पानपिंपरीधारकांचे रखडलेले अनुदान मिळण्याच्या आशा पल्लवित

पानपिंपरीधारकांचे रखडलेले अनुदान मिळण्याच्या आशा पल्लवित
पानपिंपरीधारकांचे रखडलेले अनुदान मिळण्याच्या आशा पल्लवित

अमरावती ः पानपिंपरी व पानवेली बागायतदारांच्या समस्यांची माहिती घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या समस्यांच्या सोडवणुकीसाठी तसेच आर्थिक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे पानपिंपरीधारकांचे रखडलेले अनुदान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, अचलपूर, जळगाव जामोद, अंजनगाव या भागांत पानपिंपरी व पानवेलीचे मळे आहेत. पिंपरी तसेच खाण्याचे पान याचे उत्पादन या माध्यमातून घेतले जाते. बारी समाज बांधवांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून निसर्ग साथ देत नसल्याने उत्पादनासंदर्भाने अनेक अडचणींचा सामना या भागातील उत्पादकांना करावा लागत आहे. दरम्यान, वनौषधी म्हणून या पिकांना अनुदानाचे संरक्षण शासनाकडून मिळत होते. त्यामाध्यमातून कमी उत्पादकता किंवा कमी दराची तूट काही अंशी भरून निघत होती. २०१५-१६ पासून शासनाकडून हे अनुदान मिळणेदेखील बंद झाले. केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या माध्यमातून राज्याला हे अनुदान मिळते. परंतु, राज्याच्या कृषी विभागाकडून याविषयी भक्‍कम पाठपुरावा होत नसल्याच्या परिणामी हे अनुदान मिळणे बंद झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. या सर्व मुद्यांसंदर्भाने शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी तसेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पानपिंपरी व पानमळेधारकांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.  अंजनगाव तालुक्‍यातील पानपिंपरी उत्पादकांच्या शेतावर जात त्यांनी पिकाची पाहणी केली. या वेळी आमदार रमेश बुंदिले, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, कार्डचे विजय लाडोळे, संजय येऊल, दिलीप भोपळे, नितीन पटेल व इतरांची उपस्थिती होती. पानपिंपरी व पानमळेधारकांच्या समस्या सोडवणुकीसाठी त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन या वेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com