नगर बाजार समिती
नगर बाजार समिती

नगरला कांदा बाजार कडकडीत बंद 

कांद्यावर घातलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. शासनाने मतासाठी शेतकऱ्यांचा बळी देऊ नये. निर्यातबंदी थांबेपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन सुरूच ठेवेल. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणू नये. - विक्रम शेळके, नेते, शेतकरी संघटना, नगर

नगर ः कांद्यावर आणलेली निर्यातबंदी, साठवणुकीला घातलेले निर्बंध आणि कांद्याला उठाव नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या कांदा सत्याग्रह आंदोलनामुळे सोमवारी (ता. ७) नगरमधील कांदा बाजार पूर्णतः बंद होता. सोमवारी कांद्याचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात शुकशुकाट होता. शेतकरी संघटनेनेही या आंदोलनात उडी घेतली असून, सहभाग नोंदवला आहे. 

कांद्याचे दर वाढताच शासनाने कांदा निर्यातबंदी केली आहे. शिवाय कांदा साठवणूक करण्यालाही बंदी घातली आहे. त्याचा परिणाम कांदा बाजारावर झाला आहे. नगरसह राज्यातून परराज्यांत जाणारा कांदा राज्याच्या सीमेवर अडवला जात आहे. याशिवाय त्या त्या राज्यात साठवलेला कांदा प्रशासन धाडी घालून जप्त करत आहे. याशिवाय परदेशांतील कांद्याची निर्यात बंद असल्याने कांद्याला उठाव नाही. त्यामुळे नगरसह महाराष्ट्रातून घेतलेला कांदा ठेवायचा कुठे, शिवाय सरकार जर तो ताब्यात घेणार असेल तर पैसे द्यायचे कोठून? असा प्रश्न व्यापारी उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा सत्याग्रह आंदोलन पुकारले असून, त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. 

आंदोलनामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती बाजारात कांदा बाजार बंद असल्याने लिलाव झाले नाहीत. त्यामुळे दिवसभर शुकशुकाट होता. कांदा बाजार बेमुदत बंद राहणार आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने व्यापाऱ्यांसोबत आहे. निर्यातबंदी उठवल्याशिवाय शांत बसणार नाही, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले. प्रतिक्रिया नगरसह राज्यातून परराज्यांत जाणारा कांदा राज्याच्या सीमेवर अडवला जात आहे. याशिवाय त्या त्या राज्यात साठवलेला कांदा प्रशासन धाडी घालून जप्त करत आहेत. याशिवाय परदेशांतील कांद्याची निर्यात बंद असल्याने कांद्याला उठाव नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बेमुदत कांदा बाजार बंद आंदोलन पुकारले आहे. - अनिल महेत्रे, कांदा व्यापारी, नगर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com