कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार नाहीत

तूर नुकसान
तूर नुकसान

परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली आमदनी होईल, कर्ज फेडता येईल, असं वाटलं होतं. पण, पावसानं तुरीमध्ये पाणी साचून राहिलं. नुकसान कमी करण्यासाठी दहाची मोटार लावून शेताबाहेर पाणी काढलं. पण, काहीच उपयोग झाला नाही. जमिनीतलं पाणी हटलं नाही. जेवढ्याला तेवढं येत राहील. फुलगळ झाली, पानगळ झाली. तुरीच्या नुसत्या तुराट्या शिल्लक राहिल्या. कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्यादेखील होणार नाहीत. जळतनं म्हणूनदेखील वापरता येणार नाही, सालभर कसं धकवायचं याची चिंता आहे. कर्ज फेडणंही शक्य नाही, अशा शब्दांत मोरेगाव येथील तरुण शेतकरी श्‍याम मगर यांनी व्यथा मांडली.  परभणी जिल्ह्यातील श्‍याम श्रीधरराव मगर यांच्या कुटुंबाची मोरगाव (ता. सेलू) शिवारात दोन ठिकाणी मिळून एकूण ३५ एकर जमीन आहे. त्यापैकी २२ एकर जमीन दुधना नदीकाठच्या भागात आहे. दोन वर्षांपूर्वी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे मगर यांची संपूर्ण पिके पाण्याखाली गेली होती. यंदा नदीला पूर आला नाही. परंतु, पाणी साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले. मगर यांनी यंदा १० एकरवर तूर आणि सोयाबीन आंतरपिकाची पेरणी केली. त्याशेजारी १२ एकरवर तूर अधिक कापूस लागवड केली. या भागात सुरुवातीला पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस पडत होता. परंतु, संपूर्ण पावसाळ्यात पडला नाही तेवढा पाऊस यंदा सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये पडला. शेतात पाणी साचले. मोठे बांध असल्यामुळे ते फोडून पाणी बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे मगर यांनी १० एचपीचा विद्युत पंप लावून सलग १३ दिवस तुरीच्या शेतातील पाण्याचा उपसा केला. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. दहा एकरावरील तूर आणि सोयाबीनमध्ये पाणी साचून राहिल्याने हाती आलेले पीक वाया गेले. बियाणे, खते, फवारणी, मशागत, मजुरी मिळून दहा एकरामध्ये दीड लाख रुपयांवर खर्च झाला. तुरीचे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असते. सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले. सोयाबीन काढणीसाठी मजुरांना दहा हजार रुपये उचल दिली. परंतु, पाऊस सुरू झाल्यामुळे सोयाबीन काढता येईना आणि मजुरांना दिलेली दहा हजार रुपयांची उचल परत मागता येईना. सोयाबीनला मोड फुटले. एकरी ८ ते ९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यंदा भिजल्याने वजनही कमी भरणार, डागील मालाची व्यापारी भाव पाडून खरेदी करीत आहेत. कापसाचे पहिल्या बहराचे २५ ते ३० बोंडे फुटली. वेचणी करता आली नाही. सरकीला मोड फुटले. एकरी ४ ते ५ क्विंटलचे नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील उभे पीक नष्ट कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार राज्यात तुरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ हेक्टर आहे. यंदा १२ लाख ७ हजार ४७७ हेक्टरवर (९७ टक्के) तुरीची पेरणी झाली आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी सोयाबीन अधिक तूर तसेच तूर अधिक कापूस या आंतरपीकपद्धतीचा अवलंब करतात. लवकर येणाऱ्या वाणांचे तुरीचे पीक सध्या गाठी धरण्याच्या तसेच फुलोरा अवस्थेत आहे. उंच, माथ्यावरच्या जमिनीवरील फुले लागण्याच्या अवस्थेतील तुरीचे पावसामुळे फारसे नुकसान झाले नाही. परंतु ओढे, नाले, नद्यांकाठच्या तसेच सखल भागातील शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने तूर पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने मुळकुज होत आहे. हजारो हेक्टरवरील तुरीचे उभे पीक नष्ट होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com