परतीच्या पावसाने नांदेडला झोडपले

सोयाबीन नुकसान
सोयाबीन नुकसान

पुणे : राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, नरसी, मांजरम, खानापूर, शहापूर, पेठवडज या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नायगाव (खैरगाव) मंडळात सर्वाधिक १५१ मिलिमीटर पाऊस झाली. नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी वादळी पावसाने दणका दिला आहे.  नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कापणी केलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले. नायगावसह धर्माबाद, बिलोली, देगलूर या सीमावर्ती भागातील तालुक्यासह मुखेड, कंधार, लोहा, उमरी तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस झाला. कापणी केलेले सोयाबीन, बोंडातून फुटून वेचणीस आलेला कापूस, खोलगट भागातील जमिनीमध्ये पाणी साचल्याने कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा खरिपाच्या मळण्यांना फटका बसत आहे. दुपारनंतर येणाऱ्या पावसाने मळणीसाठी कापलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. पिकांची प्रत ढासळत असल्याने उत्पादनातही घट येत आहे, चांगली आणि सुपीक शेती असणाऱ्या या गावांमध्ये पुरात न सापडताही अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाणीच भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकाला मारक ठरले आहे.  पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून वादळी पावसाचा दणका सुरूच आहे. गुरुवारी (ता. १०) रात्री जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सतत पडणाऱ्या पावसाने काढणीस आलेल्या खरीप पिके, भाजीपाला, फुल पिकांचे नुकसान आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, शिरूरसह कोरडवाहू तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ होणार आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, सातारा, खटाव, माण या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. या तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे शेतातील जवळपास सर्व कामे ठप्प झाली आहेत. काढणीला आलेली पिके झडू लागली आहे. तसेच तणाचे प्रमाण वाढले असल्याने पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॅाबेरी लागवड पावसामुळे संथ झाली आहे. या पावसामुळे स्ट्रॅाबेरी हंगाम पुढे जाणार आहे. सुरू उसाची लागवड या पावसामुळे रखडली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळाचा तडाखा बसला आहे. काही घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. तर वादळामुळे भातशेती धोक्यात आली आहे. सतत पडणारा पाऊस आणि वादळी वारे यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. अनेक भागांतील भातशेती परिपक्व झाली आहे. या शेतीवर पाऊस पडत असल्यामुळे भातांच्या लोंबी जमिनीवर कोसळल्या आहेत. पावसामुळे भातकापणी करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिपक्व झालेल्या भातशेतीची येत्या चार-पाच दिवसांत भातकापणी झाली नाही, तर त्या भातांची लोंबी पूर्णतः जमिनीवर पडण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस पडत असून, रब्बी पेरणीला आता वेग येण्याची आशा निर्माण झाली आहे. खरिपात चांगल्या पावसाअभावी पिकावर परिणाम झाला आहे. पाणी साठवण झाली नसल्यामुळे रब्बीची पेरणी होईल की नाही याची अनेक भागांत चिंता लागली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : मुरूड ३२, पेण ४०, सुधागडपाली ६०, चिपळूण ३९, मंडणगड ५३. मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ४१, पन्हाळा ८०, शाहूवाडी ४१, दौंड ३१, लोणावळा कृषी ३०, वडगाव मावळ ३३, आटपाडी ३६, जत ४३, कसबेडिग्रज ४२, शिराळा ४०, तासगाव ४४, विटा ६३, जावळीमेढा ४८, कराड ३०, बार्शी ५८, करमाळा ३८, पंढरपूर ८३, सांगोला ३५. मराठवाडा : औसा ५४, जळकोट ३७, बिलोली ३५, देगलूर ५८, धर्माबाद ४०, कंधार ४५, मुखेड ५८, नायगाव खैरगाव १५१. उद्यापासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने चांगलाच जोर  धरला आहे. उद्यापासून (ता. १३) पावसाचा जोर ओसरणार आहे. आज (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   पावसाचा दणका

  •   अतिवृष्टीने खरीप पिके, भाजीपाला, फुलपिकांचे मोठे नुकसान
  •   परिपक्व खरीप पिकांची प्रत खालवणार
  •   महाबळेश्वर तालुक्यात स्ट्राॅबेरीला फटका
  •   वादळी पावसाने कोकणात भात शेती अडचणीत
  •   रब्बीच्या पेरण्यांना पाऊस लाभदायक
  •   पाण्यामुळे बटाटा आणि भुईमुग पीक संकटात
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com