बीडमध्ये ५२ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रांवरच पडून

बीडमध्ये ५२ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रांवरच पडून

औरंगाबाद  : बीड जिल्ह्यातील चौदा तूर खरेदी केंद्रांवर ७२ हजार ८४७ क्‍विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या तुरीपैकी केवळ वीस हजार क्‍विंटल तूर गोदामात पोचली असून, जागेअभावी तब्बल ५२ हजार क्‍विंटल तूर खरेदी केंद्रांवरच पडून आहे. दुसरीकडे खरेदी केलेली तूर गोदामात न गेल्याने शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या तुरीचे वेळेत चुकारे मिळण्यातही अडचण निर्माण झाली आहे. 
मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद व जालना या चार जिल्ह्यांतील ३२ खरेदी केंद्रांवरून १२ हजार ९०१ शेतकऱ्यांच्या १ लाख ३० हजार ८०२ क्‍विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आली. दुसरीकडे एकट्या बीड जिल्ह्यातील चौदा खरेदी केंद्रांवरून ७७३८ शेतकऱ्यांच्या ७२ हजार ८४७ क्‍विंटल तुरीची हमी दराने खरेदी करण्यात आली आहे. जसजसा तूर खरेदीला वेग येत आहे, तस तसा तूर साठवणुकीचा प्रश्‍नही निर्माण होतो आहे.
जिल्ह्यातील गेवराई केंद्रावरून सर्वाधिक १२२४ शेतकऱ्यांकडून १३ हजार ३३० क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अंबाजोगाई खरेदी केंद्रावरून ७२७ शेतकऱ्यांची ९२३१, आष्टी केंद्रावरून १०३७ शेतकऱ्यांची ९०२६, बीड येथील खरेदी केंद्रावरून ९५४ शेतकऱ्यांची ८७६६, माजलगाव केंद्रावरून ६८९ शेतकऱ्यांची ७४०४, पाटोदा केंद्रावरून ४४१ शेतकऱ्यांची ३०२४, कडा येथील केंद्रावरून ६०० शेतकऱ्यांची ४८०१, केज केंद्रावरून १४१ शेतकऱ्यांची १४६९, धारूर केंद्रावरून २५७ शेतकऱ्यांची २०२८, शिरूर केंद्रावरून ६७७ शेतकऱ्यांची ५०२४ , परळी केंद्रावरून २९५ शेतकऱ्यांची ३१२५, वडवणी केंद्रावरून ४२७ शेतकऱ्यांची ३१९२, पारनेर केंद्रावरून १३३ शेतकऱ्यांची ८५९ क्‍विंटल तर बर्दापूर खरेदी केंद्रावरून १३६ शेतकऱ्यांची १५६३ क्‍विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या एकूण तुरीपैकी केवळ २० हजार ५८९ क्‍विंटल तूर गोदामात साठविण्यात आली आहे. तब्बल ५२ हजार २५८ क्‍विंटल तूर अजूनही खरेदी केंद्रावरच पडून आहे. सर्वाधिक तूर खरेदी करणाऱ्या गेवराईच्या केंद्रावरील ९३०० क्‍विंटल तूर गोदामात साठविणे बाकी आहे. अंबाजोगाई केंद्रावर खरेदी केलेल्या ७ हजार ६२६ क्‍विंटल तुरीलाही अजूनही साठवणीसाठी जागा मिळालेली नाही. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे देण्यावर होत  आहे. 
बीड जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावरून हरभऱ्याची हमीभावाने खरेदी व्हावी म्हणून ९६९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये अंबाजोगाई केंद्रावर सर्वाधिक ३३३, आष्टी येथील ९६, धारूर येथील १, गेवराई येथील २, कडा येथील दोन केंद्रांवर अनुक्रमे ५५ व १७१, केज येथील १२, माजलगाव येथील १८५, परळी येथील ८२ तर पाटोदा येथील केंद्रावर नोंदणी केलेल्या ३२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com