खानदेशात धरणांमधील पाण्याची आवक घटली

खानदेशात धरणांमधील पाण्याची आवक घटली
खानदेशात धरणांमधील पाण्याची आवक घटली

जळगाव  ः खानदेशातील रंगावली, अनेर, पांझरा हे प्रकल्प वगळता इतर मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची आवक मागील दोन दिवसांत घटली आहे. गिरणा धरणातील आवक मंगळवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता ३.३८ क्‍यूबिक मीटर प्रतिसेकंद एवढी होती. वाघूरमधील आवकही कमी झाली असून, या प्रकल्पांमधील जलसाठ्यात मंगळवारी फारशी वाढ झाली नाही.   वाघूरमध्ये मंगळवारी सकाळी १.६१ क्‍यूबिक मीटर प्रतिसेकंद, अशी पाण्याची आवक होती. सोमवारी सकाळी या प्रकल्पातील साठा ३९.१६ टक्के एवढा होता. तर मंगळवारी सकाळी या प्रकल्पातील साठा ३९.६३ टक्के एवढाच झाला. अर्थातच २४ तासात या प्रकल्पाची जलपातळी फक्त ०.४७ टक्के एवढीच वाढ झाली. गिरणा धरणातील साठा सोमवारी सकाळी ७३.०१ टक्के एवढा होता. तर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यातील पाण्याची टक्केवारी ७३.६४ टक्के एवढीच होती. ०.६३ टक्के एवढाच जलसाठा गिरणा धरणात गेल्या २४ तासात वाढला. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यातील हरणबारी व केळझर हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर चणकापूरमध्ये ६६.५० टक्के साठा आहे. या तिन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग घटविल्याने गिरणा धरणातील आवक कमी झाली आहे. गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊसही थांबल्याने आवक कमी झाली आहे. पाऊस न आल्यास आवक शून्यावर येईल, असे सांगण्यात आले.  वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रातही पाऊस नाही. या प्रकल्पावर जळगाव, जामनेर शहरासह काही कारखान्यांना पाणीपुरवठ्याची मदार आहे. तसेच जळगाव, भुसावळ तालुक्‍यांतील शेतीलादेखील वाघूरमधून सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाते.  जळगाव जिल्ह्यातील गूळ, धुळे जिल्ह्यांतील अनेर, पांझरा या प्रकल्पांमधील आवक बऱ्यापैकी आहे. पांझरा व अनेर नदीचा पूर ओसरला असला तरी नदीत पाण्याचा मोठा जलप्रवाह येत आहे. दोन्ही प्रकल्पांचे दरवाजे मंगळवारीदेखील उघडे होते. नंदुरबारमधील रंगावली प्रकल्पातही पाण्याची आवक कायम असून, नदीत पाण्याचा मोठा प्रवाह कायम आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com