सिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे

सिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे
सिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे

सिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २९ हजार ६८७ हेक्टरपैकी २५ हजार ३४५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजूनही ४ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शिल्लक आहेत. दरम्यान, नुकसानीचा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे.

लांबलेला पाऊस आणि क्यार वादळाने झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही भागांत तर ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पाणथळ जागेतील शेतीचे तर १०० टक्के नुकसान झाले आहे. 

कृषी विभागाने ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे २९ हजार ६८७ हेक्टरवरील भातशेतीचे सुमारे २० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अदांज शासनाला दिला होता. परंतु, प्रत्यक्षात पंचनामे करीत असताना हा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे. सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्यात ४२ कोटी ७३ लाख ९४ हजार रुपये झाले आहे. 

कणकवली तालुक्यात २८ कोटी १० लाख २४ हजार, मालवण तालुक्यात २० कोटी ३ लाख ७६ हजार, सांवतवाडी तालुक्यात १६ कोटी ५ लाख ४७ हजार, देवगड तालुक्यात १० कोटी ८० लाख ८३ हजार रुपये, वेंगुर्ले तालुक्यात ७ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये, वैभववाडी तालुक्यात ७ कोटी ६ लाख ७६ हजार रुपये, दोडामार्ग तालुक्यात ५ कोटी ४८ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान प्रशासनाला ६ नोव्हेंबरपूर्वी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. महसूल, पंचायत समिती आणि कृषी विभागाचे कर्मचारी समन्वयाने पंचनाम्याचे काम करीत होते. बुधवारी सांयकाळपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ३४५ हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले.

कृषी विभागाने २० कोटी रुपये नुकसानीचा आकडा हा शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार देण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात पंचनामे करताना नुकसानीचे आकडे हे वेगवेगळे येत असतात त्यामुळेच नुकसानीचा आकडा वाढला आहे. - सी. डी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com