‘एनएचबी’च्या ‘एमडी’ची अखेर उचलबांगडी

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ

पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालकांची केंद्र शासनाने अखेर उचलबांगडी केली आहे. या अधिकाऱ्याकडून देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले जात होते. त्यामुळे संतप्त झालेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. विविध राज्यांमधील फलोत्पादनाला चालना देण्यात राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (एनएचबी) मोलाची भूमिका बजावते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार असताना मंडळाकडून सर्वांत जास्त अनुदान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, भाजपचे बिहारमधील नेते राधामोहन सिंह यांची कृषिमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर हे ‘एनएचबी’चे अधिकारी मोकाट सुटले. एनएचबीमधील महाराष्ट्रविरोधी लॉबीने राज्यस्तरीय अनुदानवाटपात कपात केली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यात पुन्हा एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे डॉ. एम अरिज अहमद या हेकेखोर आयएएस अधिकाऱ्याकडे आल्यानंतर ‘अनुदान नको पण अधिकारी आवर’ अशी अवस्था एनएचबीची झाली. अहमद यांनी अनुदान वाढ सोडाच; पण मंजूर झालेले प्रस्ताव रद्द करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन एनएचबीच्या अनुदानाच्या आशेवर बसलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. “एनएचबीच्या कामकाजाबाबत शेतकरी व उद्योजकांनी केंद्रीय परिवहन रस्ते व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांना काही महिन्यांपूर्वी लेखी तक्रार पाठवून अहमद यांना हटविण्याची मागणी केली होती. त्यामुळे अहमद यांची गच्छंती अटळ होती,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. श्रीनिवास यांच्याकडे एनएचबीची सूत्रे एनएचबीचे मुख्यालय हरियानात गुडगाव येथे आहे. आसाम केडरचे अहमद हे केंद्रातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी समजले जात होते. केंद्रीय कृषी मंत्रालयात सहसचिव म्हणून कामकाज पाहिलेले अहमद स्वतः कृषी पदवीधारक व कृषी क्षेत्रातील अभ्यासक असूनही शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्यामुळे अधिकारीदेखील चक्रावून गेले होते. ‘शेती तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान नाकारावे’, असा विचित्र फतवा अहमद यांनी काढल्यानंतर एनएचबीच्या विरोधात देशभर संतापाचे वातावरण पसरले होते. अहमद यांच्या जागी याता बी. श्रीनिवास या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com