सिंधुदुर्ग, रत्नागिरीला चक्रिवादळाचा जबर तडाखा

भात पीक नुकसान
भात पीक नुकसान

पुणे : मॉन्सून देशभरातून परतल्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम विदर्भात आठ दिवसांहून अधिक काळ मॉन्सूनोत्तर वादळी पाऊस दमदार कोसळला; तर सिंधुर्दुग, रत्नागिरी जिल्ह्यांना ‘क्यार’ चक्रीवादळ, मुसळधार पावसाने तडाखा दिला. पावसाने काढणीस आलेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. परिपक्व पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. पावसाने भात, सोयबीन, कापूस, मका, बाजरी, भुईमूग ही खरीप पिके, द्राक्षबागा, भाजीपाला आणि फुलपिकांचे अतोनात नुकसान झाले.  ‘क्यार’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहत असून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भातशेती कोलमडून गेली असून शेकडो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या किनारपट्टीसह संपूर्ण जिल्ह्यात या वादळामुळे फटका बसणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसात खरीप पिके, भाजीपाला पिके झोडपली. ओढेनाले, नद्यांना पूर आले. पुराचे पाणी पिकांत शिरल्याने मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी व पेठ तालुक्यात पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेले व कापून ठेवलेल्या भातपिकाचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा चांगला पाऊस असल्याने चांगले उत्पन्न येईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा पावसामुळे हिरमोड झाला. सोंगणीसाठी आलेला भात आडवा झाला; तर सोंगून ठेवलेले पीक पावसामुळे खराब झाले. सततचा पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे द्राक्ष बांगाना तडाखा बसला. द्राक्ष वेलींवर कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला, मणीगळ, मण्यांना तडे जाऊन नुकसान वाढले.   नगर जिल्ह्यात आठ दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसाने फुले अक्षरशः मातीमोल झाली आहेत. पावसाने फुले भिजल्याने फुलांना दसरा सणाला मिळालेल्या दराच्या तुलनेत आता निम्‍माही दर मिळत नाही. बाजारात नेऊनही फुले फेकूनच द्यावी लागणार असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी जागीच फुले फेकून दिली. बाजार समितीच्या आवारातही फेकलेल्या फुलांचा अक्षरशः चिखल पाहायला मिळाला. फुलबाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यात सततच्या पावसाचा फटका हळदीला बसला. हळदीवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे; तर कंदकुज होण्याची शक्यता आहे. परिणामी, हळदीच्या उत्पादनात ३० टक्के उत्पादन घट होण्याची शक्यता आहे. सध्या हळद पिकांचा वाढीचा कालावधी असून, पडणारा पाऊस हळद पिकाला अनुकूल नाही. यामुळे आर्दता वाढल्याने तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. पाऊस राहिल्याने मुळांना हवा मिळत नसल्याने कंदकुज होण्याची भीती आहे. पुणे जिल्ह्यातही भोर, मावळ, मुळशी वेल्हा तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे भातपिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या वर्षी भाताचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. भाताचे तयार झालेले पीक हाताशी आले असताना पावसाने या उभ्या पिकाचे नुकसान झाले. भातपीक आडवे पडून पाण्याखाली गेले आहे. काही ठिकाणी भातपीक पिवळे पडले आहेत; तर काही ठिकाणी पीक कुजून चालले आहे. भाताबरोबर सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातही खरिपाची पिके, फळबागा, भाजीपाला, फुलपिकांचे पावसामुळे नुकसान होणार आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. मात्र काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. गेले काही दिवस महाबळेश्वरमध्ये पाऊस झाल्याने स्ट्रॅाबेरीचे नुकसान सुरू आहे. शनिवारी बहुतांशी ठिकाणी सूर्यदर्शन झाल्याने शेतातील ठप्प झालेली कामे सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. पिकांचे नुकसान झाले असले, तरी मिळेल ते पीक काढता येणार आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिल्यास पिकांचे पूर्णपणे नुकसान होईल.  पिकांचे मोठे नुकसान

  • काढणीस आलेली पिके हातची गेली
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकाला तडाखा
  • मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस, मका, बाजरीला मोड
  • राज्यभरात भात, भुईमूग, भाजीपाला, फुलपिकांना फटका
  • पूर्वहंगामी द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
  • हळदीचे कंद कुजण्यास प्रारंभ
  • स्ट्राॅबेरी पिकालाही फटका
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com