‘मागचं साल बरं होतं, म्हणायची येळ आली!'

सोयाबीन नुकसान
सोयाबीन नुकसान

घारेगाव, जि. औरंगाबाद : ‘‘नेमकं पावसापूर्वीच सोयाबीन सोंगून टाकलं, मशीनमध्ये टाकून मोंढ्यावर न्यायचं व्हतं. पण त्याआधीच वैऱ्यासारखं पावसानं गाठलं. अन्‌ सगळा सत्यानास झाला. सोंगलेल्या सोयाबीनचं दाणं काळं पडलं, कोम उगवून आलं. काय सांगावं, कशाचं पैसं करावं अन्‌ कुठून पैसं आणावं. आपल्याजवळ नाहीच काही, तं कोण ओळखणार आपल्याला?'' पैठण तालुक्‍यातील घारेगावचे शेतकरी काकासाहेब शेषराव थोरे व्यथा मांडत होते. दिवाळी उलटली, पण घरात अजून कोणताच माल आला नाही. दुष्काळ असूनही मागचं साल बरं होतं, म्हणायची येळ आली. तेव्हा सहा क्विंटल कापूस पिकला होता, अशी कैफियत याच गावातील शेतकरी शिवाजी थोरे यांनी मांडली. काकासाहेब म्हणाले, ‘‘कुटुंबाकडं साडेबारा एकर शेती. चार एकर सोयाबीन, दोन एकर मका, एक एकर बाजरी, तीन एकर कपाशी अशी पिकं. पण यंदा काढणी, वेचणीच्या हंगामात लागून बसलेल्या पावसानं घात केला. निसर्गानं केलेली इतकी बेकार परिस्थिती मी आजवर पाहिली नाही. पंचनाम्यासाठी अजून कुणी फिरकलं नाही शेतात. आता जनावराच्या चाऱ्याची सोय कशी लावावी हा प्रश्न आहे. वाट बघायची सरकारनं काही केलंत हाये, आपणं काय करू शकतो. उचलले कर्ज जास्त अन माफी दीड लाखाची, उर्वरीत भरण्याची ताकद नसल्यानं त्यात अजून बसलो नाही. २०१२ पासून सारखं शेतीवर आघात सुरू आहेत. या सात वर्षांत मोसंबी बाग गेली, आंबा बाग गेली. जगणंच अवघडं होऊन बसलं.’’ शिवाजी विनायक थोरे म्हणाले, की माझं साडेतीन एकर सोयाबीन होतं. सारं पावसानं भिजलं. त्यातून आता काहीच हाती लागणार नाही. सुरुवातीला पाऊस चांगला होता. मध्यात थांबल्यानं पिकं अडचणीत आली होती. पुन्हा थोडा झाल्यानं थोडा खेळ जमल्यासारखं वाटलं. पण काढणीच्या येळंला लागून बसल्यानं सोयाबीनचं आलेलं पीक डोळ्यादेखत नाहीसं झालं. तीस-चाळीस हजार खर्च झाले. तीन साडेतीन एकरांतच सरकी. तिचीही अवस्था बिकट. फुटलेला कापूस भिजला. खाली पडला. आता वेचायला जड चाललंय. सरकीला कोंब फुटले. ५० हजार सरकीवर खर्च झाले. दिवाळी उलटली पण घरात अजून कोणताच माल आला नाही. मागच्या वर्षी बरं होतं, म्हणायची येळ आली. पंचनामे झाला, त्यांनी क्षेत्र लिहून घेतलं.’’  शिवाजीराव यांचा मुलगा भरत म्हणाला, ‘‘शिक्षण घेऊन मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होतो. परंतु त्यात यश न मिळाल्याने दुसरं काही करण्यापेक्षा शेतीकडे वळलो. उमेद होती, जोम होता, म्हणलं शेती करून पाहू. पण शेतीत यंदा तर अशी बेक्‍कार परिस्थिती झाली की काय सांगावं? बियाणं, खत बाहेरून, मजूरही लागले. शेतीवर खर्च होउन बसला अन्‌ आता तर सोयाबीनला मोडं फुटलेत, ते काळं पडलयं. पंचनामे झाले, अधिकारी आले पाहून गेले, त्यांना किती टक्‍के नुकसान झालं विचारलं, पण ते काही बोलले नाही. गेल्या दिवाळीपूर्वी सहा क्‍विंटल कापूस घरात आला होतां यंदा दिवाळी संपली तरी अजून हातात काहीच नाही.’’ सोयाबीनची दैना! मराठवाड्यात ५० लाख २० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.त्यापैकी ४१ लाख४९ हजार हेक्टरवरील पिक अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झाले होते.या नुकसान झालेल्या पिकांपैकी १९ लाख ६६ हजार ७३ हेकटर क्षेत्र सोयाबीनचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com