जळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. यातच जुलैच्या मध्यापर्यंत असलेली पावसाची अनियमितता आणि जुलैच्या अखेरीस सुरू झालेला संततधार पाऊस आणि महागाई यामुळे जिल्ह्यात सुमारे २५ हजार मेट्रिक टन मिश्रखते पडून आहेत. त्यांचा वापर हवा तसा न झाल्याने कंपन्यांकडून पुरवठाही धीम्या गतीने सुरू आहे. जुलैमध्ये हवी तेवढी मिश्रखतांची विक्री झाली नाही. जुलैच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. तो अगदी १० ऑगस्टपर्यंत सुरूच होता. यादरम्यान आंतरमशागती, तण नियंत्रण, फवारणी व खते देण्याचेही काम ठप्प झाले. यामुळे खतांची मात्रा अनेक शेतकरी खरिपातील पिकांना देऊ शकले नाहीत. अशातच सद्यःस्थितीत मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी या पिकांची आश्वासक वाढ झाल्याने शेतकरी खते देणे टाळत आहेत. फवारणीतूनच संप्रेरके देण्यावर त्यांचा भर आहे. तर कापूस पिकात सध्या काळ्या कसदार, मध्यम जमिनीत हवा तसा वाफसा नसल्याने आंतरमशागत वेगात सुरू नाही. आंतरमशागत व एक फवारणी उरकल्यानंतर कापूस पिकात खतांचा वापर शेतकरी करतील. यामुळे सद्यःस्थितीत किंवा या महिन्यातही मिश्र खतांची उचल हवी तशी झालेली नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ७० हजार मेट्रिक टन मिश्र खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. हा यातील निम्मे पुरवठा झाला आहे. परंतु उचल नसल्याने मागील २०-२२ दिवसांपासून मिश्र खतांचा पुरवठा धीम्या गतीने सुरू आहे. तर युरियाची मागणी पुढील आठवड्यात उघडीप कायम राहिली तर वाढेल, असा अंदाज असल्याने त्याचा पुरवठा करून घेण्यावर कृषी यंत्रणांचा भर आहे. या आठवड्यात ५२०० मेट्रिक टन दोन कंपन्यांकडून रेल्वेद्वारे जिल्ह्यात पोचविण्यात आला आहे. एकूण तीन लाख ३० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा हंगामाअखेर होणार आहे. यात युरियाचा सर्वाधिक एक लाख ३० हजार मेट्रिक टन, पोटॅशचा ६५ हजार तर फॉस्फेटचादेखील ६५ हजार मेट्रिक टन पुरवठा होणार आहे. पोटॅशचा पुरवठादेखील सुरळीत असून, त्याचा पुरवठा ६५ टक्के झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सर्वच खतांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. सरळ खतांचा जुलैमध्ये वापर झाला. नंतर अतिवृष्टी, वाफसा नसल्याने खतांचा वापर हवा तसा झाला नाही. मिश्र खते अधिक पडून आहेत. सुमारे २५ हजार मेट्रिक टन मिश्रखते विक्रेते, वितरकांकडे आहेत. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.