अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावर

थंड रात्र व उबदार दिवस, असे वातावरण झाल्यास उसातील ग्लुकोज व फ्रुक्टोज यांचे रूपांतर सुक्रोजमध्ये (साखर) होते. या वातावरणामुळे विद्राव्य घनपदार्थ वाढीस लागतात. साधारणपणे ऑक्टोबरपासून असे वातावरण उसाच्या पिकाला अपेक्षित असते. पण, यंदा हे सगळे चक्र बिघडून गेले आहे. थंडी उशिरा सुरू झाली. दिवस अतिशय उष्ण असल्याने साखर तयार होण्याची प्रक्रिया अडखळत आहे. रात्रीही थंडी नियमित नसल्याने एकूण सर्व हवामानाचा परिणाम साखरेचा उतारा घटण्यावर होत आहे. - डॉ. अशोक पिसाळ, विस्तार विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
sugarcane crushing
sugarcane crushing

कोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस पट्ट्यामध्ये थंडीचा जोर कायम रहात नसल्याने उसाची रिकव्हरी (साखर उतारा) वाढीची अपेक्षा फोल ठरली आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीच्या मध्यापर्यंत रिकव्हरीत अपेक्षित वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंतही सरासरी एक टक्का रिकव्हरीची तूट कायम राहिल्याने राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दररोज सुमारे ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन कमी होत आहे.  जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्याअखेरच्या गाळप आकडेवारीनुसार राज्यात दररोज साडेपाच लाख टन उसाचे गाळप होत आहे. या कालावधीचा राज्याचा सरासरी उतारा १०.२७ टक्के इतका आहे. हंगामाच्या प्रारंभी हा उतारा ९.७ टक्के इतका होता. हंगामाचा सारासार विचार करता या कालावधीमध्ये राज्याचा सरासरी उतारा ११ टक्क्यांहून अधिक असायला हवा होता. परंतु, अजूनही उतारा अकरा टक्क्यांपर्यंत गेला नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात थंडीने दिलेला चकवा हेच आहे.   गेल्या पंधरवड्याचा विचार केल्यास थंडीचे प्रमाण अनियमित आहे विशेष करून ज्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उसाचे गाळप होते त्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पारा २५ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. एक-दोन दिवसाआड एखादा दिवस थंडी पडत असल्याने याचा विशेष उपयोग उसाची रिकव्हरी वाढण्यावर होत नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाची वाढ जवळजवळ पूर्ण झाली आहे. अनेक कारखान्यांनी आडसाली ऊस तोडणीला ही प्रारंभ केला आहे.  मकर संक्रांतीनंतर थंडीचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे प्रत्येक वर्षाच्या अनुभवाचा विचार केल्यास एखाद्या आठवड्याचा अपवाद वगळता थंडीचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे .  उत्पादनात दररोज ५५ हजार क्विंटलची घट एक टक्का रिकव्हरी घटल्यास दहा किलो साखर कमी येते. सध्या राज्यात १४२ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यातून दररोज साडेपाच लाख टन उसाचे गाळप होत आहे. रिकव्हरी घटल्याने कमी होणारी दहा किलो साखर गृहीत धरल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत दररोज सुमारे ५५ हजार क्विंटल साखर कमी उत्पादित होत आहे. ही तूट हंगाम संपेपर्यंत कायम राहण्याचा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे. प्रतिक्रिया

अनियमित थंडी असल्याने ज्या प्रमाणात रिकव्हरी वाढायला हवी होती तेवढी वाढली नाही. जानेवारी अखेरपर्यंत सलग थंडी राहिल्यास काही प्रमाणात रिकव्हरी वाढू शकते, पण यात सातत्य आवश्यक आहे - गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com