राक्षाच्या घडांची कुज, भुरी, डाउनी, घड जिरणे इत्यादी प्रकार होऊन बागा कोलमडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका उत्पादनावरही परिणाम झाला आहे. सध्या अनेक ठिकाणी बाजरी व इतर पिके कापणी सुरू असल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह पशुधन इत्यादी नदीनाल्यात वाहून शेती अवजारांसह घरांची पडझड झाली. या सर्व गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन सरसकट नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देऊन बागलाण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कृष्णा भामरे, खंडेराव शेवाळे, जिभाऊ कापडणीस ,युवराज कापडणीस, सुनील भामरे, भाऊसाहेब भामरे, बापू अहिरे, दौलत बोरसे, शांताराम जाधव, शरद शेवाळे, प्रकाश भामरे, आनंदा गवळी, नानाजी जाधव, यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com