कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात जोरदार पाऊस
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांशी भागात मंगळवारी (ता.२४) रात्रीपासून बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंत जोरदार वृष्टी झाली. रात्रभर झालेल्या पावसाने अनेक ठिकणी ओढे नाले भरून वाहिले.  जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सांगलीसह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाने झोडपून काढले. येणाऱ्या रब्बीला त्याचा फायदा होईल. खरिपातील काढणीस आलेल्या पिकांना मात्र फटका बसणार आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने बलवडी (ता. खानापूर) येथील येरळा नदीला पूर आला. बलवडी-तांदळगाव पूल पाण्याखाली गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. तब्बल सहा तास पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांच्या पात्राबाहेरून पाणी वाहत होते. जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. 

बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्‍यात सर्वांत जास्त ७४.५० मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणातून १२०० क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. कोयनेतून २१०३०, तर अलमट्टीमधून २२५६७ पाण्याचा विसर्ग सरू आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी १४.८ फूट आहे. जिल्ह्यातील ४ बंधारेपाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.१५ टीएमसी पाणीसाठा आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा पाऊस झाल्यास बहुतांशी धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस झाल्याने पंचगंगा नदीच्या पात्रात एका रात्रीत वाढ झाली. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. घाम फोडणारे ऊन व वळिवापेक्षा अधिक पाऊस असे पावसाचे प्रमाण राहत आहे. दिवसभर कडक उनामुळे हैराण केल्यानंतर सायंकाळनंतर विजेच्या कडकडाटसह ढगफुटीसदृश पाऊस असे वातावरण सध्या आहे. यामुळे शेतीकामे करणे मुश्‍कील बनले आहे. खरीप पिकांची अवस्था चिंताजनक होण्याची शक्‍यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सांगलीच्या पश्‍चिम भागाला पावसा झोडपले

सांगली जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. बुधवारी (ता. २५) सकाळी आठपर्यंत ३२.७० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद कडेगाव तालुक्यात झाली. जत तालुका वगतळता इतर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढत आहे. दुष्काळी पट्ट्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांत पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात होईल, अशी अशा शेतकऱ्यांत आहे. 

कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी घुसण्याचे प्रकार घडले. काही गाड्यादेखील पुराच्या पाण्याखाली गेल्या. कुडाळ तालुक्यातील गिरगाव लिंगेश्‍वर मंदिरनजीकचा पुलाचा स्लॅब वाहून गेला. बुधवारीदेखील पावसाचे वातावरण राहिले. दरम्यान, सर्वाधिक १६० मि.मी. पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला.

जिल्ह्यात सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्मा होता. उन्हाचे चटके बसत होते. सायंकाळी पाच वाजता विजा चमकू लागल्या. त्यानंतर सुरुवातीला सह्याद्री पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली. त्यांनतर दहा ते पंधरा मिनिटांत पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापला. विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. रात्री अकरा वाजेपर्यंत पाऊस अखंडपणे कोसळत होता. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी नदीपात्राबाहेरून वाहत होते. काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.

वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, तालुक्यांच्या पूर्वभागाला पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. घाट परिसरातदेखील संततधार सुरू होती. कणकवली तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्‍वर नगर, लांजेवाडी, वरवडे फणसनगरसह सावंतवाडी बाजारपेठेतही पाणी घुसले. कुडाळ गिरगाव लिंगेश्‍वर मंदिरानजीकचा पुलाचा स्लॅब वाहून गेला. बुधवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले. बुधवारी सकाळपर्यंत पावसाची नोंद ५७ मि.मी. झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस वैभववाडी १६०, कणकवली ७६, तर सांवतवाडीत ९४ मि.मी. पावसाची नोंद झाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com