द्राक्ष शेतीला व्यूहात्मक युक्तीची जोड आवश्‍यक: विलास शिंदे

विलास शिंदे
विलास शिंदे

पुणे ः राज्यात मान्सूनोत्तर पावसाने दाणादाण उडवून दिली. खरीप पिकांसह फळपिकांचेही मोठे नुकसान झाले. यात द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला. पावसाने शेतकऱ्यांच्या हातून संपूर्ण हंगामाच हिरावून घेतला. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान होऊन उत्पादक हतबल झाले आहेत. उत्पादनाची उमेद सोडलेल्या शेतकऱ्यांना आणि पावसाच्या चक्रात सापडलेल्या द्राक्ष शेतीला उभारी देण्यासाठी सह्याद्री फार्म्सचे एमडी विलास शिंदे यांनी पुन्हा उभारी देण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत.

नव्या व्हरायटींना प्राधान्य द्यावे बेमोसमी पाऊस, प्रतिकूल हवामानात पारंपरिक द्राक्ष व्हरायटी आता तग धरत नाहीत. बेमोसमीच्या तडाख्यात टिकू शकतील; पाऊस झाला तरी फ्लॉवरिंग ड्रॉप होणार नाही; घड जिरणार नाहीत किंवा माल तयार झाल्यावर क्रॅकिंग होणार नाही अशा ताकदीच्या नव्या व्हरायटीकडे आपल्याला वळावे लागेल. आगाप द्राक्ष शेतीचं देशातील आगार असलेल्या सटाणा-मालेगाव तालुक्यांतील आजघडीच्या बहुतेक व्हरायटी मोठ्या प्रमाणावर फेल जाताना दिसताहेत. या तुलनेत क्रिमसन व्हरायटीत नुकसान कमी आहे.

फ्लॉवरिंगच्या स्टेजमधील मोजक्याच क्रिमसन बांगामध्ये नुकसान दिसतेय. गेल्या पंधरवड्यात इतर व्हरायटींसारख्या क्रिमसन बागा बसल्या नाहीत. हा त्या व्हरायटीचाच गुणधर्म आहे. याच बरोबर आरा - १५ व्हरायटीदेखील चांगल्याप्रकारे टिकाव धरत आहे. गेल्या पंधरवड्यातील प्रतिकूल वातावरणात आरा १५ चे काही घड जिरले, पण गरजेचे तेवढे घड टिकले आहेत. समजा आणखी पाऊसमान वाढले आणि पूर्ण नुकसान झाले तरी पुनर्छाटणी करून नव्याने बहर घेता येतो. यात दोन महिने वाया जातात. पण, पूर्ण हंगाम वाया जात नाही. म्हणजे डाळिंबासारखी वर्षभर हंगाम घेता येणारी आरा १५ ही व्हरायटी कसमादे पट्ट्यासाठी एक पर्याय ठरू शकते.

फळ उत्पादकांनीच सुरू कराव्यात विम्या कंपन्या  गेल्या पाच-सहा वर्षांपासून द्राक्ष विम्यावर आपण चर्चा करतोय. पण, फुल्लप्रूफ विम्याबाबत ठोस मार्ग आपण अद्याप काढू शकलो नाहीत. या संदर्भात थोडा ''आऊट ऑफ बॉक्स'' विचार करणे गरजेचे आहे. आपण द्राक्ष उत्पादक वा सर्व फळ उत्पादक एकत्र येत पीकविमा कंपनी स्थापन करू शकलो, तर ते पुढचे पाऊल असेल. आपल्या मालकीची कंपनी असेल तर गरजेप्रमाणे आपण फळपिकांसाठी विमा प्रॉडक्ट तयार करू शकतो. त्याची प्रभावी अंमलबजावणी करू शकतो. यामुळे आजघडीला बाजारात असणाऱ्या अन्य विमा कंपन्यांनाही स्पर्धा तयार होऊन त्यांची विमा प्रॉडक्ट अधिक व्यवहार्य व स्पर्धाक्षम होतील. भविष्यात अशा पद्धतीनेच मार्ग काढावे लागतील.

सह्याद्रीसारख्या राज्यात ४०-५० कंपन्यांची आवश्यक राज्यात ८० हजार द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. त्यातील ५० हजार शेतकरी एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. आजच्या प्रतिकूल नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी किंवा मार्केट संबंधित समस्या सोडवण्यासाठी एकत्र यावे लागेल. पुढे वित्तसाह्य, विमासंरक्षण अशा नव्या गोष्टींसाठी एक विचार क्रमप्राप्त आहे. नाशिक जिल्ह्यात १२०० शेतकऱ्यांची सह्याद्री फार्म्स कंपनी उभी राहिली. अशा ४०-५० कंपन्या महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आणि त्यात समन्वयाने कामकाज होत राहिले तरच द्राक्ष शेती शाश्वत आणि किफायती होईल. 

जोखीम कमी करणे गरजेचे द्राक्ष शेती दिवसेंदिवस खर्चिक होत चालली आहे. पॉलिहाउसमधील पिकांचा अपवाद सोडला तर सर्वाधिक गुंतवणूक व उत्पादन खर्च असलेले द्राक्ष हे एकमेव फळपीक आहे. एकरासाठी चार-पाच लाख रुपये प्राथमिक भांडवली खर्च करतो. पुढे बहारासाठी एकरी दोन-तीन लाख रुपये उत्पादन खर्चरूपी खेळते भांडवल लागते. या प्रक्रियेत एकरी किमान चार लाख कर्ज आपण उचलतो. दोन एकरांच्या शेतकऱ्यावर अशा पद्धतीने आठ-दहा लाखांचे कर्ज सहजच होते. अशा प्रकारे बॅंकेचे ओझे घेऊन जेव्हा आपण काम करतो, त्या वेळी उत्पादन ते विक्रीसंदर्भात शाश्वत अशी व्यवस्था उभारणे गरजेचे ठरते.

आज अन्नधान्य वा अन्य भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे, पण नुकसानीची तीव्रता द्राक्ष शेतीत अधिक दिसते. म्हणूनच, याबाबत अधिक व्यवहार्य धोरणे आपण आखली पाहिजेत. २००९ चे फयान ते आजचे महा चक्रीवादळ अशा दहा-अकरा वर्षांतील प्रतिकूलतेला टक्कर देत आपण उभे राहिलो आहोत, हार पत्करली नाही. हा लढाऊ बाणाच पुढे घेऊन जाणार आहे. त्यास आता व्यूहात्मक युक्तीची जोड दिली पाहिजे. सर्वांनी एकत्र येत ताकद उभी केली पाहिजे आणि ही ताकद नव्या व्हरायटी, विमा संरक्षण, भांडवल उभारणी, मार्केटिंग आदी जोखीम कमी करणाऱ्या उपायांसाठी वापरली पाहिजे. मागच्या ५० वर्षांत आपल्या आधीच्या पिढ्यांनीही अशा प्रकारे सामूहिक सुधारणा करत इथपर्यंतचा टप्पा गाठण्यास आपल्याला सक्षम केले आहे. ही परंपरा पुढे न्यायची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com