भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस

नगर  : ‘नगर जिल्ह्याची चेरापुंजी'' अशी ओळख असलेल्या, जिल्ह्याच्या उत्तर भागाला संजीवनी देणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी (ता.२७) सायंकाळी पावसाला सुरवात झाली. शुक्रवारी (ता.२८) व शनिवारी (ता.२९) दिवसभर या भागात संततधार सुरू होती. त्यामुळे भातशेतीवर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या उत्तरेतही समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा पंधरा दिवस उशिराने पाऊस सुरू झाला. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातही अजून पाऊस नव्हता. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी त्याच्या प्रतीक्षेत होते. जून महिना कोरडा जातो की काय, अशी भीती होती. परिसरातील भाताची रोपेही कोमेजण्याच्या स्थितीत आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जूनच्या शेवटी का होईना दमदार पावसाला सुरवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले. 

आदिवासी शेतकऱ्यांच्या भाकितानुसार उशिरा मॉन्सून दाखल झाला. मात्र, दुबार पेरणीचे संकट टळले. दरम्यान, संपूर्ण रिकाम्या झालेल्या भंडारदरा धरणात आता नव्या पाण्याची आवक सुरू होण्याची आशा आहे. मुळा धरणाच्या पाणलोटातही पावसाला सुरवात झाली आहे. भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. 

पेरण्यांची लगबग शेवगाव तालुक्‍यात बोधेगाव, चापडगाव व एरंडगाव परिसरात दोन-तीन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या व कपाशी लागवडीची लगबग सुरू केली आहे. पूर्व भागात शेतकरी कुटुंबीयांसोबत शेतामध्ये लागवडीच्या व पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. 

आठवड्याच्या सुरवातीपासून पूर्व भागात पावसाने दमदार सुरवात करून परिसरातील नदी, ओढे, नाले भरून काढले. सलग दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बंधारे भरले, तर शेतामध्ये पाणी साठले. त्यामुळे काही भागात खरिपाची पेरणी व कपाशी लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भातकुडगाव, ढोरजळगाव, अमरापूर परिसरात कमी पाऊस असल्याने शेतकरी मशागतीचे कामे उरकून लागवडीसाठी व पेरणीसाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

शनिवारी सकाळपर्यंतचा पाऊस (मि.मी)  

घाटघर ११५ 
रतनवाडी ७६ 
पांजरे ६८
वाकी ८२
भंडारदरा ७५
निळवंडे ११ 
आढळा १६
अकोले २०
कोतुळ ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com