agriculture news in Marathi,soybean got 22 thousand setback by rain, Maharashtra | Agrowon

पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार कोटींवर दणका

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019
  • माझी ३१ एकर शेती आहे. त्या पैकी ३० एकर शेतीवर सोयाबीन पेरले होते. गेल्या महिन्यात काढणीला सुरवात केली होती. पण मोठा पाऊस झाला. आजही शेतात गुडघाभर चिखल आहे. त्यामुळे काढणीत अडचणी येत आहेत. सुमारे ४० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन सडून जात आहे. एकरी अंदाजे १६ हजार रुपये खर्च आहे. दरवर्षी सरासरी एकरी दहा क्विंटल उत्पादन होते. यावर्षी ते पाच ते सहा क्विंटलच मिळेल असे वाटते. तेही सोयाबीन काळे पडले आहे. 

- नामदेव जाधव, मुसळेवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर

पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची यंदा पावसाने पूर्ण वाताहत केली. वातावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेले सोयाबीन पीक नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. ६० टक्क्यांवर किमान नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे किमान २२ हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना हा सर्वांत मोठा फटका मानला जात आहे. 

खरीप हंगामात राज्यात कोकण वगळता सर्वच विभागात सोयाबीन पीक घेतले जाते. कापसानंतर सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेले हे पीक यंदा सरासरीच्या तुलनेत १११ टक्के क्षेत्रावर पेरले गेले. स्वाभाविकच गेल्यावर्षी बाजारभावात कमी प्रमाणात झालेले चढउतार, मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी वाढलेले मोठे संकट आणि बोंड अळीसह कापसाची घटलेली उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांचा यंदाही सोयाबीन लागवडीकडे अधिक कल होता. राज्यात यंदा ३९ लाख ५९ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. 

सततचे ढगाळ हवामान, पावसाने सोयाबीन उत्पादकांचा उत्पादन खर्चात वाढ झाली. रोग-कीड नियंत्रणासाठी किमान दोन फवारण्या तरी कराव्या लागल्या आहेत. किमान १५ ते २० हजार रुपये प्रतिएकर उत्पादन खर्च सोयाबीनचा झाला आहे. काढणीच्या अवस्थेत पावसाने झोडपल्याने सर्वसाधारणपणे १० क्विंटल प्रतिएकर अशी उत्पादकात असलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान ६० ते ८० टक्क्यांपर्यंत झाले आहे.        

सोयाबीन असे झाले नुकसान...

  •   पाने खाणारी, उंट अळी, खोडमाशीचा मोठा प्रादुर्भाव
  •    सततच्या ओलसरपणामुळे केवळ पानांचीच वाढ
  •    फुलवाढीवर परिणाम, शेंगांची संख्या कमी
  •    काढणीला आलेले सोयाबीन पावसाच्या तडाख्यात
  •    झाडासह शेंगाही कुजल्या, सडल्या, कोंब फुटले
  •    बुरशीजन्य रोगांचा शेंगांवर प्रादुर्भाव, प्रत घसरली 
  •    फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ

सोयाबीनचे यंदाचे बिघडलेले गणित (शेतकरी पातळीवर)

सरासरी एकरी उत्पादन    १० ते १२ क्विंटल
उत्पादन खर्च   १५ ते २० हजार रुपये
सध्याचा बाजारभाव  ३८०० रुपये प्रतिक्विंटल
यंदाचे पीक नुकसान   ६० ते १०० टक्के
यंदाचे एकरी उत्पादन   ३ ते ६ क्विंटल
यंदाचे एकरी उत्पन्न   ० ते १५ हजार रुपये
भांडवली एकरी नुकसान ० ते १०० टक्के

 सोयाबीनचे विभागनिहाय लागवड क्षेत्र, हेक्टरमध्ये 
(कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ/घट टक्के)

नाशिक १,४२,५४६ (११३)
पुणे १,४४,२९५ (१८७)
कोल्हापूर   १,४७,९९७ (९०)
औरंगाबाद    ३,८४,६४२ (१६५)
लातूर  १५,७०,७२१ (१५७)
अमरावती    १३,२९,७२० (९२)
नागपूर   २,३९,६२८ (४७)
एकूण    ३९,५९,५४९

