agriculture news in Marathi,rice crop damage by rain and cyclone, Maharashtra | Agrowon

चक्रीवादळे, मुसळधारेने ‘भाता’चे कंबरडे मोडले

राजेश कळंबटे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पावसामुळे वरकस, नदीकिनारी असलेल्या भातशेतीला फटका बसला आहे. पावसाचा अंदाज घेतलेल्या मळ्यातील शेतामधील महान बियाणे उशिरा तयार झाल्यामुळे ती यातून वाचली आहेत. शासनाच्या दरानुसार गुंठ्याला मिळणारी ६८ रुपये मदतीऐवजी ती किमान ७०० ते ८०० रुपये केली तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो.
- मिलिंद वैद्य, शेतकरी, मेर्वी, ता. जि. रत्नागिरी
 

रत्नागिरी : राज्यातील आठ विभागांपैकी पाच विभागांत महत्त्वपूर्ण पीक असलेल्या भाताचे यंदा शेवटच्या टप्प्यात वादळी पावसाने मोठे नुकसान केले. विशेषत: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांमुळे कोकण विभागातील सर्वच जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले. येथील काही शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पीक नुकसान ५० टक्क्यांवर राहिले. राज्यातील भात उत्पादकांना मिळून सुमारे २७०० कोटींवर फटका बसला आहे. 

राज्यात १४ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. यंदा सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के लागवड झाली होती. उशिराच्या पाऊसमानामुळे लागवडींना उशीर झाल्याने काढणीही ऑक्टोबरपर्यंत लांबली होती. मात्र, ऐन सुगीत चक्रीवादळ आणि त्याबरोबर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. भात पिकाचे २५ ते १०० टक्के नुकसान झाले आहे. 

कोकण पट्ट्यात क्यार चक्रीवादळाचा प्रभाव २० ऑक्टोबरपासून सुरू झाला. वेगवान वाऱ्यांबरोबर मुसळधार पावसाने कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला फटका बसला आहे. हळवी भात दसऱ्याच्या दरम्यान पडलेल्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी ती कापून नेली; मात्र शेवटच्या टप्प्यातील हळव्या भातशेतीलाही पावसाने गाठले. शेतात पाणीच पाणी साचल्याने पीक वाया गेले. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भात पावसाच्या सरीमुळे पूर्ण भिजले. सलग तीन दिवस कायम पाऊस राहिल्याने कापलेले भात तरंगू लागले. लोंब्या तुटून गेल्या आणि त्या पुन्हा रुजून आल्या. ज्या शेतकऱ्यांनी ओले भात आणून रचून ठेवले, त्याला ओलसरपणामुळे बुरशी आली. 

पावसाने उभी भातं पडून गेली आणि शेतातच कुजली. सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. त्यानंतर रत्नागिरी, रायगड आणि ठाण्याचा लागतो. पाचही जिल्ह्यांत मिळून १० लाख ६ हजार एकर पीक क्षेत्र असून त्यातील ८ लाख ७४ हजार २२२ एकरांवर भात लागवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे ५० टक्के भातशेतीला फटका बसला आहे. 

कोकणात भाताची उत्पादकता सरासरी एकरी १५ क्विंटल असून सरासरी ३० ते १०० टक्के दरम्यान नुकसान येथील शेतकऱ्यांचे झाले आहे. पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून ७५ हजार एकर लागवडीखाली शेतीला फटका बसला. रत्नागिरी जिल्ह्यात ३० हजार एकर, रायगडमध्ये ६२ हजार एकर, पालघरमध्ये ८७ हजार एकर तर ठाण्यात ७८ हजार एकरवरील भातशेती बाधित झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा हे भाताचे हक्काचे तालुके. ऑगस्टमध्ये जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. पण पश्‍चिमेकडील काही उंचावरचे तालुके याला अपवाद ठरले. ज्या वेळी पाऊस झाला त्या वेळी भात पक्वतेच्या अवस्थेत असल्याने जादा पाऊस होऊनही भाताने तग धरला. पण त्या वेळी दिलासायदाक ठरलेल्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये मात्र व्हीलनची भूमिका बजावली.

