हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास, ॲझोला, हायड्रोपोनिक्स तंत्र

hydrophonics technique
hydrophonics technique

हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून मुरघास, ॲझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्याच्या उत्पादनातून जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देता येतो. वाळलेल्या चाऱ्याची टंचाई निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून दूर करता येते. योग्य चारा व्यवस्थापनामुळे उपलब्ध स्रोतानुसार समतोल आहार तयार करून, उत्पादन खर्चात कपात करून नफा मिळविणे शक्य होते. प्रत्येक दुधाळ जनावराला रोज हिरवा चारा, वाळलेली वैरण, पशुखाद्य, खनिजमिश्रण, जीवनसत्वे योग्य प्रमाणात देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी चारा व्यवस्थापनावर विशेष भर आणि लक्ष दिले पाहिजे. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, उष्णता यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुरघास

  • मुरघास म्हणजे हिरव्या वैरणीतील पोषणमूल्य घटकांचे जतन करणे. उपलब्ध असणारी अतिरिक्त हिरवी वैरण योग्य वेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांश आणि ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून मुरघास टाकीत हवाबंद स्थितीत मुरण्यासाठी साठवली जाते. ही हिरवी वैरण साठवण्याच्या पद्धतीला मुरघास बनविणे म्हणतात.  
  • मुरघास बनविल्यामुळे हिरव्या वैरणीतील पोषक घटकांचे जतन करता येते, हिरव्या वैरणीच्या टंचाईच्या काळात पर्याय म्हणून मुरघास उपलब्ध करून देता येतो.
  • मुरघास तयार करण्याची प्रक्रिया

  • हिरवा चारा फुलोऱ्यात असताना कापावा.  
  • कुट्टी यंत्राच्या साहाय्याने हिरव्या चाऱ्याची कुट्टी करावी.  
  • सुरुवातीला चाऱ्याचा थर मुरघास टाकीत/प्लॅस्टिक पिशवीत/पिंपात अंथरावा, चाऱ्याच्या थरामध्ये हवा न राहण्यासाठी दाब द्यावा.  
  • चाऱ्याच्या थरावर जैविक संवर्धक शिंपडावे. जैविक संवर्धक हे पाणी, त्यामध्ये गूळ, मीठ व दह्याचे मिश्रण याचे एकजीवी द्रावण असते. अशा रीतीने पूर्ण टाकी भरून घ्यावी व प्रत्येक थरानंतर दाब द्यावा, जेणेकरून हवा आत राहणार नाही. मुरघास टाकी बंद करावी.  
  • मुरघास टाकीत चारा ४५ दिवस हवाबंद अवस्थेत ठेवावा. पिवळसर सोनेरी रंगाचा व आंबूस गोड वासाचा मुरघास तयार होतो.  
  • मुरघास चविष्ट असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
  • ॲझोला

  • अझोला लागवडीकरिता २ मीटर लांबी, २ मीटर रुंद व ०.२ मीटर खोलीचा खड्डा तयार करावा. या खड्ड्यावर सावली राहील याची काळजी घ्यावी.  
  • खड्ड्याच्या तळाला प्लॅस्टिक पेपर अंथरावा. या प्लॅस्टिक पेपरवर १५ किलो सुपीक माती पसरावी.  
  • १० लिटर पाण्यामध्ये २-३ किलो शेण आणि ३० ग्रॅम सुपर फोस्फेटचे मिश्रण करून खड्ड्यामध्ये ओतावे.  
  • खड्ड्यामध्ये १० सेंटिमीटर उंचीएवढे पाणी ओतून, पाण्यात १ किलो शुद्ध ॲझोला वनस्पती सोडावी.  
  • २१ दिवसानंतर खड्ड्यामध्ये पूर्ण वाढ झालेले ॲझोला शेवाळ मिळेल.  
  • दर ८ दिवसाआड १ किलो शेण व २० ग्रॅम सुपर फोस्फेटचे मिश्रण घालावे.  
  • महिन्यातून एकदा खड्ड्यातील ५ किलो माती काढून नवीन माती टाकावी.  
  • खड्ड्यातील २५ -३० टक्के पाणी १० दिवसातून एकदा बदलावे.  
  • अझोला वनस्पती हे पशुखाद्य म्हणून गाई, म्हशी, वराह, कुक्कुट व मत्स्यपालन व्यवसायात वापरता येते.
  • फायदे

  • ॲझोला हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे (२०-२५ टक्के).  
  • तंतुमय पदार्थ कमी असल्यामुळे पचायला हलका आहे.  
  • दुधाळ जनावरांमध्ये जवळपास १५-२० टक्के आंबवण खाद्याऐवजी अझोला वापरता येतो. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन २० टक्क्यांनी वाढते.
  • हायड्रोपोनिक्स

  • -मातीविना शेती अशी संकल्पना असलेल्या हायड्रोपोनिक्स तंत्राच्या माध्यमातून अंत्यत कमी पाण्यात चारा निर्मिती करता येते.  
  • मका पिकाची उगवण क्षमता ८० टक्के असल्यामुळे हायड्रोपोनिक्स पद्धतीत त्याचा वापर केला जातो.
  • हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा तयार करण्याची प्रक्रिया  

  • मका बियाणे २४ तास पाण्यात भिजवून जुटच्या बारदानामध्ये मोड येण्यासाठी २४ तास ठेवले जाते.  
  • मोड आलेले बियाणे प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये पसरवतात.  
  • हे ट्रे लोखंडी किवा बांबूच्या रॅकमध्ये ठेवून त्यावर स्प्रे पंप किवा ऑटोमेटिक फॉगरच्या साहय्याने विशिष्ट वेळाने सतत पोषकद्रव्य असलेले पाणी मारले जाते.  
  • अत्यंत कमी अर्थात नाममात्र पाणी त्याकरिता लागते. आठ दिवसांत मका चारा तयार होतो.
  • पाण्याची बचत होते.  
  • कमी जागा लागते.  
  • मनुष्यबळ कमी लागते.  
  • वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो.  
  • चारा वाढीचा कालावधी कमी होतो.
  • टीपः हायड्रोपोनिक्स तंत्राने तयार केलेल्या चाऱ्यामध्ये खनिजद्रव्यांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रोज जनावराला खनिजमिश्रण द्यावे. संपर्कः डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४ (पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com