युवा सरपंचांना आस ग्रामविकासाची

युवा सरपंचांना आस ग्रामविकासाची
युवा सरपंचांना आस ग्रामविकासाची

आळंदी, जि. पुणे ः पूर्वी एकाच नेत्याकडून एखाद्या वाड्यातून गावाचा कारभार सुरू असायचा, पण आता आरक्षण, जागरूकता यामुळे गावगाड्याची परिस्थिती बदलली आहे. विशेषतः तरुण, सुशिक्षित सरपंचांचा सहभाग वाढतो आहे. थेट लोकनियुक्त सरपंचपद त्यासाठी अधिकच उपयोगी ठरत असल्याचे सांगताना सरपंच महापरिषदेमध्ये सहभागी अनेक तरुण सरपंच गावाच्या विकासाबाबत आपल्या कल्पना मांडत होते. शुद्ध पाण्याचा प्रकल्प, गावाच्या शिवारातील पाणी अडविणे असो की आरोग्य, शिक्षण याबाबत असलेली त्यांची संवेदनशीलता त्यांच्यातील ग्रामविकासाची आस दाखवून देत होती.

प्रत्येकाला गावाच्या विकासासाठी काही तरी करायचे आहे. प्रत्येक विभागातील प्रश्न वेगळे आहेत, विषय वेगळे आहेत. पण काम करण्याची इच्छा मात्र समान आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण यावर या तरुण सरपंचांचा भर आहे. नंदूरबार जिल्ह्यातील नटावदचे सरपंच संतोष गावित म्हणाले, की माझ्या गावासाठी पाण्याचे नियोजन मला करायचे आहे. स्वच्छता अभियानाबाबतही आम्ही गंभीर आहोत. गावाचा कारभार संगणकावर आणायचा आहे. लातूर जिल्ह्यातील धानोरीचे सरपंच गोविंद कदम गावासाठी झोकून देऊन काम करण्याची इच्छा केवळ गावातील लोकांमुळे होते, असे सांगतात. कोणत्याही योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आम्ही काही तरी करू शकलो. थेट लोकनियुक्त सरपंचपदामुळेही कामाला संधी मिळते आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील प्रमोद सावके यांनीही आपल्या गाव आणि कामाविषयी भरभरून सांगितले. गावात स्वच्छता अभियान राबवले. गाव ८० टक्के हागणदारीमुक्त केले आहे. गावातील अनिष्ठ चालीरिती बंद केल्याचे सांगताना कामाच्या दृष्टीने हायटेक ग्रामपंचायत करायची आहे, असे त्यांनी नमूद केले.

सातारा जिल्ह्यातील यशवंतनगरचे सरंपच निखिल सोनवणे हेही आताच थेट सरपंच म्हणून निवडून आले आहेत. ते स्वतः बीएस्सी, एम.बी.ए पदवीधर आहेत. गावाच्या विकासाच्या माझ्या मोठ्या कल्पना आहेत. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत वाढ केली पाहिजे, या योजनेतून गावाच्या विकास आराखड्याबरोबरच महिला बचत गटांसाठी रोजगाराकरिता प्राधान्य देणार आहोत. सुसज्ज ग्रामसचिवालय आणि गावाच्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने विविध उपक्रमही राबवायचे आहेत, असे त्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील शिरकलसचे सरपंच संजय भोसले यांनी मात्र १४ व्या वित्त आयोगाचा सध्याचा निधी कमी पडतो आहे. त्यात वाढ करावी, सरपंचांचे मानधन वाढवावे, सरपंच प्रतिनिधींमधून आमदार केला जावा, रोजगार हमी योजनेच्या कामात सुसूत्रता हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गावाच्या विकासाबाबत आम्ही आमचे व्हिजन ठेवलं आहे, त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे, असेही हे सरपंच सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com