द्राक्ष हंगामावर पावसाने फेरले ‘पाणी’

बागेला खर्च अधिक झालाआहे. आता बॅंकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न आहे. कृषी विभागाने बागेची परिस्थिती पाहून पंचनामे केले पाहिजेत. शासनानेदेखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक मदत केली पाहिजे. - मोहन पाटील, द्राक्ष उत्पादक, कवलापूर, ता.मिरज, जि. सांगली.
द्राक्षबाग नुकसान
द्राक्षबाग नुकसान

सांगली ः माझी २० गुंठे द्राक्ष शेती. सप्टेंबरमध्ये फळछाटणी घेतली होती. त्यानंतर पावसाला सुरवात झाली. कधी पडायचा तर कधी थांबायचा; पण शेतात पाणी साचलं होतं. त्यामुळे द्राक्षावर फवारणी करता आली नाही. डाऊनी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण द्राक्ष वेलीवरची पानं गळून पडली. द्राक्ष बागेसाठी बॅंकेकडून ६० हजार रुपयांचं कर्ज घेतलंय अन् ३० ते ४० हजार रुपये मित्र, पाहुण्यांकडून उसणावर घेतलं. पण यंदा उत्पन्न काहीच मिळणार नाही, त्यामुळे कसं जगायचं, अशी व्यथा कुमठे (ता. तासगाव) येथील विष्णू अडसुळे मांडत होते.  जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यासह सर्व भागात परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडवली. गेल्या तीन वर्षांपूर्वी दुष्काळी पट्ट्यात अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर दोन वर्षे द्राक्ष पट्ट्यात पाण्याची टंचाई होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे टॅंकरद्वारे बागा जगविल्या. मात्र, सध्या दुष्काळी पट्ट्यात याअगोदर असा पाऊस कधीच झाला नाही. पावसाने द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे खर्चातदेखील वाढ झाली आहे. द्राक्ष पट्ट्यात पाहावं तिकडं बागेत ट्रॅक्टरद्वारे फवारणी सुरू होती. कुणी सकाळी सहा वाजता फवारणी करून घरी परतत होते, तर पावसाचा अंदाज घेऊन बागेकडे फवारणीसाठी जात होते. काही ठिकाणी शेतात पाणी साचलं असल्याने एचटीपीने फवारणी केली जात होती. आज काय औषध मारलं याची विचारणा केली जात होती. असं औषध मारलं की, पावसाची रिपरिप सुरू व्हायची. त्यामुळे फवारलंलं औषध पाण्याबरोबर वाया जात असलेलं पाहून शेतकरी हतबल होत होते. एका दिवसात दोन ते तीन फवारणी केल्‍या जात होत्या; पण निर्सगाच्या पुढं ही औषधांचे काहीच चालत नव्हते.  यंदाची दिवाळी गोड नाही दिवाळी सण सुरू झाला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच सुरू झाली आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी ऐन दिवाळीत धडपड सुरू आहे. एका बाजूला शेतात तिप्पट खर्च झाल्याने दिवाळी कशी होणार, असादेखील प्रश्न पडला आहे.  कर्ज कशी फेडायची द्राक्षासाठी पीककर्ज घेतले आहे. पावसामुळे द्राक्ष बागा ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. बागेत तिप्पट खर्च झाला आहे. त्यामुळे काहीच उत्पन्न हाती लागणार नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न आ वासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे.  शेतीवर परिणाम

  • शेतात चिखल असल्याने मजूर कामासाठी येत नाहीत
  • वांझ आणि विरळणी थांबली
  • एका वर्षाचे उत्पन्न थांबले
  • पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
  • शासनाने आर्थिक मदत करावी
  • वाढ थांबली शेतात पाणी असल्याने जमिनीतून अन्नद्रव्ये  देता येत नसल्याने शेतकरी फवारणीमधून अन्नद्रव्ये देत आहेत. त्यामुळे मुळींची वाढ थांबली आहे. याचा परिणाम उत्पादन्नावर होणार आहे. दर्जेदार द्राक्षे मिळणार नाही. सध्या डाऊनीचा प्रादुर्भाव आहेच. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर त्याचा प्रभाव किती आहे, हे समोर येईल. आत्तापर्यंत दीड महिन्यात तिप्पट खर्च झाला असून खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळणार नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रतिक्रिया अगोदर पाणीटंचाईमुळे होती. पाण्यासाठी खर्च केला. आता पावसामुळे आमचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा दीड महिन्यात तिप्पट खर्चकरूनही अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे.   - नीशेल माळी, द्राक्ष उत्पादक, सावळज, ता. तासगाव, जि. सांगली.

    सकाळी पावडर फवारली आणि पाऊस झाला. ती पाण्याने धुवून गेली. आता दुसरे औषध फवारणीसाठी नियोजन केले आहे. मात्र, पाऊस पडत असल्याने फवारणी कशी करायची असा प्रश्न पडला आहे. - महादेव लाड, द्राक्ष उत्पादक, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com