वाघूरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

वाघूरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण
वाघूरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

नशिराबाद, जि. जळगाव  : पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी दरवर्षीप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने नंतर घूमजाव करीत बदलला आहे. यामुळे कापूस लागवडीसाठी पाटातून पाणी मिळणे अशक्‍य झाले असून, पाटबंधारे विभागाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन अहवाल द्यावा, अशी अशी मागणी लाभधारक सिंचन समितीतर्फे वाघूर धरण विभागाकडे करण्यात आली आहे, तसेच पाटचारीत कापूस लागवडीसंबंधी पाणी न सोडल्यास १३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लाभधारक सिंचन समितीने दिला आहे.  सुरवातीला वाघूर धरणातून आवर्तनाची मागणी केली असता पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचे वाघूर धरण विभागातर्फे सांगण्यात आले. याच मागणीसाठी २० मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली होती. त्यांनी वाघूर धरण विभागाकडून पाणीसाठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे सांगितले होते; परंतु पाणी सोडण्याचा ठोस निर्णयच घेतलेला नाही, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

अहवालाचे गौडबंगाल  २७ मेस समिती सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, शेतीसाठी पाणी सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ३१ मे अगोदर कापूस लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे कृषी अधिकाऱ्यांचे मत असल्याने मे ऐवजी १ ते ७ जूनदरम्यान आवर्तन सोडू, असे सांगितले. दरम्यान, समितीने पुन्हा ३ जूनला आवर्तन सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, वाघूर धरण विभागाकडून पाणी सोडणे शक्‍य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे पाटचारीत पाणीच सोडलेले नसल्याचे शेतकरी म्हणाले. 

वाघूरच्या पाणीसाठ्याची स्थिती  वाघुर धरणातील सद्यःस्थितीत जिवंत पाणीसाठा १२०० दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी सिंचनासाठी फक्त १०० ते १५० दलघमी इतके पाणी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घ्यावा, असे निवेदन लाभधारक सिंचन समितीने दिले आहे. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, मिलिंद चौधरी, किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, आदींची स्वाक्षरी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com