खरिपाच्या निम्म्याच क्षेत्राला पीकविमा

खरिपाच्या निम्म्याच क्षेत्राला पीकविमा
खरिपाच्या निम्म्याच क्षेत्राला पीकविमा

पुणे : ऑक्टोबरमधील वादळी पावसाने खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच राज्यातील ५१ टक्के खरीप क्षेत्राला पीकविमा संरक्षण मिळणार नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांची सरकारी मदतीवरच भिस्त राहणार आहे. ज्यांनी पीकविमा भरला आहे, तेथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनाम्यांची, तर ज्या क्षेत्राचा विमा नाही तेथे पंचनाम्यासह एकरी २५ हजार रुपये मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   राज्यात ऑक्टोबरमधील पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. कोट्यवधी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशातच पीकविमा आणि सरकारी मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण १ कोटी ३८ लाख ७२ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीप पिकांची लागवड झाली आहे. यापैकी ४९ टक्के क्षेत्रावरील पिकांना यंदा विमा संरक्षण असणार आहे. अशातच बहुतांश भागात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने ५१ टक्के क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांची भिस्त सरकारी मदतीवर असणार आहे.  कमी कालावधीची पिके सोडली, तर प्रमुख कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी आदी पिके ऑक्टोबरमध्ये काढणीच्या अवस्थेत होती. या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. अद्यापही पावसाने उसंत न घेतल्याने शेतातच पिके सडून गेली आहेत. किरकोळ प्रमाणात वाचलेली पिकेही पाणी लागल्याने काही दिवसात १०० टक्क्यांचे नुकसान गाठणार आहे. अशा परिस्थितीत पीकस्थितीचे बारकाईने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   नुकसान मोठे आहे, योग्य पंचनामे करा  पंचनामे करताना त्यात दिवशी दिसणारे नुकसान ग्राह्य धरले जाते. मात्र, हेच पीक आठ दिवसांत संपूर्ण खराब होते. अशातच अजूनही पाऊस पडत असल्याने नुकसान वाढणार आहे. याचा अंतर्भाव पंचनाम्यात आणि त्यांनी जाहीर होणारा पीकविमा आणि सरकारी मदतीच्या निकषात ग्राह्य धरण्यात यावा. सद्यःस्थिती अत्यंत वाईट आणि हलाखीची आहे. इकडूनतिकडून, मोडतोड करून पैसा जमा करून शेतीत पिकांसाठी गुंतवणूक केली. मोठे नुकसान झाले आहे. त्याचे परिणाम शेतकरी आणि शेती क्षेत्रावर अत्यंत वाईट होणार आहेत, अशी प्रतिक्रिया प्रगतिशील शेतकरी सर्जेराव कदम पाटील (रवंदे, ता. कोपरगाव, जि. नगर) यांनी केली आहे.   शेतकऱ्यांच्या मागण्या 

  • कंपन्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत
  • एकरी २५ हजार रुपये विमा द्या
  • ओला दुष्काळ जाहीर करा 
  • भात उत्पादकाला किमान ६०० रुपये गुंठ्याने मदत द्यावी
  • शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा
  • महाराष्ट्रातील खरीप पीकविमा स्थिती २०१९

  •   सहभागी शेतकरी : ४७ लाख ४७ हजार ५०
  •   एकूण अर्ज : १ कोटी २६ लाख ६५ हजार ५५२
  •   कर्जधारक शेतकरी अर्ज : १ कोटी ४ लाख ९३ हजार ३२०
  •   बिनकर्जधारक शेतकरी अर्ज : ११ कोटी १ लाख ७२ हजार २३२
  •   क्षेत्र संरक्षण : ६७ लाख ५१ हजार हेक्टर
  •   पीकविमा संरक्षण : २३,१५७.१ कोटी रुपये
  • (स्रोत : केंद्र सरकार)

    विमा हप्ता दृष्टिक्षेपात 

  •   एकूण विमा हप्ता : ४५३४.६७ कोटी रुपये
  •   राज्य आणि केंद्र वाटा (प्रत्येकी) १९७६. ७९ कोटी रुपये
  •   शेतकरी वाटा : ५८१.१ कोटी रुपये
  • शेतकऱ्यांचा क्षेत्रनिहाय विमा

  • लहान-अल्पभुधारक : ८२%
  • मध्यम क्षेत्रधारक : १०%
  • इतर : ८%
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com