देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा आवक

देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा आवक
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा आवक

पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या लागणींची प्रतिएकरी उत्पादकता अतिवृष्टीमुळे घटली. पर्यायाने नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या नव्या कांद्याच्या आवकेत साप्ताहिक मागणीच्या तुलनेत देशपातळीवर ५८ टक्क्यांपर्यंत घट दिसत असून, त्यामुळेच बाजार समित्यांतील सर्वसाधारण कांदा दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. उत्तम प्रतीच्या कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यांतील बाजार समित्यांत सोमवारी (ता.१८) ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान बाजारभाव निघाले. १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी बाजार समित्यांतील आवक १ लाख ७५ हजार टन होती. देशांतर्गत किमान साप्ताहिक गरज सुमारे ४ लाख २० हजार टन असताना त्या तुलनेत मागील आठवड्यातील आवक ५८ टक्क्यांनी कमी होती. परिणामी, कांद्याचे सरासरी दर उच्चांकी पातळीवर स्थिरावले आहेत. उमराणे (ता. देवळा) येथील खरेदीदार व निर्यातदार खंडू देवरे म्हणाले, ‘‘जुने कांदे संपत आले आहेत. नव्या कांद्याला पावसाचा मार बसला. डिसेंबरमध्ये नव्या कांद्याची तुरळक आवक असेल; पण मागणीच्या प्रमाणात तुटवडा भरून निघणार नाही. आजघडीला अल्वर विभागातून कच्चा-पक्का माल येत आहे. दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील आगाप कांदा पावसामुळे बऱ्यापैकी खराब झाल्याचे दिसते. अशातच, नोव्हेंबरमध्ये थंडी अपेक्षित होती. जेणेकरून येणाऱ्या कांद्याच्या उत्पादकतेत सुधारणा झाली असती. तथापि, गेल्या पंधरवड्यात थंडीच नसल्याने उत्पादकतेत सुधारणा दिसत नाही.’’ महत्त्वाच्या बाबी :  लागणी व आवकेचे चक्र : रोप पुनर्लागणीनंतर कांद्याचे पीक ९० दिवसांनी बाजारात येते. म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील  दर आठवड्यातील लागणी नोव्हेंबर महिन्यात अनुक्रमे बाजारात येतील. याचप्रमाणे सप्टेंबरच्या पुनर्लागणी डिसेंबरमध्ये येतील.  देशव्यापी लागणी : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशपातळीवर २.७ लाख हेक्टरवर खरीप लागणी झाल्या. २०१८ च्या तुलनेत केवळ ७ टक्क्यांची यंदा घट आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात व राजस्थान ही प्रमुख खरीप कांदा उत्पादक राज्य होत. नुकसानीचे प्रमाण : अतिवृष्टीमुळे खरीप लागणी बाधित झाल्या. बाधित लागणींची राज्यनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे - मध्य प्रदेश ः ५८, कर्नाटक ःझ १८. अन्य राज्यांमधील नेमक्या नुकसानीची माहिती उपलब्ध नाही. निर्यात घटली : चालू कॅलेंडर वर्षात ऑगस्टअखेरपर्यंत १३.६ लाख टन कांदा निर्यात झालीय. मागील कॅलेंडर वर्षांत १९.९ लाख टन कांदा निर्यात झाल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीतून दिसते. यंदा सप्टेंबरपासून निर्यातीवर पूर्णत: बंदी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com