नागपूर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ यशस्वी; तरीही दुष्काळाशी सामना

नागपूर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ यशस्वी; तरीही दुष्काळाशी सामना
नागपूर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ यशस्वी; तरीही दुष्काळाशी सामना

नागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर तालुक्ं‍यात मागील चार वर्षांत ३०९ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली. दुष्काळाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागू नये व भूजलपातळी वाढावी यासाठी सरकारने आखलेली ही महत्त्वाकांक्षी योजना दुष्काळावर मात करण्यात अयशस्वी ठरली आहे. दुसरीकडे २०१९-२० या वर्षांसाठी गावांची निवड करण्यात आलेली नाही. हे विशेष.  २०१४ मध्ये भूजलपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या १८८ तालुक्यांतील २ हजार २३४ गावे, तसेच टंचाईग्रस्त २२ जिल्ह्यांतील १९ हजार ५९ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यातून दुष्काळग्रस्त असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर, काटोल व नरखेड या तालुक्‍यांचादेखील समावेश होता. जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१९ पर्यंत जलयुक्त शिवार अभियानामुळे कळमेश्‍वर, काटोल व नरखेड तालुक्यांतील पाणीपातळी १ मीटरपर्यंत वाढ झाल्याचा दावा सरकारी यंत्रणा करीत आहे.  काटोल नरखेड व कळमेश्‍वर या तिन्ही तालुक्यांत मागील हंगमात सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला. तोपर्यंत या तिन्ही तालुक्‍यांतील ३०९ गावांत जलयुक्त शिवार योजनेतून कामे झाली होती. दुष्काळी काळात सिंचन करून शेतकरी पिके घेऊ शकले नाहीत. यामुळे सोयाबीन, कपाशीचे पीक बुडाले तर रब्बीचा पेरा केवळ पाच टक्क्यांपर्यंतच झाला. दुष्काळी काळात ग्रामीण भागातील मजुरांना जलयुक्त शिवार योजनेचा फायदा झाला नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांनी केला. ते म्हणाले, दुष्काळी काळात मजुरांचे स्थालांतर थांबविण्यासाठी व त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना फायद्याची ठरली असती, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. 

१४४ गावे योजनेच्या प्रतीक्षेत  काटोल विधानसभा क्षेत्रातील काटोल व नरखेड तालुक्‍यात मागील चार वर्षांत २४० गावांत ही योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. दोन्ही तालुक्‍यांत ३४४ गावे असून, अजूनही १४४ गावे या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा दुष्काळ असल्याने काटोल व नरखेड दोन्ही तालुक्‍यांत ही योजना सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, रब्बीच्या पिकांचे क्षेत्र वाढले, दुबार पिकांचे ओलिताचे क्षेत्र वाढून उत्पादकता वाढली. काटोल-नरखेड क्षेत्रातील पाणीपातळी वाढल्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जलयुक्त शिवार योजना बंद न करता सुरू ठेवावी व उर्वरित गावांची निवड करावी. - संदीप सरोदे, सभापती, पं. स. काटोल. जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. योजना बंद करण्यात आली नाही. २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांतच पुढील कामे केली जातील.  - मिलिंद शेंडे, कृषी अधीक्षक, नागपूर.

जलयुक्त शिवारमध्ये सामील गावे 

वर्ष काटोल नरखेड कळमेश्‍वर 
२०१५-१६ ६९ ३० २०
२०१६-१७ १८ २१ १६
२०१७-१८ २२ २५ १९
२०१८-१९ २५ ३० १४
एकूण १३४ १०६ ६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com