तापी काठालगतच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा

तापी काठालगतच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
तापी काठालगतच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा

रावेर, जि. जळगाव : तापी आणि पूर्णा नद्यांच्या उगमस्थानाकडे मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे रावेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील खिरवड-नेहता, ऐनपूर- निंबोल, निंभोरासिम - विटवा या दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून, या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, अमळनेर या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तापी नदीवरील मुक्ताईनगर (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे सोमवारी (ता. २९) सायंकाळी उघडण्यात आले. नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रावेर तालुक्‍यातील खिरवड येथील काही ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी सोमवारी (ता. २९) हलविण्यात आले आहे.  रावेरातील तालुक्‍यातील नेहता आणि खिरवड या गावांमध्ये असलेल्या पुलावर तापी नदीच्या पुराचे पाणी वाढण्यास सुरवात झाली होती. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत या पुलावर सुमारे वीस फूट पाणी होते. या पुरामुळे नेहता भागाकडील शेती शिवार पाण्याखाली आले असून, पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच महेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान तालुक्‍यातील ऐनपूर आणि निंबोल या गावांच्या रस्त्यावरदेखील तापी नदीच्या पुराचे पाणी पसरले आहे. या भागात असणाऱ्या केळीच्या आणि पेरूच्या बागात पुराचे पाणी शिरले आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुक्‍यातील निंभोरासीम आणि विटवा दरम्यान रस्त्यावरही पुराचे पाणी आले आहे. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सायंकाळी हतनूर प्रकल्पाला भेट देऊन पूर परिस्थितीची माहिती घेतली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी खिरवड, नेहता, लूमखेडा, निंभोरासिम, विटवा या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. केळी बागांचे नुकसान  हतनूर धरणाचे बॅकवॉटर शिवारात शिरले. यामुळे तालुक्‍यातील विटवा, निंबोल, ऐनपूर, अजनाड, नेहेते, खिरवड, निंभोरासीम आदी गावांत नदीकाठचे केळी पीक पाण्याखाली आले आहे. केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com