नाशिक जिल्ह्यात ७३२०.८५ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पंचनामे सुरू असल्याने अजून अंतिम आकडेवारी मिळाली नाही. ढगाळ वातावरणामुळे भातशेतीच्या गरे, हाळे, इंद्रायणी, आर २४, वाय एस आर, १००८ , सोनम, रूपाली, पूनम, सोनाली या भाताच्या वाणांच्या जातीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होता. भात पिके जमीनदोस्त होऊन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

प्रमुख जिल्ह्यांतील लागवड (हेक्टर)
ठाणे : ५५२३५, पालघर : ७५५८०, रायगड : ९५८७९, रत्नागिरी : ६७८४३, सिंधुदुर्ग : ५४२३८, नाशिक : ९३०३२, नंदुरबार : २३५०९, नगर : १७६२३, पुणे : ५७८१७, सातारा : ४१७१४, कोल्हापूर : १०१०१४, नागपूर : ८५८३२, भंडारा : १७५७२५, गोंदिया : १९०११३, चंद्रपूर : १६१४९४, गडचिरोली : १५०५०९.

एकरी ४० हजार रुपये खर्च
कोकणात मजुरीवर भातशेती करण्याचे प्रमाण कमी आहे. नांगरणी, भात काढणी, लावणी, कापणी, झोडणी आणि खतासाठीचा एकरी खर्च चाळीस हजार रुपयांवर होतो. गुंठ्याचा खर्च सरासरी ९०० ते १००० रुपयांपर्यंत राहतो.

प्रमुख विभागनिहाय लागवड (हेक्टर)

कोकण विभाग  ३४८७७५
नाशिक विभाग     १२३३७१
पुणे विभाग  ७५५५४ 
कोल्हापूर विभाग    १५८१९२ 
नागपूर विभाग ७६३७५५
एकूण राज्य  १४७७८७९ 

स्रोत : कृषी विभाग

प्रतिक्रिया

शेतात पाणी साचून राहिल्याने कापणी केलेले भातपीक सुकवण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक कापून सरळ घरी आणले जात आहे. यामध्ये अधिक कष्ट करावे लागत असून, पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळविले आहे.
- गंगाराम मोहिते, शेतकरी, मंडणगड, जि. रत्नागिरी 

भाताच्या लावणीनंतर सारखा पाऊस सुरू होता. त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. त्यात काळ्या माव्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पीक जमीनदोस्त झाले. दरवर्षी सरासरी २० क्विंटल भाताचे उत्पादन मिळते. मात्र चालू वर्षी ७ ते ८ क्विंटलवर उत्पादन मिळेल. उत्पादन घटण्याची मोठी शक्यता आहे. 
- वसंत भोसले, भात उत्पादक शेतकरी, धामणी, जि. नाशिक

माझी दोन एकर शेती. त्यात ११० दिवसांत परिपक्व होणारे वाण लावले होते. काढणीपूर्वी पावसाचा फटका बसल्याने 
२५ टक्के शेतमालाचे नुकसान झाले. एकरी १५ क्विंटल उत्पादकता दरवेळी मिळते. यावर्षी ७-८ क्विंटलही मिळणार किंवा नाही याबाबत साशंकता आहे. 
- धोंडूजी चोले, मुरमाडी, ता. लाखनी, जि. भंडारा

दा बँकेकडून कर्ज घेऊन भात पिकाचे नियोजन केले होते. दहा एकरांपैकी पाच एकरांवर भात पीक केले होते. पीक काढणीच्या अवस्थेत असताना आठ दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भात पिकातून एकरी पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन झाले होते. पावसामुळे चांगलेच नुकसान झाले आहे.
- बजाबा मालपोटे, भात उत्पादक, फळणे, ता. मावळ, जि. पुणे

मी प्रत्येक वर्षी खाण्यासाठी भात घरी ठेवून बाकीचे विकतो. पण यंदा खाण्यासाठीच भात शिल्लक राहण्याची शक्‍यता नाही. यामुळे कित्येक वर्षांत पहिल्यांदाच घरी खायलासुद्धा भात विकत आणावा लागणार आहे. 
-  दादा पाटील, सोहाळे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर


इतर अॅग्रो विशेष
निर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...
फळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...
मोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...
खाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...
‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...
गोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....
फेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...
`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...
सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस...डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर...
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...