कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार मृगजळ

कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार मृगजळ

नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा आगमनामुळे कडधान्य पेरणीवर परिणाम झाला. त्यातच परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान केल्याने मोठा फटका बसला. त्यामुळे कडधान्य, त्यातही मूग आणि उडदाची आयात वाढणार आहे. परिणामी यंदा कडधान्यातील स्वयंपूर्णता हे एक मृगजळ ठरणार आहे, असे मत शेतमाल बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात यंदा देशात खरीप कडधान्य उत्पादन मागील वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी कमी होऊन ८२.३ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मागील वर्षी खरीप हंगामात ८५.९ लाख टन उत्पादन झाले होते. परंतु ‘‘सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कडधान्य उत्पादक पट्ट्यात परतीचा जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने काढणीला आलेल्या मूग आणि उडदासह खरीप कडधान्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी उत्पादन होईल,’’ असे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे.  मूग आणि उडीद पिकांच्या उत्पादक राज्यांमध्ये ऐन काढणीच्या वेळेला अतिवृष्टी झाली, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातही शेतात वाफसा नसल्याने पीक काढणीस अडथळा निर्माण होत आहे. मध्य प्रदेश हे खरीप उडीद उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. तर राजस्थान हे खरीप मूग उत्पादनात अग्रेसर आहे. मूग आणि उडदाचा खरिप कडधान्य उत्पादनात ४५ टक्के वाटा आहे. मूग आणि उडदाचे मोठे नुकसान झाल्याने एकूण खरीप कडधान्य उत्पादनात १५ लाख टन घट होण्याची शक्यता आहे.   ‘‘रब्बी हंगामातही कडधान्य उत्पादनातील तूट भरून निघणे कठीण आहे. यंदा मध्य प्रदेशातील शेतकरी गहू पेरणीकडे अधिक वळण्याची शक्यता आहे. जमिनीत चांगली ओल असल्याने गहू पेरणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच उशिरापर्यंत चाललेल्या पावसाने खरीप पिकांची काढणी लांबली आहे. त्यामुळे रब्बी पेरणीला उशीर होणार आहे. हरभऱ्याची उशिरा पेरणी झाल्यास उत्पादनावर परिणाम शक्य आहे. पीक पक्वतेवर परिणाम होऊन उत्पादकता घटू शकते,’’ असे व्यापाऱ्यांनी सांगितले.  सरकारकडे हरभऱ्याचा १७ ते १८ लाख टन आणि तुरीचा आठ लाख टन बफर स्टॉक आहे. याचा वापर येणाऱ्या काळातील वाढणाऱ्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी होण्याची शक्यता आहे. उदीद आणि मूग याबाबत सरकारकडे बफर स्टॉकचा पर्याय नाही. मात्र, त्यांची आयात वाढू शकते.  देशातील शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा यासाठी सरकारने कडधान्य आयातीचा कोटा १० लाख टनांवर ठेवला होता. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाटाणा, तूर आणि काबुली हरभऱ्याची आयात मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. तर उडदाची आयात ३८ टक्के तर मुगाची ३६ टक्क्यांनी घटली आहे.  ‘‘कडधान्य उत्पादनातील ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने तातडीने आयातीची परवानगी द्यावी,’’ अशी मागणी भारतीय कडधान्य आणि अन्नधान्य असोसिएशनचे अध्यक्ष झवेलचंद भेंडा यांनी केली आहे. भारत हा कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातून मुगाची तर म्यानमारमधून उडदाची आयात करतो. ‘‘म्यानमार येथील उडदाची पेरणी नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत सुरू असते. कायदेशीर कराराने येथून पाच ते सात लाख टन उडीद उपलब्ध होऊ शकतो,’’ असे कलकत्ता येथील अनुराग तुलसियान म्हणाले.  उडीद-मूग उत्पादनात मोठी घट यंदा जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मूग आणि उडदाची लागवड कमी झाली. त्यातच महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश या उत्पादक महत्त्वाच्या राज्यांमध्ये काढणीच्या वेळेला अनेक भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दोन्ही पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. खरिपात मुगाचे उत्पादन २३ टक्क्यांनी घटून १४.२ लाख टन होईल तर उडदाचे उत्पादन ५ टक्क्यांनी घटून २४.३ लाख टन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.  दरात वाढ दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच हरभऱ्याच्या दरात ८ टक्के वाढ होऊन प्रतिक्विंटल ४ हजार ६०० रुपये दर झाला होता. तर चांगल्या प्रतीच्या मुगाचे दर २० टक्के वाढून हमीभावएवढे ७ हजार ५० रुपये होते. तर उडदाच्या दरात ३५ टक्के वाढ होऊन ८ हजार ४०० रुपये दर झाला होता. किरकोळ बाजारातील दर तर आणखीनच चढे आहेत. उडीदडाळ अनेक शहरांमध्ये १२५ ते १५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. ऐन काढणीच्या हंगामात मूग आणि उडदाचे दर वाढल्याचे खूपच कमी वेळा घडले आहे. रब्बीमध्ये तूट भरून निघणार? खरिपापेक्षा कडधान्याचे रब्बी हंगामात जास्त उत्पादन होते. देशातील एकूण कडधान्य उत्पादनापैकी तब्बल ६० टक्के उत्पादन हे रब्बी हंगामात होते. परंतु यंदा खरीप उत्पादनातील तूट भरून निघणे शक्य वाटत नाही. कारण मध्य प्रदेशातील ज्या भागात चांगाल पाऊस झाला तेथील हरभरा उत्पादक मोठ्या प्रमाणात गहू उत्पादनाकडे वळले आहेत, अशी माहिती कडधान्य असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण डोंगरे म्हणाले. ‘‘गहू पिकातून हरभरा पिकापेक्षा अधिक उत्पन्न मिळते आणि गहू हमीभावाने विक्री सहज शक्य आहे. त्यातच यंदा जमिनितील ओल चांगली आहे, त्यामुळे शेतकरी यंदा हरभऱ्यापेक्षा गव्हाला जास्त प्राधान्य देतील,’’ अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com