कास पठार फुलांनी बहरण्यास प्रारंभ

कास पठार फुलांनी बहरण्यास प्रारंभ
कास पठार फुलांनी बहरण्यास प्रारंभ

कास, जि. सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्प पठारावर रंगबिरंगी फुलांचा गालीचा तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने शनिवारपासून (ता.३१) हंगामाची अधिकृत सुरवात झाली आहे. 

पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय घाटाई फाट्यावर करण्यात आली आहे. वाहने तेथेच ठेवून पठारावर समितीच्या बसने जावे लागेल. पठारावर ‘नो-पार्किंग झोन'' तयार करण्यात आला आहे. पठारावर वाहन नेल्यास दंड आकारला जाणार आहे. फुलांची अथवा साधनांची नासधूस केल्यास उपद्रव शुल्क म्हणून ५०० ते १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

पर्यटकांसाठी अचानक पाऊस आल्यास किंवा पर्यटकांच्या विश्रांतीसाठी कास पठारावरील टोलनाका, राजमार्गावर शेड उभारण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांची सोयही तिथे आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी १३७ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. पठारावर मोबाईल ‘रेंज'' मिळत नसल्यामुळे ‘वॉकीटॉकी''द्वारे संपर्क करण्यात येईल. 

पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊन सर्व व्यवस्थेवर ताण येतो. तसेच फुलांचेही नुकसान होते. हे टाळण्यासाठी नियंत्रित पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑनलाइन बुकिंग www.kas.ind.in या साईटवर उपलब्ध आहे. याद्वारे दिवसाला तीन हजार पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. तसेच या वर्षी कास पठार परिसर दर्शन बससेवा ही विशेष बस सुरू करण्यात येणार आहे. घाटाई फाटा, कास तलाव, वजराई धबधबा, अंधारी, सह्याद्रिनगर, एकीव हा या बसचा मार्ग राहील. येथील प्रसिद्ध ठिकाणे दाखवण्यात येतील. यंदा पर्यावरणपूरक पर्यटनासाठी कासच्या टोलनाक्‍यावर सायकली ठेवण्यात येतील. त्या वापरण्यासाठी प्रतितास १०० रुपये शुल्क आकारण्यात  परंतु, त्यासाठी ओळखपत्र देणे आवश्‍यक राहील. 

पांढरे गेंद, निळी सीतेची आसव...  कासवर सद्यःस्थितीत पांढरे गेंद, किटकभक्षी निळी सीतेची आसव, निळे जांभळे आमरीचे दोन तीन प्रकार, जांभळा तेरडा, पिवळी सोनकी, टुथब्रश, वायतुरा, रानहळद, नीलिमा, अबोलिमा आदी फुलांच्या जाती आहेत. पठार पूर्णपणे आच्छादित होण्यासाठी अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com