agriculture news in Marathi,Farmers says,dont dismantle APMCs suddenly, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका: शेतकरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

‘ई-नाम’चे व्यवहार शेतकऱ्यांसाठी पारदर्शी आहेत. पण, बाजार समित्या बरखास्त करून सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना त्याची हाताळणी करता येईल का, याची शंका आहे. शिवाय, अनेकदा गरजेनुसार शेतकरी व्यापाऱ्यांकडून आगाऊ पैसे घेतो, यामध्ये हा लाभ त्याला घेता येणार नाही. तसेच ‘ई-नाम’च्या व्यवहाराबाबत मुळात शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही. त्यामुळे लगेच सगळे व्यवहार ‘ई-नाम’वर घेणे शक्‍य होईल, असे वाटत नाही. याबाबत शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच निर्णय व्हावा.
- सचिन भोसले-गवळी, शेतकरी, विरवडे (ब्रु), ता. मोहोळ, जि. सोलापूर.

पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या बरखास्त करून ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, ‘‘सध्याच्या ‘ई-नाम’ प्लॅटफॉर्ममध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींमुळे सध्या ‘ई-नाम’मध्ये नाममात्र व्यवहार होतात. सर्व व्यवहार या प्लॅटफॉर्मवर आणल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे बाजार समित्या एकदम बरखास्त करू नये. टप्प्याटप्प्याने शेतमाल व्यवहार वाढवावेत,’’ असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर, ‘‘बजार समित्या बरखास्त करू नये. यामुळे शेतमाल बाजारावरील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व संपुष्टात येऊन पिळवणूक वाढेल. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होणार नाही. हमीभावाचे संरक्षण ‘ई-नाम’मध्ये सरकार कसे देणार? व्यापाऱ्यांची मोनोपॉली वाढून बाजार त्यांच्याच हातात जाईल,’’ अशा प्रतिक्रियाही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

‘ई-नाम’बाबत शेतकरी म्हणतात...

  • अनेक त्रुटी असल्याने व्यवहारात अडचणी येतील
  • सध्या नगण्य व्यवहार होत असताना आग्रह का?
  • टप्प्याटप्प्याने व्यवहार प्लॅटफाॅर्मवर आणावेत
  • शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी
  • शेतकऱ्यांना व्यवहाराबाबत प्रशिक्षण द्यावे
  • बाजार समितीप्रमाणे पेमेंटचे संरक्षण मिळावे
  • शेतकऱ्यांना अॅडव्हान्स मिळण्याची व्यवस्था आहे का?
  • शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही याची शाश्वती नाही

प्रतिक्रिया
बाजार समित्या बरखास्त केल्या तर शेतकरी उद्‌ध्वस्त होईल. बाजार समितीत दलालाच्या माध्यमातून खरेदी-विक्री होत असते. या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे काम बाजार समित्या करीत असतात. हे नियंत्रण नष्ट झाले, तर दलाल तसेच मोठे व्यापारी मनमानी करतील. या मनमानीमुळे शेतमालाची नुसती लूट होईल. 
- मनोहर साळुंखे, कृषिभूषण शेतकरी, नागठाणे, ता. जि. सातारा. 

‘ई-नाम’ प्रक्रिया आमच्याकडे कुठेही अजून प्रभावीपणे राबविली जात नाही. त्यात त्रुटी आहेत. अशा परिस्थितीत बाजार समित्या बंद केल्यास शेतकऱ्यांनी जायचे कुठे, असा प्रश्‍न आहे. यापेक्षा शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी समित्यांनाच कसे प्रवृत्त करता येईल, हे पाहावे.
- तानाजी पाटील, राधानगरी, जि. कोल्हापूर.

आपल्या बाजार समितीची प्रगती झाली नाही. त्यातच ‘ई-नाम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फायदेशीर ठरणार नाही. मुळात ही प्रणाली मोठ्या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार समिती सक्षम केल्या पाहिजेत. 
- एन. बी. म्हेत्रे, बेदाणा उत्पादक शेतकरी, सांगली. 

बाजार समित्यांवर बहुतांशी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात. बाजार समित्या बंद केल्या तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने जो काही निर्णय घेतला आहे, तो विचारपूर्वक घ्यावा. 
- रघुनाथ शिंदे, शेतकरी, खैरेनगर, ता. शिरूर, जि. पुणे.

व्यवस्था बंद करून उपयोग नाही. मात्र, या व्यवस्थेवर शेतकरी हित जपण्यासाठीची बंधन कडक हवी. बाजार समित्या बरखास्त झाल्या तर खासगी खरेदीदारांची मनमानी वाढेल, त्यामुळे आमचं हित जपलं जाईलच असे नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आमचं हित कस प्रामाणिकपणे जपलं ते पहा. व्यापाऱ्यांची लिलावात स्पर्धा वाढवा, हमी दर खरेदीच्या खरेदीच्या किचकट प्रक्रिया सुधारा. 
- संदीप गवळी, शेतकरी, माळीवाडगाव जि. औरंगाबाद. 

