बुलडाण्यात तीन लाख हेक्टरवर खरीप पेरणी

बुलडाण्यात तीन लाख हेक्टरवर खरिपाची लागवड
बुलडाण्यात तीन लाख हेक्टरवर खरिपाची लागवड

बुलडाणा ः दुष्काळाशी सामना करणाऱ्या या जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी दिल्याने पेरण्यांनीही वेग घेतला. जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. मंगळवार (ता. २) पर्यंत लागवडीचे क्षेत्र २ लाख ५४ लाखांवर होते. मात्र गेल्या चार दिवसांत पेरण्यांची कामे जोमाने सुरू असल्याने आता हा आकडा तीन लाखांवर पोचल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या खरिपासाठी जिल्ह्याचे ७ लाख ४८८०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे. आजवर झालेल्या पेरण्यांमध्ये सोयाबीन व कपाशीची एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाला तसेच इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन अधिक राहिल्याने शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे राहण्याची शक्यता पाहता पेरणी नियोजन झालेले आहे. जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र २ लाख ४४ हजार ४३० हेक्टर असून यापैकी एक लाख हेक्टरवर आत्तापर्यंत लागवड झालेली आहे. ही लागवड आता सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक पोचलेली आहे. सोयाबीनच्या लागवडीने वेग घेतला आहे. सोयाबीन आणि तूर अशी पीकपद्धती जिल्ह्यात अधिक क्षेत्रावर वापरली जाते. तुरीची लागवड २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक झाली आहे. मूग व उडदाची लागवड लवकरच प्रत्येकी १० हजार हेक्टरपर्यंत पोचू शकते.  मका उत्पादकांच्या मनात धास्ती      जिल्ह्यात मक्याची बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मलकापूर, नांदुरा, मोताळा आदी तालुक्यांमध्ये खरिपात लागवड केली जाते. प्रामुख्याने बुलडाणा व चिखली या तालुक्यांत प्रत्येकी १४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र खरीप मक्याचे राहते. तर जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ६१ हजारांवर असून आत्तापर्यंत ११ हजार ८२० हेक्टरवर पेरणी झाली होती.  रब्बीत मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे खरिपात मक्याची लागवड करताना अनेक शेतकऱ्यांच्या मनात या अळीविषयी धास्ती तयार झालेली आहे. सध्या मका उगवला असून पीक चांगल्या अवस्थेत आहे. कुठेही या अळीबाबत तक्रार आत्तापर्यंत पुढे आलेली नाही. असे आहे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये) 

ज्वारी ५६२६०
बाजरी  ३५००
मका ६१११५ 
तूर ६५३७० 
मूग ५२४८०
उडीद ४८४२०
सोयाबीन २०८२९०
कापूस     २१५०३५ 
एकूण     ७४८८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com