agriculture news in Marathi,Mosambi crop affected by rain, Maharashtra | Agrowon

पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची मालिका

संतोष मुंढे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

सततच्या पावसाने मोसंबी बागांचा घात केला. टनाप्रमाणे दिलेल्या बागेचे अकरा लाख होतील वाटलं तिथं जेमतेम सहा लाखाचं उत्पन्न झालं. जवळपास ५० टक्‍के झाडांना आगारी फुटली, ती काडी जानेवारीपर्यंत मजबूत होणे नाही त्यामुळं आंबिया बहाराच्या उत्पादनात ५० टक्‍के किंवा त्यापेक्षा जास्त घट होणार हे स्पष्ट आहे. डास, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादन खर्च वाढून बसलाय. फळगळही मोठ्या प्रमाणात झाली. 
- बद्रीनाथ पाचोडे, मोसंबी उत्पादक, दियानतपूर, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून ओळख असलेल्या मोसंबीच्या उत्पादनातही मॉन्सूनोत्तर पावसाने संकटाची मालिका उभी केली आहे. त्याचा थेट फटका मोसंबीच्या आंबिया बहार फुटण्यावर ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत होणार हे जवळपास स्पष्ट असून, उत्पादनातही तितकीच घट येण्याची शक्‍यता असल्याने सुमारे ९८५ कोटी रुपयांचे थेट नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. दुसरीकडे मोसंबी बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून मोठा प्रमाणात फांद्यांना 'आगारी'ही फुटते आहे. बुरशीजन्य रोगांमुळे झाडे जाण्याचे प्रमाण वाढले असून उत्पादन खर्चातही वाढ होत असल्याची माहिती मोसंबी उत्पादकांनी दिली. 

राज्यात जवळपास १ लाख ८९ हजार हेक्‍टरवर लिंबूवर्गीय फळपिकांचे क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास सुमारे ९० हजार हेक्‍टरवर मोसंबी असून यामध्ये सर्वाधिक जवळपास ४० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या मराठवाड्यात, १० हजार हेक्टर विदर्भात, तर २० हजार हेक्टर क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात असून उर्वरित मोसंबीची क्षेत्र खानदेशात आहे. 

साधारणपणे आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या मोसंबी उत्पादकांनी अलीकडच्या काही वर्षांतील दुष्काळाचा अनुभव घेऊन दर बरे मिळत नसले तरी मृग बहार घेण्याकडे कल वाढविला आहे. मृग बहार नैसर्गिकरीत्या घेतल्या जातो, तर आंबिया बहारासाठी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान मोसंबी बागांना ताणावर सोडले जाते. मोसंबीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० ते ७० टक्‍के क्षेत्रावर आंबिया तर ३० ते ४० टक्‍के क्षेत्रावर मृग बहार घेतला जातो. हेक्‍टरी २० ते २५ टनापर्यंत उत्पादन मोसंबी उत्पादक घेतात, तर ७ ते ५५ हजार रुपये प्रतिटनापर्यंत दर राहिल्याचे शेतकरी सांगतात. 

अपवाद वगळता मोसंबीची बहुतांश विक्रीसाठी बागवानालाच बाग दिली जाते. गतवर्षी बहुतांश भागात दुष्काळाचे सावट होते, मराठवाड्यात पराकोटीचा दुष्काळ होता. अशाही स्थितीत मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांनी विकत पाणी घेऊन बागा जगवत काही प्रमाणात उत्पादनक्षमही बनविल्या.

प्रचंड संकटात विकतच्या पाण्यावर मृग बहार घेणाऱ्या मोसंबी उत्पादकांना ऑक्‍टोबरमध्ये अवेळी व अतिप्रमाणात झालेला पाऊस पोषक ठरला असला तरी मोसंबीच्या आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांचे बागा ताणावर सोडण्याचे स्वप्न या पावसाने भंग केले आहे. त्याचे दूरगामी परिणाम मोसंबी बागांवर होणार असून ताणातील अडथळा फुलोरा (फ्लॉवरिंग) साठी ४० ते ५० टक्‍के बाधित करण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे शेतकरी व तज्ज्ञ सांगतात. 

झाडांची झाली ‘दमकोंडी’
मोसंबीच्या बागांमध्ये आधी पाऊस नसणे व नंतर सतत पाऊस ढगाळ हवामान यामुळे बहुतांश भारी जमिनीतील बागांमध्ये फांद्या वाळणे, पान पिवळी पडणे, तंतुमय मूळ कुजणे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे, प्राणवायू खेळता न राहणे परिणामी अन्नद्रव्य वहन न होणे, झाड पिवळी पडून संपणे आदींचे प्रमाण जवळपास २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत गेले असल्याचे तज्ज्ञ व शेतकरी सांगतात. 

मोसंबीचे असे होत आहे नुकसान...

  •    आंबिया बहाराच्या ताणात अडथळा
  •    बागांमध्ये वाढला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
  •    फुलोरा अवस्थांत ४० ते ५० टक्‍के फटका 
  •    मोठ्या प्रमाणात फुटते आहे 'आगारी'
  •    बुरशीजन्य रोगांना झाडेही पडताहेत बळी 
  •    थंडी, तापमानावरती बरंच काही अवलंबून
  •    उत्पादन खर्चात होते आहे वाढ

दृष्टिक्षेपात मोसंबी हंगाम

मराठवाडा   ४० हजार हेक्टर
विदर्भ    १० हजार हेक्टर
पश्‍चिम महाराष्ट्र २० हजार हेक्टर 
खानदेश व इतर विभाग   २० हजार हेक्टर
हेक्टरी उत्पादन  २० ते २५ टन
आंबिया बहार क्षेत्र ६० ते ७० टक्के
मृग बहार क्षेत्र   ३० ते ४० टक्के
यंदाचे नुकसान आंबिया बहार  ४० ते ५० टक्के
सरासरी दर  १७ हजार रुपये
एकूण नुकसान ९८५ कोटी रुपये

प्रतिक्रिया
अति पावसामुळे बागेतील ओल हटण्याचे नाव घेईना. ती हटण्यासाठी रोटार मारले, उपाय करतोय पण पुढे वातावरण कसं राहील यावर आंबिया बहाराचे भवितव्य अवलंबून आहे. गतवर्षी दोन ते अडीच कोटी लिटर पाणी विकत घेऊन बाग जगविली. पाणी कमी पडल्यानं फळ टिकली नाही यंदा आंबिया बहारात अति पावसानं अडथळे सुरू केले. फुटणारी नवती उत्पादनात घट होण्याचे संकेत आहेत. 
- गणेश किडे, मोसंबी उत्पादक, बोधलापूरी, 
ता. घनसावंगी, जि. जालना. 

अति पावसाला संवेदनशील असलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झाडं बुरशीजन्य रोगाला बळी पडताहेत. आंबे बहाराचं गणित ताणातील अडथळ्याने अवघड झालं. हीच ती वेळ आहे की मोसंबी उत्पादकांनी बहार व्यवस्थापन समजून घेऊन मृग बहार घेतलेल्या बागा आंबे बहारासाठी ताणावर सोडण्याचा प्रयत्न न करता एकाच बहाराचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घ्यावे.
- डॉ. संजय पाटील, शास्त्रज्ञ तथा प्रमुख, 
मोसंबी फळ संशोधन केंद्र बदनापूर जि. जालना. 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई  : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...
शेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...
माॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...
शेतमाल खरेदीत सुधारणा कधी?कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...
शेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...