शेतकऱ्यांची थेट प्रतिनिधित्व असणारी व्यवस्था मोडकळीस आणण्याचा हा डाव आहे. शेतमाल विक्री यंत्रणा बरखास्तीचा निर्णय झाल्यास भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांच्या हाती जाईल. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. नाहीतर शेतकऱ्यांच्या हक्काची विक्री व्यवस्था अडचणीत येईल. निर्णय घ्या मात्र शेतकऱ्याच्या हिताचा घ्या.
- शंकर दरेकर, शेतकरी, विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक. 

बाजार समित्या बंद झाल्या तर शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक अडचणीचे होईल. आज बाजार समितीत माल नेल्यावर पैशांची हमी असते. बाजार समिती बंद झाली तर काय सक्षम पर्याय असेल हे कळत नाही. बाजार समित्या बंद झाल्यास व्यापाऱ्यांची मनमानी वाढेल. याचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसेल. 
- अनुप अशोकराव साबळे,  शेतकरी, तरोडा ता. अकोट, जि. अकोल. 

बाजार समित्या नसतील तर शेतकऱ्यांनी त्यांचा माल कोठे विकायचा हा प्रश्न निर्माण होईल.  शेतकऱ्यांच्या मालाला उठाव राहणार नाही. व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने खरेदी होईल. बाजार समितीमध्ये माल विकला तर पैसे मिळण्यासाठी सभापती, संचालक मंडळ, प्रशासन जबाबदारी घेते. मात्र, बाजार समित्या बरखास्त झाल्या तर ही जबाबदारी कोण घेणार, या निर्णयाने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढतील. 
- प्रल्हाद वरे, शेतकरी, बारामती, जि. पुणे. 

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळावा यासाठी बाजार समित्या काम करतात. आता बाजार समित्या जर बरखास्त केल्या तर शेतकऱ्यांना एकत्रित करून न्याय कसा देणार? त्यांच्या शेतमालाला भाव कसा देणार? त्यामुळे बाजार समित्या बरखास्त झाल्या तर त्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. बाजार समित्या बरखास्त करायच्या असतील तर त्या आधी सक्षम पर्याय देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
- नवनाथ आव्हाड, शेतकरी, पाथर्डी, जि. नगर. 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना कुठलाही उपयोग नाही. संचालक मंडळ आणि व्यापारी संगनमताने कमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतात. बाजार समितीतील राजकारणासाठी शेतकरी वेठीस धरले जातात. जागतिकीकरणात अनेक शेतकरी ई-व्यापाराने शेतमालाची विक्री करत आहेत. एरव्ही बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना कुठलाही आधार नाही. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत बाजार समित्या बरखास्त करण्याचा सरकार चा निर्णय योग्यच आहे. 
- गोपाळ पाटील इजळीकर, शेतकरी, जि. नांदेड. 

बाजार समिती या शेतकऱ्यांसाठी आधार ठरल्या आहेत. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण राहत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. ऑनलाइनच्या नावाखाली एक चांगली सिस्टिम संपविणे गैर आहे. ऑनलाइन व्यवहारात देखील अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. बाजार समित्या संपल्यास व्यापाऱ्यांचा एकाधिकार यामुळे वाढीस लागेल आणि फसवणूक दुप्पट होईल. 
- मनोज जवंजाळ, शेतकरी, काटोल, नागपूर.

बाजार समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केंद्राने निर्णय घेतलेल्या ई-नाम या प्रणालीचे स्वागत आहे. त्यात असलेल्या त्रुटींवर उपाययोजना केल्या पाहिजेत. ई-नाम पद्धतीचे कार्य कसे चालते याचे प्रबोधन गरजेचे आहे. यामुळे स्पर्धा होऊन शेतीमालाला अधिक दर मिळतील.
- संजय कोले, 
राज्य प्रमुख सहकार आघाडी, शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित.

उद्योग, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढले. त्या तुलनेत कृषी क्षेत्रातील वाढले नाही. कृषी वरील अवलंबित्व कमी झालेले नाही. बाजार समित्या बरखास्त केल्या तर खासगीकरण होईल शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही. केंद्रीकरण प्रवृत्ती वाढेल. शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घातक ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी हितावह नाही. 
डॉ. के. के. पाटील, अर्थतज्ज्ञ, परभणी.


इतर अॅग्रो विशेष
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...