दक्षिण महाराष्ट्रात पूर्वहंगामी ऊस लागवडीवर परिणाम

ऊस लागवड
ऊस लागवड

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येत्या गाळप हंगामाबरोबरच सुरू असलेल्या नव्या ऊस लागवडीपुढेही गंभीर संकट उभे राहिले आहे. पाऊस थांबत नसल्याने आता लागवडीचा हंगाम बदलत आहे. पूर्वहंगामी लागवडीऐवजी आता सुरू हंगामातच ऊस लागवड होईल, असा अंदाज आहे. संततधार पावसामुळे पूर्वहंगामी लागवड केलेल्या उसालाही फुटवे फुटत नसल्याने शेतकरी नव्याने संकटात सापडत आहे. ऑगस्टपासून दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांपुढे संकटाची मालिका कायम आहे. ऑगस्टमध्ये महापूर येऊन गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये पावसाने काहीशी उघडीप घेतली होती. यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी तयार करून पूर्वहंगामी ऊस लागवड करण्यास प्राधान्य दिले. ऑक्टोबरच्या सुरवातीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरवात झाली. जोरदार ते अतिजोरदार पाऊस दोन ते तीन दिवसांच्या फरकाने होत असल्याने वाफसा येणे कठीण बनले. हंगाम वाया जाऊ नये, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कांडीऐवजी रोपे लावली, परंतु सातत्याने पडणाऱ्या पावसाने रोपांची वाढ नीट होऊ शकली नाही. पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने व हवामानातील प्रतिकूल बदलामुळे पूर्वहंगामी लागवड केलेल्या ऊस उत्पादकांना धक्का बसला. वाफसा स्थिती नसल्याने रोपे कुचंबली. अशा परिस्थितीमुळे नव्या लागवडीही खोळंबल्या आहेत. ऑक्‍टोबरमध्ये पाऊस थांबल्यास नोव्हेंबरमध्येच सुरू हंगामातील ऊस लागवडी करण्याबाबतचे प्रयत्न होतील, असा अंदाज कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केला.  कीड-रोगांचा धोका सध्या प्रतिकूल हवामानामुळे उसावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. नदीकाठावरील उसावर लष्करी अळी, तर अन्य ठिकाणी तांबेरा व कीड -रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादकांना सर्वच पातळ्यांवर झुंजावे लागत असल्याची स्थिती आहे.  हंगाम पुढे जाणार?  शासनाच्या सूचनेनुसार १५ नोव्हेंबरनंतर गाळप हंगाम सुरू करण्याबाबत कारखान्यांच्या शेती विभागात लगबग सुरू होती. सध्या पडणाऱ्या पावसाने सगळ्याच कामांमध्ये विस्कळितपणा आला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे वाफसा कधी येईल, याची खात्री देता येत नसल्याने तोडणीसाठी क्रमपाळी ठरविणे व अन्य नियोजन कोलमडत असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. पाऊस थांबला तरच काही प्रमाणात १५ नोव्हेंबरनंतर हंगाम सुरू होईल; अन्यथा हंगाम लांबण्याचीच शक्‍यता असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com