पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी सुखावला

सायगाव परिसरात जोरदार पाऊस
सायगाव परिसरात जोरदार पाऊस

नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, मात्र उतरलेल्या पिकांवर पावसाअभावी संकट निर्माण झाले होते. त्यामुळे या पावसामुळे मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी (ता. १९) पावसाची सुरवात झाली. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मालेगाव, दिंडोरी, निफाड, येवला तालुक्यांत विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्यांना जीवनदान मिळाले असून, दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवार (ता. २०) मालेगाव शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली. दाभाडी, टेहरे, पाटणे, वडनेर, खाकुर्डी परिसरांत मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. सोयगाव नववसाहत भागातील कॉलनी व रस्ते जलमय झाले होते. दमदार पावसामुळे पंचक्रोशीत दाणादाण उडवली. येथील दोध्याड नदीजवळील मंगला यशवंत निकम व प्रशांत यशवंत निकम यांच्या शेतात पाणी घुसल्याने पेरलेली बाजरी, चाऱ्यासह दीड वर्षाच्या डाळिंब पिकासह अख्खे शेतच वाहून गेले. 

नदीकिनारी शेत असल्याने जोरदार पावसाचा फटका यशवंत देवबा निकम या शेतकरी कुटुंबाला बसला आहे. तसेच परिसरात शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे.येवला तालुक्यात पूर्व भागात कोळगाव, वायबोथी, धामणगाव, पांजरवाडी, सायगाव, ममदापूर, नागडे या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसाने मोठा आधार दिल्याची भावना येथील शेतकऱ्यांमध्ये आहे. पूर्व भागात ममदापूर, राजापूर परिसरात वन्यक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने हरणे, काळवीट यांचे क्षेत्र आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव पाण्यापासून वंचित होते. मात्र आता त्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दिंडोरी तालुक्यात खेडगाव कादवा कारखाना, मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपूळ, जानोरी, मोहाडी तळेगाव, खतवड दिंडोरी आदी भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र, पावसाचे पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढू शकला नाही. पूर्व भागात झालेल्या पावसामुळे विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला, तर शनिवारी (ता. २०) निळवंडी, पाडे, हातणोरे, मडकीजांब जंबुटके परिसरात चांगला पाऊस झाल्याने कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे. जोपूळ, धामणवाडी परिसरात झालेल्या पावसाने धामणवाडी येथील ओहोळाला पूर आला. त्यामुळे जोपूळ-पिंपळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता. 

ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची चर्चा  येवला तालुक्याच्या पूर्व भागात दुपारनंतर एक ते दीड तासांत सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे, नाले भरून वाहत होते. गेल्या चार वर्षांत कधीही न भरलेले बंधारे या पावसामुळे भरून वाहिले. यात कोळगाव येथील गावानजीक असलेला बंधारा फुटला. तर गावातील कोळ गंगा नदी चार वर्षांनंतर भरून वाहिली. तिला पूर आल्याने परिसरातील अनेक बंधारे भरून वाहिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com