दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत प्रशासनाचा वेळकाढूपणा ः धोंडगे 

शंकरअण्णा धोंडगे
शंकरअण्णा धोंडगे

कंधार, जि.नांदेड  ः कंधार, लोहा तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता गंभीर असताना उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याने संकट अधिक गंभीर झाले आहे, अशी टीका शेतकरी नेते, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली. 

कंधार येथे शुक्रवारी (ता. १०) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. धोंडगे बोलत होते. ते म्हणाले, की लोहा, कंधार तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, मूग, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिके तीस टक्केही शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत. कर्जमाफीचा घोळामुळे नवीन कर्जही मिळालेले नाही. दुष्काळी स्थिती असतानाही हंगामाच्या सुरवातीलाच बारुळ, शिराढोण भागात ढगफुटीत मोठे नुकसान होऊनही कोणतेही अनुदान, मावेजा पदरी पडला नाही. पीक विम्याचाही गोंधळ असाच चालू आहे. शासनाच्या पोकळ घोषणा, प्रशासनाची उदासीनता आणि स्वार्थी राजकारणात मश्गुल लोकप्रतिनिधी यांच्यामुळे या क्षेत्रातील सर्वसामान्य जनता संकटामुळे हैराण झाली आहे.त्यातच कधी नव्हे एवढे या भागातील तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर झाले आहे.

सध्या गावागावात पिण्याच्या पाण्याची व जनावरांचा चारा, मजुरांच्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून टंचाईचे आराखडे कागदावरच करून अंमलबजावणी शून्य आहे. अनेक गावांचे सरपंच, प्रतिनिधी कार्यालयांमध्ये चकरा मारून थकले असून त्यांना कोणीही दाद देत नाही. केवळ निवडणुकीच्या राजकारणात, स्वतःचे हित पाहण्यात या मंडळींनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. प्रचलित शासन, प्रशासन, फसवणूक करणारे लोकप्रतिनीधी यांना जनता येत्या काळात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षातर्फे प्रशासनाकडे करण्यात आल्याचे श्री. धोंडगे यांनी सांगितले.

या वेळी दत्ता पवार, मनोहर भोसीकर, बाबुराव केंद्रे, संजय कऱ्हाळे, शिवदास धर्मापुरीकर, विजय धोंडगे, डॉ. सुनील धोंडगे, प्रल्हाद फाजगे, शिवराज पवार, सुधाकर मोरे, जयराम कांबळे, सुभाषराव राहेरकर, अच्यतराव मेटकर, भरत पाटील चिखलीकर, शरद भागानगरे आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com