अकोल्यात पीककर्ज वाटपाचा टक्का घसरला

अकोल्यात पीककर्ज वाटपाचा टक्का घसरला
अकोल्यात पीककर्ज वाटपाचा टक्का घसरला

अकोला ः पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतशिवारातील कामे जोमाने सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या हातात मात्र पैसा नाही. खरीप हंगामासाठी दिलेल्या कर्ज वाटपाच्या लक्ष्यांकातील २० टक्केसुद्धा पीककर्ज शेतकऱ्यांना मिळालेले नाही. जिल्ह्यात केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेच सर्वाधिक १९२ कोटी रुपये वाटप केले आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व बँका मिळून १३९८ कोटी रुपये वाटपाचे लक्ष्यांक दिला आहे. त्यापैकी केवळ १९ टक्के म्हणजे २६८ कोटी ३९ लाख रुपयांचेच वाटप आतापर्यंत झाले आहे. अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ७४ हजार ८४७ शेतकऱ्यांना १३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून विविध बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. आता जून महिना शेवटच्या टप्प्यात आला आहे. तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना पीककर्जवाटप केवळ २० टक्क्यांच्या आत अडकलेले आहे. २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकऱ्यांना २६८ कोटी ३९ लाख रुपये वाटप झाले होते. जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ४७३ शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे.  जिल्ह्यात वर्षात दुष्काळ जाहीर झालेला आहे. अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. पंतप्रधान सन्मान योजनेची मदत मिळायची आहे. अशा स्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जाशिवाय पर्याय नाही. या आठवडयात पावसाने हजेरी दिली. परिणामी, काही ठिकाणी पेरणीची तयारी केली जात आहे. जिल्ह्यात पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या आघाडीवर आहे. या बँकेने उद्दिष्टापैकी १९२ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी अवघे १० टक्के म्हणजेच ४९.६१ कोटी रुपये वाटप केले आहे.   बँकांनी पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याचे निर्देश यापूर्वी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु ही कर्ज वाटपाची गती वाढवायला काही बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. गेल्या वर्षीही बँकांनी हंगामात पीककर्ज वाटपात मोठी आडकाठी तयार केली होती. काही बँकांमधून शासकीय खाती काढून घेण्याची कारवाईसुद्धा करण्यात आली होती. तरीही तेव्हा पीककर्ज वाटपाची गती वाढली नव्हती. याही वर्षी बँकांचा असाच प्रतिसाद मिळू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.   बँकानिहाय पीककर्ज वाटपाची आकडेवारी दृष्टिक्षेपात  

बँक उद्दिष्ट वाटप टक्केवारी शेतकरी
जिल्हा बँक ६७९.२५  १९२.६२ २८ २३१७१
राष्ट्रीयकृत बँका ५२०.७९ ४९.६१ १० ४८७४
खासगी बँका ५९.९ ११.५    १९ ६२०
ग्रामीण बँका १३९.६५ १५.११ ११ १५११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com