शेतीसाठी नोकरी सोडली, आता बागही गेली

द्राक्ष नुकसान
द्राक्ष नुकसान

अंबासन, जि. नाशिक : वरुणराजा आता बस झालंय... शेतीसाठी नोकरी सोडलीय... आता बागेवर कुऱ्हाड चालविणे बाकी राहिले...काय करावं काहीच सुचत नाही...पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, सोळा एकरांतील द्राक्षबागेतील एकही मणी हातात लागणार नाही. नोकरी सोडली नसती तर परवडले असते. आता तेलही गेले अन् तूपही, अशी म्हणण्याची वेळ पोपट जाधव यांच्यावर आली आहे.  सटाणा तालुक्यातील बिजोटे येथे पोपट संतोष जाधव यांची वडिलोपार्जीत दहा एकर पडीक कोरडवाहू जमीन होती. शेतीत कुळीदालासुद्धा फूल लागत नाही अशी जमीन. श्री. जाधव यांनी घरची परिस्थिती बेताची असल्याने खडतर प्रवासात १९९६ मध्ये B.A. B.ED केले. त्या वेळी वर्षभर पोटाला पुरेल एवढे पुरेसे धान्यसुद्धा शेतातून मिळत नव्हते. शिक्षण मोलमजुरी करून पूर्ण केले. शिक्षण झाले; परंतु नोकरीसाठी आर्थिक चणचण असल्याने ऐपत नव्हती. औरंगाबाद जिल्ह्यातील खडकेश्वर येथील शाळेत वर्षभर नोकरी केली. मात्र परिस्थिती शांत बसू देत नव्हती. १९९७ मध्ये नोकरी सोडली.  पुढे भाजीपाला ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी करत २००० मध्ये स्वतःच ट्रान्स्पोर्ट व्यवसाय सुरू केला. त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून वडिलोपार्जित शेतीची मशागत केली. सुरवातीला डाळिंबाची लागवड केली. डाळिंब पिकातून भरघोस उत्पन्न मिळाल्याने त्यांनी तब्बल वीस एकर जमीन खरेदी केली. संपूर्ण क्षेत्रात डाळिंब पीक उभे केले. शेतीत उत्पन्न वाढल्याने जाधव कुटुंबीय जोमाने शेतात कष्ट करीत होते. मात्र २०१३ मध्ये गारपीट, तेल्या व मर रोगामुळे डाळिंब शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली. पुन्हा उभारीसाठी बॅंकेकडून सत्तर लाख रुपये कर्ज घेतले. संपूर्ण शेतीची मशागत करून सोळा एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली.  २०१८ मध्ये तब्बल तीस लाख रुपये बागेवर खर्च केला. साठ लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळाल्याने त्यात बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते व व्याजाची रक्कम अदा केली. पुन्हा बॅंकेकडून तीस लाख व नातेवाइकांकडून दहा लाख हातउसनवार केले. सर्व पैसा शेतीत ओतला. मात्र, पावसाने होत्याचे नव्हते केले. एक्स्पोर्टची तयारी असताना रात्रीतूनच धूळधाण  शेतीत जवळपास ४० लाखांची गुंतवणूक केल्यानंतर पिकातून नव्वद लाख रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र होत्याचे नव्हते झाले, अन् परतीच्या पावसाने स्वप्न धुळीस मिळाले. आदल्याच दिवशी व्यापारी द्राक्षबाग पाहून एक्स्पोर्ट करण्याच्या तयारीत असतानाच द्राक्षबागेवर संकट कोसळले. पावसामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. एका रात्रीतच सोळा एकरांतील द्राक्षबागेवर एक मणीही हाती लागला नसल्याची कैफियत द्राक्ष उत्पादक शेतकरी पोपट जाधव यांनी मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com