नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस

निमोण, ता. चांदवड : निमोण परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शिवारात तुंबलेले पाणी. (छायाचित्र : भाऊसाहेब गोसावी)
निमोण, ता. चांदवड : निमोण परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शिवारात तुंबलेले पाणी. (छायाचित्र : भाऊसाहेब गोसावी)

नाशिक : सलग दुसऱ्या गुरुवारी (ता. २७) पावसाने जोर धरला होता. जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाचे दमदार आगमन झाले. नाशिक तालुक्यातील नानेगाव, भगूर, देवळाली या भागांत जोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील अनेक शेतकरी सुखावले आहेत.  चांदवड तालुक्यात निमोण परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. दीड तास चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. निमोण, डोणगाव, दहेगाव, कुंदलगाव परिसरांत जोरदार पाऊस झाला. या पावसाने सगळे सिमेंट बंधारे तुडुंब भरले. ओढे, नाले भरून वाहिले. पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी तुंबल्याने बांध फुटले तर यात अनेकांच्या शेतातली माती वाहून गेली. गेल्या दोन वर्षांत झाला नाही एवढा पाऊस दोन तासांत झाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक ठिकाणी वादळ व पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सिन्नर, इगतपुरी तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील शेतीकामाला वेग येणार आहे.  नाशिक शहरात जोरदार पाऊस शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली होती. (ता. २७) दुपारी अडीच ते सव्वातीन वाजेपर्यंत शहरातील गोदाघाट, जुने नाशिक, गंगापूर रोड, शरणपूर रोड, जुने सीबीएस, मुंबईनाका, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको, पाथर्डी, अशोका मार्ग, द्वारका, गांधीनगर, टाकळी रोड या भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. यंदाचा सर्वाधिक जोर असलेल्या पहिल्याच पावसात गोंधळ उडाला. मनपाच्या गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून वाहिल्याने ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहराच्या मध्यवर्ती परिसरात पावसाचा जोर कमालीचा होता; मात्र पंचवटीसह नाशिक रोड भागात त्या तुलनेत पाऊस अत्यल्प झाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com