'ग्रामविकासाच्या नियोजनात रोजगारनिर्मितीस प्राधान्य'

'ग्रामविकासाच्या नियोजनात रोजगारनिर्मितीस प्राधान्य'
'ग्रामविकासाच्या नियोजनात रोजगारनिर्मितीस प्राधान्य'

अकोला ः  ग्राम विकासाचे नियोजन करताना गावातील प्रत्येक व्यक्ती, समाज घटकाचा सहभाग त्यात असणे गरजेचे आहे. हे नियोजन करताना गावातील लोकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळून व्यक्तीचे व गावाचे उत्पन्न वाढण्याच्या दिशेने प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘आमचं गाव- आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत  ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्‌घाटन सत्रात मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, संदीप भंडारे, राजीव फडके, गटविकास अधिकारी राहुल शेळके, कार्यशाळेचे साधन व्यक्ती गणेश कुटे व ॲड. अनिता गुरव तसेच सर्व गटविकास आणि जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते. आयुष प्रसाद पुढे म्हणाले, की ‘या अभियानात गावाच्या विकासाचे नियोजन हे गावानेच करावयाचे आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे.’ गावविकासासाठी ग्रामपंचायतींचा सन २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांसाठी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा पंचवार्षिक विकास आराखडा तयार करताना सन २०२०-२१ चा वार्षिक आराखडा अंतिम करावयाचा आहे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आले आहेत. त्यात गेल्या तीन वर्षांत केलेली कामे, ग्रामपंचायत विकास आराखडे, प्रत्यक्षात प्राप्त निधी, हाती घेतलेली कामे, पूर्ण व अपूर्ण कामे, झालेला खर्च शिल्लक निधी याबाबींनुसार चर्चा करून नियोजन करावे. तसेच, शिक्षण आरोग्य व पशुसंवर्धन यासंदर्भातही नियोजन करावयाचे आहे. आराखडा अंतिम करताना महिला बालकल्याणसाठी १० टक्के, अनुसूचित जाती जमाती कल्याणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात, तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका यासाठी २५ टक्के याप्रमाणे निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. या उपक्रमात विना निधी अथवा कमी खर्चात निव्वळ लोकसहभागातून कामे करावयाची आहेत. त्यात  १०० टक्के लसीकरण, स्वच्छ व कचरा विरहित ग्रामपंचायत याबाबत जाणीव जागृती, शाळा अंगणवाडीत १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती, गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे,  शोष खड्डे व परसबागांचा वापर करून गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, स्वच्छतागृह व शौचालय वापराबाबत जागृती, कुपोषण मुक्त गाव, बालमजूर मुक्त गाव, तंटामुक्त व व्यसनमुक्त गाव, प्लॅस्टिकमुक्त गाव आदी उपक्रमही राबवावयाचे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com