आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रो विशेष
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची शक्यता
पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अंतिम अहवाल अजून काही दिवस हाती येण्याची शक्यता नाही. आतापर्यंत नंदूरबार व भंडारा भागातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, क्षेत्रीय अहवाल पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशीदेखील काम करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी आपापल्या पातळीवर घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अंतिम अहवाल अजून काही दिवस हाती येण्याची शक्यता नाही. आतापर्यंत नंदूरबार व भंडारा भागातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, क्षेत्रीय अहवाल पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशीदेखील काम करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी आपापल्या पातळीवर घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अतिपावसामुळे राज्यातील ५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके नष्ट झाली असून खरीप हंगाम वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत अद्यापही सरकारी पातळीवरून कोणतीही धोरणात्मक घोषणा झालेली नाही. मात्र, प्रशासकीय अधिकारी आपापली जबाबदारी लवकरात लवकर पार पाडून राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्यासाठी धावपळ करीत आहे.
कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी विविध भागांचा स्वतः दौरा करून तसेच प्राथमिक माहितीच्या आधारे राज्य शासनाला एकूण नुकसान ५४ लाख हेक्टरच्या आसपास असल्याचे कळविले होते. मात्र, आयुक्तालयाच्या सर्व संचालकांनादेखील राज्याच्या विविध भागांमध्ये पाठवून वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
“बांधावर जाऊन पाहणी करतानाच पंचनाम्याच्या कामकाजाचा आढावा घेणे तसेच रब्बीसाठी यंत्रणेला पाठबळ देण्याचा हेतू संचालकांच्या दौऱ्याचा होता,” अशी माहिती एका संचालकाने दिली.
संचालकांशिवाय मृदसंधारण सहसंचालक दादासाहेब सप्रे यांनी अमरावती विभाग व फलोत्पादन सहसंचालक शिरीष जमदाडे यांनी लातूर विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. वसुंधरा प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कोल्हापूर विभागाचा अहवाल आयुक्तांना दिला आहे.
“आयुक्तांना मिळालेल्या अहवालानुसार राज्यभर महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाची यंत्रणा पंचनाम्याची कामे नियोजनपूर्वक सुरू आहेत. मात्र, अनेक भागांमध्ये वारंवार पाऊस व प्रत्यक्ष बांधावर जाण्यात येणारे अडथळे बघता अंतिम अहवाल लांबणीवर पडत आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या आधी राज्यातील अंतिम नुकसानीचा अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता वाटत नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
अधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी
फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांनी मराठवाड्याचा तर विस्तार संचालक नारायण शिसोदे यांनी पुणे विभागात दौरा करून वस्तुस्थिती अहवाल सादर केला आहे. याशिवाय आत्माचे संचालक अनिल बनसोडे यांनी ठाणे विभागाचा आणि मृदसंधारण संचालक कैलास मोते यांनी नागपूर विभागातील पिकांची स्थिती जाणून घेतली. गुणनियंत्रण संचालक विजय घावटे यांनी नाशिक विभागातील नुकसानीचा अंदाज घेतला.
- 1 of 673
- ››