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

गेल्या दहा वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेतो. माझे एकरी १२ क्विंटलपर्यंत सोयाबीन निघते. यंदा सोयाबीन काढणी वेळी पाऊस आला यामुळे मळणी लांबली. सलग पावसामुळे सोयाबीनची प्रत पावसामुळे खराब झाली. यामुळे केवळ तीन क्विंटल सोयाबीन मी घेऊ शकलो. त्याचीही प्रत चांगली नाही. या पावसामुळे माझे सुमारे ७५ टक्के नुकसान झाले आहे.
- भास्कर पाटील, बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

आमच्या भागात या हंगामात सोयाबीनची एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादकता मिळत आहे. दरवर्षी एकरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन होत असते. यावर्षी ऑक्टोबरमधील पावसामुळे ६० ते ७० टक्क्यांवर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर सोयाबीनचे उभे पीक सोंगणी करण्याचा खर्चही निघाला नाही. सध्याही शेतांमध्ये पाणी आहे. माझ्या दहा एकरांत कुठलेही पीक घेता आलेले नाही.
- गजानन आखाडे, डोणगाव ता. मेहकर, जि. बुलडाणा

सोयाबीनचे मला एकरी चार पोते उत्पादन झाले. साडेचार एकरात यंदा सोयाबीनची लागवड केली होती. त्यात १६ पोते उत्पादन आले. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब आले होते. लागोपाठ झालेल्या पावसामुळे ६० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. मागील वर्षात याच शेतात ३२ पोते सोयाबीन झाले होते. पिकाचा विमा काढलेला आहे. अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. आता मदत कधी मिळते याची प्रतीक्षा आहे.
- नंदकुमार यशवंत चव्हाण, रा. बोर्डी, ता. मालेगाव जि. वाशीम

चांगला पाऊस झाल्यास आमच्या भागात सोयाबीनचे एकरी सरासरी ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मशागत ते काढणीपर्यंत एकरी १८ ते २० हजार रुपये खर्च येतो. यंदा पावसास विलंब झाल्यामुळे पेरणी उशिरा झाली. ऐन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने शेतामध्ये शेंगा गळून पडल्या. एकरी २ ते ३ क्विंटल उतारा येत आहे. भिजल्यामुळे त्यातही ५० टक्क्यांहून अधिक माल डागील आहे. 
- डॅा. अनिल बुलबुले, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी

पाऊस पाणी वेळेवर झाले तर सोयाबीनचे ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. एकरी साधारणतः १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा ऐन सुगीत पाऊस झाला, त्यानंतर उन्ह पडले. कापणी करताना ४० ते ५० टक्के शेंगा शेतातच पडल्या. त्यामुळे एकरी ३ ते ४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. २० ते ३० टक्के दाणे बुरशीमुळे काळे पडले, डागील झाले आहेत. खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे.
- तिरुपती कनकंटे, शहापूर, ता. देगलूर, जि. नांदेड

माझ्याकडे २२ एकर सोयाबीन होते. पण पावसाने जवळपास ८०-९० टक्के नुकसान झाले. एकरी १२ क्विंटल उत्पादन निघते. आता हातात काहीच उत्पादन मिळणार नाही. विम्याची भरपाई मिळाली, तरी ती पुरेशी राहणार नाही. एकरी २०-२२ हजारांचा खर्च येतो. यंदा कशाचाच कशाला मेळ लागणार नाही. 
- अमोल रणदिवे, सारोळा (ब्रु), ता. जि. उस्मानाबाद

सोयाबीनचे एकरी सरासरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन होते. यंदा पावसामुळे साधारण ८० टक्के नुकसान झाले आहे व अवघे एकरी ३ ते ४ टक्के उत्पादन हाती आले आहे. हाती आलेले पीकही पावसामुळे खराब झाल्याने २६०० रुपये क्विंटल ने विक्री केली. एकरी सुमारे चौदा हजार रुपये खर्च केला तो वाया गेला. 
- सोपान रावसाहेब तांबे, तांबेवाडी, ता. श्रीरामपूर. जि. नगर

