प्रयोगशील फूलशेतीतून प्रगतीकडे वाटचाल

फूलशेतीची पाहणी करताना गावंडे दांपत्य
फूलशेतीची पाहणी करताना गावंडे दांपत्य

डाॅ. श्रीकांत गावंडे हे वसमत येथील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक. शेतीच्या अावडीतून त्यांनी दीड एकर शेतीमध्ये विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील मागणी लक्षात घेऊन सेंद्रिय पद्धतीवर भर देत झेंडू, गुलाबाची लागवड केली. त्यामुळे चांगला दर मिळू लागला. स्वतःच्या फुलशेतीबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांची शेतीही प्रयोगशील करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू अाहे. 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील डाॅ. श्रीकांत गावंडे यांनी पळसगाव (ता. वसमत) शिवारातील दीड एकर शेतीमध्ये फुलशेतीचे विविध प्रयोग सुरू केले आहेत. विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील मागणी लक्षात घेऊन वर्षभर दर्जेदार झेंडू फुलांचे उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. डाॅ. श्रीकांत गावंडे यांची मूळ गावी पोटी (ता. मंगळूर पीर, जि. वाशीम) येथे ४० एकर शेती आहे. त्यांचे वडील सुधारकरराव गावंडे यांनी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी म्हणून शासकीय सेवेत नोकरी केली. अाता ते निवृत्त झाले आहेत. आई अलका गावंडे गृहिणी आहेत. डाॅ. गावंडे २०११ पासून वसमत (जि. हिंगोली) येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी प्रा. दीपाली गावंडे या पातूर (जि. अकोला) येथील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागात कार्यरत आहेत.

डाॅ. गावंडे यांच्या वडिलांना शेतीची आवड आहे; परंतु शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांची विविध ठिकाणी बदली होत गेली, त्यामुळे त्यांना शेती करता आली नाही. वडिलांची शेती करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी डाॅ. श्रीकांत गावंडे यांनी २०१३ मध्ये वसमतजवळ असलेल्या पळसगाव शिवारात दीड एकर शेतजमीन खरेदी केली. सुरवातीच्या काळात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी शेजारील शेतकऱ्यांकडून पाणी विकत घेऊन झेंडू फुलांची लागवड केली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी कूपनलिका घेतली. गेल्या चार वर्षांपासून ते झेंडू फुलांचे उत्पादन घेत आहेत. जून, आॅक्टोबर अाणि फेब्रुवारीमध्ये झेंडू लागवड केली जाते. डाॅ. गावंडे दर रविवारी, तसेच सुटीच्या दिवशी पूर्णवेळ शेतावर असतात. त्यांच्या पत्नी दीपाली यासुद्धा रविवार तसेच सुटीच्या दिवशी पातूर येथून शेतावर येतात. गुलाब, अॅस्परॅगसची लागवड डाॅ. श्रीकांत गावंडे यांनी यंदा उन्हाळ्यात पुणे येथून गुलाबाची रोपे आणली. सोबत अॅस्परॅगस स्पिंजरीची (२ हजार रोपे) रोपे आणल्यानंतर त्यांचे चांगले संगोपन केले. रोपे उन्हाळ्यात आणल्यामुळे स्वस्त दरात उपलब्ध झाली. परिणामी लागवड खर्च कमी झाला. यंदा जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर लागवड केली. सप्टेंबर महिन्यापासून फुले निघण्यास सुरवात झाली. सध्या प्रतिदिन सरासरी ८ किलो फुले मिळतात. नांदेड येथील मार्केटमध्ये प्रतिकिलो ८० रुपये दराने फुलांची विक्री केली जाते. एका महिन्यानंतर २० किलो फुलांचे उत्पादन अपेक्षित आहे.          पुष्पगुच्छ बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅस्परॅगसची, तसेच बांधावर रातराणीच्या ८०० रोपांची लागवड केली असून, ते दोन महिन्यांत विक्रीसाठी येणे अपेक्षित आहे. डेलिया सारख्या शोभिवंत फुलांची लागवडदेखील ते करत असतात.  गुलाब आणि झेंडू आंतरपीक  डॉ. गावंडे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने फुलशेती करण्यावर भर देतात. आजवर झेंडूची सलग पद्धतीने लागवड केली जायची, परंतु यंदा त्यांनी गुलाबामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतले आहे. जमीन तयार करून जुलै महिन्यामध्ये गुलाबाची आठ फुटांवर लागवड केली. गुलाबाच्या दोन ओळींमध्ये चार फुटांवर झेंडूची लागवड केली. झेंडूच्या दोन झाडांमधील अंतर एक फूट ठेवले आहे. सरळ रेषेत लागवड केल्यामुळे झाडांची संख्या जास्त बसली, तण नियंत्रण करणे सोपे झाले, हवा खेळती राहत असल्यामुळे झाडांची चांगली नैसर्गिक वाढ झाली. त्यामुळे फुलांची संख्या तसेच आकारात वाढ झाली. लाल, पिवळा, नारंगी रंगाच्या झेंडूची त्यांनी लागवड केली आहे.        गुलाबामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होते. रोग अाणि किडींच्या नियंत्रणासाठी वनस्पतींच्या अर्काची फवारणी ते करतात. झाडांची वाढ योग्य राहण्यासाठी रासायनिक खते वापरण्यापेक्षा दहा दिवसांतून एकदा २०० लिटर जीवामृत गाळून ठिबक सिंचन संचाद्वारे दिले जाते. वर्षातून दोनवेळा बायोडायनॅमिक्स पद्धतीने तयार केलेल्या खतांचा वापर केला जातो. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचन संचाद्वारे सकाळी किंवा सायंकाळी पाणी दिले जाते. 

