ऊस उत्पादकता वाढ, इथेनॉलला कारखान्यांनी प्राधान्य द्यावे

कारखान्यांनी इथेनॉलला प्राधान्य द्यावे ः शरद पवार
कारखान्यांनी इथेनॉलला प्राधान्य द्यावे ः शरद पवार

पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संसार नीटनेटका चालण्यासाठी उसाची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न साखर कारखान्यांनी करावेत. तसेच, येत्या दोन वर्षांत सर्व कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प उभारावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांना केल्या.  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या ६२ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहितेपाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, इस्माचे अध्यक्ष रोहित पवार, दिलीपराव देशमुख, साखर आयुक्त संभाजी कडूपाटील, संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावरकर व श्रीराम शेटे तसेच इतर मान्यवर होते. संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  श्री. पवार म्हणाले, की केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून इथेनॉलसाठी चांगले धोरण तयार करण्यात यश आले आहे. इथेनॉल खरेदीबाबत ऑईल कंपन्यांकडून काही अडचणी येत आहेत. मी त्यांच्याशीही बोलनेच पण आधी राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प उभारून दोन वर्षांत १०० टक्के काम पूर्ण करावे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रांची ऑर्डर द्यावी लागेल. यंत्रांचा पुरवठा एकदम होणार नाही. मात्र, गप्प बसला तर नुकसान होईल. थेट उसाच्या रसापासून इथेनॉल परवडणारे नसले तरी मळीपासून इथेनॉल परवडते. त्यामुळे आता इथेनॉल, साखर आणि सहवीज अशा तीन बाबींवर केंद्रीत असलेल्या कारखानदारीचा विकास झाला तरच भविष्यात कारखानदारीचे चित्र चांगले राहील. हुमणीमुळे राज्याचे २० हजार हेक्टरपेक्षाही जास्त ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखानदारांनी आता कृषी खात्याच्या मदतीने गावनिहाय बैठका सुरू कराव्यात, अशीही सूचना श्री. पवार यांनी केली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रभावी प्रतिनिधीत्व करणाऱ्या साखर संघाच्या वार्षिक सभेला साखर आयुक्त वगळता राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने कारखाना प्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले.  पंतप्रधानांना पाच पत्रे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्र सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "साखर कारखान्यांच्या समस्यांवर श्री. पवार यांच्याकडून पंतप्रधानांना पाच पत्रे लिहिण्यात आली. त्यामुळे पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी दिल्लीत श्री. पवार यांच्या निवासस्थानी येवून माहिती घेतली. त्यानंतर पॅकेज जाहीर झाले. त्यात साखरेचा बाजारभाव  २९ रुपये प्रतिकिलोवर ठेवण्याचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. केंद्राप्रमाणेच आता राज्य शासनाकडून पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न साखर संघाने करण्याची आवश्यकता आहे." हुमणीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर हुमणीचे मोठे संकट आलेले आहे. त्यामुळे ३०-४० टक्के नुकसान होणार आहे, असे सांगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्हीएसआयच्या शास्त्रज्ञांना माहिती देण्याची सूचना साखर संघाच्या सभेत केली. त्यावर कीटकशास्त्रज्ञ डॉ. आर. पी. यादव यांनी काही भागात हुमणीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असल्याचे स्पष्ट केले. "हुमणीसाठी रासायनिक उपायांबरोबरच जैविक तंत्राचा अवलंब केल्याशिवाय नियंत्रणाशिवाय पर्याय नाही. हुमणीच्या एकूण ३०० जाती असल्यातरी राज्यात दोन प्रमुख जातींचा प्रादुर्भाव आहे. अवर्षण, पाण्याचा ताण यामुळे हुमणी वाढली असून पुढील तीन हंगाम लागोपाठ सामुदायिक उपाय सर्व कारखान्यांनी केले तरच हुमणी थांबेल," असेही डॉ. यादव म्हणाले.  शरद पवार म्हणाले

  • ऊस तोडणी कामगारांबाबत मी स्वतः २०२० पर्यंत करार केला. मात्र, कराराची मदत संपण्याआधीच पुन्हा प्रश्न तयार झाला आहे. करार पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंची असते.
  • साखरेचा साठा कमी होत नाही तोपर्यंत कारखान्यांच्या अडचणी संपणार नाहीत.त्यामुळेच निर्यातवाढीसाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील.
  • केंद्र सरकारने साखरउद्योगासाठी आऊट ऑफ द वे जावून काही बाबतीत मदत केली आहे. त्यात निर्यातीचा दंडक आपल्यावर घातला आहे. मात्र, केंद्राच्या मदतीचा लाभ घेण्यासाठी निर्यात करावी लागेल.
  • दिलीप वळसेपाटील यांच्या अध्यक्षपदाच्या रुपाने राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांचे नेतृत्व सध्या महाराष्ट्र करतो आहे. खासगी कारखान्यांच्या अध्यक्षपदासाठी देखील रोहीत पवार यांची निवड झाली. यावर श्री.पवार म्हणाले देशाच्या संपूर्ण साखर उद्योगाचे नेतृत्व करण्याची संधी प्रथमच महाराष्ट्राला मिळाली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com