‘क्यार’ चक्रीवादळाने किनारपट्टी सोडली; पाऊस ओसरला

‘क्यार’ चक्रीवादळाने किनारपट्टी सोडली; पाऊस ओसरला
‘क्यार’ चक्रीवादळाने किनारपट्टी सोडली; पाऊस ओसरला

पुणे : कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात असलेल्या ‘क्यार’ चक्रीवादळ आणखी तीव्र झाले आहे. तीव्रता वाढताच हे वादळ किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकू लागले आहे. अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने जात असलेले वादळ बाष्पही ओढून नेणार असल्याने राज्यात पाऊस कमी होणार आहे. आज (ता. २७) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे; तसेच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक किनारपट्टीलगत समुद्राला आलेले उधाण कायम राहण्याची शक्यता आहे.  ‘क्यार’ चक्रीवादळ शनिवारी (ता.२६) साडेआठ वाजता रत्नागिरीपासून ३०० किलोमीटर, मुंबईपासून ३७० किलोमीटर दूर अरबी समुद्रात ताशी १३० ते १५० किलोमीटर वेगाने घोंगावत होते; तर या वादळाचे केंद्र ताशी १२ किलोमीटर वेगाने किनारपट्टीपासून दूर ओमानकडे सरकत आहे. आज (ता.२७) क्यार चक्रीवादळाचे ‘अतितीव्र’ वादळात रूपांतर होणार असून, ताशी १८० ते २०० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ३१) वादळ ओमानच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता.३०) लक्षद्वीप बेटांजवळ पुन्हा नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.   आजपासून (ता.२७) राज्याच्या अनेक भागांत उघडीप मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा; तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात झालेली घट अद्यापही कायम आहे. अपवाद वगळता सर्वच प्रमुख ठिकाणी तापमान ३० अंशांच्या खाली घसरलेले आहे. शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३१.१ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २५.२ (-६.०), जळगाव २६.९(-७.४), कोल्हापूर २३.३(-७.८), महाबळेश्वर १८.८(-७.८), मालेगाव २४.० (-८.७), नाशिक २३.५ (-८.३), सांगली २४.० (-८.३), सातारा २३.५ (-६.४), सोलापूर २८.१ (-४.५), अलिबाग २८.३ (-४.५), डहाणू २९.३ (-३.६), सांताक्रूझ २९.८ (-३.८), रत्नागिरी २७.२(-५.८), औरंगाबाद २७.२ (-४.१), परभणी २९.० (-२.९), नांदेड ३०.० (-२.७), अकोला २६.० (-६.९), अमरावती २६.८ (-६.१), बुलडाणा २२.८ (-७.२), ब्रह्मपुरी ३१.१ (-०.७), चंद्रपूर २९.२(-३.२), गोंदिया २८.२(-३.६), नागपूर २८.२ (-३.८), वर्धा २८.२ (-३.६), यवतमाळ २६.०(-५.१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com