विविध ठिकाणच्या  बाजारपेठांत विक्री झेंडू तसेच अन्य फुलांचा तोडा सकाळी ६ ते ९ किंवा सायंकाळी ३ ते ६ या वेळेत केला जातो. त्यासाठी मजुरांची मदत घेतली जाते. क्रेटमध्ये तसेच पोत्यांमध्ये पॅकिंग करून नांदेड, अकोला, अमरावती, पुणे, जालना येथील फुलांच्या मार्केटमध्ये खासगी ट्रॅव्हल्सद्वारे, तसेच कधी स्वतःच्या वाहनाने फुले पोचवली जातात. अकोला येथील मार्केटमध्ये ते स्वतःच्या वाहनामध्ये फुले घेऊन जातात. नांदेड येथील मार्केटमध्ये फुले नेण्यासाठी शेजारचे शेतकरीदेखील मदत करतात. झेंडूच्या फुलांना वर्षभरात सरासरी प्रतिकिलो २० ते २५ रुपये दर मिळतो. एक एकरमध्ये वर्षाकाठी खर्च वजा जाता दोन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.   शेतकऱ्यांना मार्गदर्शन गावंडे यांनी एक एकर शेती करार पद्धतीने घेऊन त्याठिकाणी ऊस लागवड केली आहे. गावंडे पळसगाव शिवारातील शेतकऱ्यांना फुलशेतीसोबतच अन्य पिकांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देत असतात. त्यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. पाण्याची गरज पडल्यास शेजारच्या शेतकऱ्यांना कूपनलिकेचे पाणी देतात. शेतकरीसुद्धा डाॅ. गावंडे यांना शेतीकामे, बाजारपेठेत फुले पोचविण्यासाठी मदत करतात. डाॅ. गावंडे यांनी अापल्या महाविद्यालयामध्ये सेंद्रिय शेती जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसोबतच हळद, ऊस पीक लागवडीची माहिती ते देतात.         डाॅ. गावंडे दर रविवारी शेतावर असताना परिसरातील शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनाबाबत मागदर्शन करतात. हळद उत्पादक तालुका असलेल्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. आगामी काळात सेंद्रिय शेतीतील गुलाबापासून गुलकंदनिर्मिती, तसेच मधुमक्षिका पालन उद्योग सुरू करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

- डाॅ. श्रीकांत गावंडे, ८६६८४१७४२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com