खानदेशात केळी लागवडीत घट होण्याची शक्‍यता

खानदेशात केळी लागवडीत घट होण्याची शक्‍यता
खानदेशात केळी लागवडीत घट होण्याची शक्‍यता

जळगाव ः मृग बहर केळी लागवड खानदेशात सुरू आहे. परंतु, पाणीटंचाई व दरांच्या समस्येमुळे या मृग बहरातील लागवड कमी होईल, असा अंदाज आहे. खानदेशात मिळून सुमारे १५ हजार हेक्‍टरवर मृग बहरातील केळीची लागवड झाल्याची माहिती आहे.  केळीची लागवड बारमाही सुरू असते. परंतु मुक्ताईनगर, रावेर, यावल, पाचोरा, जामनेर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, शहादा, तळोदा व धुळ्यातील शिरपुरात अनेक शेतकरी जून अखेरीस (मृग बहर) केळी लागवड करतात.  या केळीची काढणी एप्रिलपर्यंत पूर्ण होते. पावसाळ्यात ही लागवड केली जात असल्याने पाणी कमी लागते. परंतु, या हंगामात उष्णता अधिक राहिली. तसेच, केळी दरांचा तिढा मे पासून सुरू झाला. यामुळे मृग बहरातील केळी लागवड रावेर, मुक्ताईनगर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा येथेच सुरू आहे. यावलमध्ये टंचाईचा फटका बसल्याने या भागातील न्हावी, हंबर्डी व मोर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये केली लागवड कमी झाल्याचे सांगण्यात आले. तापीनदीकाठी मुबलक जलसाठे असल्याने या भागात लागवड सुरू आहे.  मुक्ताईनगर, रावेर भागांत कमाल शेतकऱ्यांनी गादीवाफा तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, हे गादीवाफे तयार करून लागलीच ठिबकही त्यात टाकण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी मेमध्ये लागवड केली.  या केळीला उष्णतेपासून संरक्षणासाठी धैंचाची लागवड केली. जळगाव जिल्ह्यातील रावेरात मृग बहरातील केळी लागवड सुमारे १६ ते १७ हजार हेक्‍टरपर्यंत होईल. त्यापाठोपाठ मुक्ताईनगरात साडेचार हजार हेक्‍टरवर, यावलमध्ये अडीच ते तीन हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील भडगाव, पाचोरा व जामनेरातही लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

आमच्या भागात मृग बहर केळी लागवड जूनच्या मध्यापासून सुरू आहे. सध्या ढगाळ व थंड वातावरण तयार होण्याची स्थिती असल्याने लागवड वेगात सुरू होईल. आमच्या भागात लागवड स्थिर राहील. कारण तापी नदीकाठामुळे जलसाठे बऱ्यापैकी आहेत.  - विशाल महाजन, शेतकरी, नायगाव (जि. जळगाव)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com