निंबोळी अर्काच्या फवारणी मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

नागपूर विभागात कृषी विभागाच्या मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
नागपूर विभागात कृषी विभागाच्या मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

नागपूर ः कीडनिवारणासाठी जहाल औषधांच्या वापरामुळे होणारे मृत्यूवर नियंत्रणासाठी निंबोळी अर्काच्या फवारणीवर प्रोत्साहन देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नागपूर विभागात हाती घेण्यात आला आहे. कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला विभागातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही वाढता प्रतिसाद मिळत आहे.  राज्यात दोन वर्षांपूर्वी कपाशीवरील कीडरोग नियंत्रणाचे प्रयत्नात २२ शेतकरी, शेतमजूरांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यासोबतच मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर बाधित झाले होते. यातील शेकडो मजूर एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील होते. नागपूर, वर्धा, अमरावती जिल्हयातही फवारणीमुळे विषबाधा आणि मृत्यूचे प्रकार घडले. याची दखल घेत नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी या खरीप हंगामापासून पहिली फवारणी निंबोळी अर्काची ही मोहिम व्यापक स्तरावर हाती घेतली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी निंबोळी गोळी करावी, असे अपेक्षित आहे. निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. या फवारणीमुळे किडींचे अंडी घालण्याचे काम थांबेल आणि पुढील प्रादुर्भाव रोखणे शक्‍य होईल, असा विश्‍वास कृषी विभागाला आहे.  या मोहिमेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याकरीता सहा जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देखील उद्दिष्ट देण्यात आले आहे. एवढ्यवरच न थांबता शेतीशाळांमधून निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धती आणि वापर या विषयी शास्त्रोक्‍त माहिती देण्याचे कामही होत आहे. शेतकऱ्यांना निंबोळीपासून निंबोळी पावडर तयार करून देण्याकरिता गोंडखैरी येथील कृषी विभागाच्या फार्मवर पल्वलायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आमदार सुनील केदार यांनी जिल्हा नियोजनामधून याकरिता निधी उपलब्ध करून दिला. पिकावर फवारणीच्या आदल्या दिवशीच शेतकऱ्यांनी पावडर तयार करून त्याचा वापर केल्यास परिणाम साधता येणार आहे. त्यामुळे आधीपासूनच पावडर करून ठेवू नये, असे आवाहन विभागीय कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे यांनी केले आहे.

असे आहे उद्दिष्ट   नागपूर ः २०० मेट्रिक टन   वर्धा ः ५००   भंडारा ः ५०   गोंदिया ः ५००   अचंद्रपूर ः ४००   गडचिरोली ः १००

सेंद्रिय शेतमाल उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, त्यासोबतच अतिजहाल कीडनाशकाचा वापर कमी व्हावा याकरिता निंबोळी गोळा करण्याच्या मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शेतकऱ्यांचा देखील प्रतिसाद मिळत आहे. - रवींद्र भोसले,  विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com