यंदा आधी पाऊस नसल्याने माझ्याकडील सहा एकरांतील सोयाबीन संकटात सापडलं होत. मध्यंतरीच्या काळात थोडाबहुत पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक तगल. परंतु, ऑक्टोबरच्या पावसाने थोड्याबहुत तगलेल्या त्या पिकांचीही दैना केली. जिथे सरासरी १० ते १२ क्विंटल एकरी उत्पादन व्हायचे तिथं एकरी चार क्‍विंटल पिकलं. तेही पावसानं मोठ्या प्रमाणात डागाळल्याने त्याला तीन हजारांचा दर मिळाला. एकरी बारा हजार खर्च झाले आणि तेवढेच उत्पन्न हाती आल.
- दीपक लकडे, मोहा, जि. उस्मानाबाद

आमच्या कुटुंबाची जेमतेम तीन एकर शेती असून संपूर्ण शिवारात सोयाबीन घेतले होते. दरवर्षी सरासरी एकरी अकरा क्विंटल उत्पादकता मिळते. यावर्षी देखील तितकीच होण्याची अपेक्षा होती. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने पुरते होत्याचे नव्हते केले. यावर्षी सोयाबीनची केवळ पाच क्विंटल उत्पादकता मिळाली असून मालाचा दर्जाही योग्य नाही. दर्जा नसल्याने १५०० रुपये क्विंटलचाच भाव मिळाला. दुसरीकडे ५० टक्के उत्पादन घटल्याने वेगळे नुकसान झाले. आता रबीसाठी खासगी कर्ज घेण्याची वेळ आली आहे.  
- अमीर जिवाणी, खैरगाव देशमुख, ता. पांढरकवडा, यवतमाळ

माझ्याकडे अडीच एकर सोयाबीन होते. काढणी सुरू असतानाच पाऊस आला, सर्वच्या सर्व मातीत गेले. दरवर्षी सोयाबीन घेतो, एकरी ८-१० क्विंटल उत्पादन निघते. पावसाने सगळेच मातीमोल झाले. आता पंचनामे झालेत, पण काय अन्‌ किती मदत मिळणार काय ठाऊक. एकरी २० हजारांचा खर्च झाला आहे.  
- रामलिंग सुरवसे, पांगरी, ता. बार्शी, जि, सोलापूर

यंदा १४ एकरांवर सोयाबीनची पेरणी केली होती. एकूण क्षेत्रापैकी दोन एकर सोयाबीनची काढणी केली अन् ऑक्टोबरमध्ये पाऊस सुरू झाला. सात एकर सोयाबीन अक्षरशः कुजून गेले. एकूण १० कट्टे सोयाबीन झालं, ते पण डागाळलेलं. यंदा उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब नाही. एकरी दहा ते पंधरा हजार खर्च झाले, काय हिशेब करावा? 
- जयप्रकाश तोष्णीवाल, तेलगाव, ता. धारूर, जि. बीड

यंदा तीन एकरांवर सोयाबीन होतं. दरवर्षीचा अनुभव पाहता किमान एकरी आठ क्विंटल उत्पादन होईल असं वाटलं; पण पावसाने घात केला. साडेतीन हजार रुपये एकराने सोयाबीन काढायला दिलं अन् पाऊस लागून बसला. पूर्ण सोयाबीन पावसाने सडून गेलं. खर्च निघंल म्हणून निवडून निवडून जमा केलेल्या सोयाबीनच्या काडांतून सहा गोण्या सोयाबीन झालं. त्याचा इतका वास येतो की सहन होत नाही. एकरी दहा हजार खर्च झाले. काढणीला तीन एकरांत दहा हजार पाचशे गेले आणि हाती दहा गोण्या सडकं सोयाबीन पडलं, काय करावं?
- सुजित हर्षे, पाथरवाला खुर्द, ता. अंबड, जि. जालना

चालू वर्षी २ एकर सोयाबीन होती. मात्र पावसामुळे नुकसान फार झाले. दरवर्षी १४ ते १५ क्विंटल एकरी उत्पादन मिळते. मात्र काढणीनंतर सोयाबीनचे एकरी उत्पन्न घटून ते एकरी ६ क्विंटलवर आले आहे. सोयाबीनची प्रतवारी ढासळली असून ती काळवंडली आहे. खराब झाल्याने दारात मोठी तफावत येत आहे. त्यामुळे चालू वर्षी सोयाबीनचे पीक अडचणीचे ठरले आहे.
- सुनील ठोक, खडांगळी, ता.सिन्नर, जि. नाशिक

 
    

 

 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई  : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...
शेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...
माॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...
शेतमाल खरेदीत सुधारणा कधी?कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...
शेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...