पंडागे कुटुंबाची भाजीपाला शेतीत कुशलता

पारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला) येथील गजानन पंडागे कुटुंबाने वांगी, भेंडी आणि मिरची पिकांमधून भाजीपाला शेतीची वाट धरली आहे. त्यातून ते चांगले अर्थार्जन करू लागले आहेत. हलक्या प्रतीच्या व उताराच्या जमिनीवर त्यांनी भाजीपाला शेतीला पसंती दिली आहे.
Grading of each product gives it a good price in the market.
Grading of each product gives it a good price in the market.

पारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला) येथील गजानन पंडागे कुटुंबाने वांगी, भेंडी आणि मिरची पिकांमधून भाजीपाला शेतीची वाट धरली आहे. त्यातून ते चांगले अर्थार्जन करू लागले आहेत. हलक्या प्रतीच्या व उताराच्या जमिनीवर त्यांनी भाजीपाला शेतीला पसंती दिली आहे. दर्जेदार उत्पादन घेत बाजारपेठेत आपल्या मालाला त्यांनी ओळख तयार केली आहे. अकोला जिल्ह्यात कानशिवणी येथे गजानन पंडागे कुटुंबाची शेती आहे. त्यांची शेतीतील वाटचाल संघर्षाची राहिली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे वडिलोपार्जित कोरडवाहू शेती होती. त्यातून  कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढेही उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे दुसऱ्यांकडे मोलमजुरीला जाण्याची वेळ यायची. मुले लहान होती. कुटुंबात राबणारे गजानन एकटेच होते. साधारणपणे सन २००० नंतर त्यांनी शेतात विहीर खोदून बागायती शेती सुरू केली. शेतीला नवी दिशा मिळाली. मुले मोठी झाली तसे त्यांचेही  शेतीकामाला साह्य मिळू लागले. आज नारायण व उत्तम हे दोघे मुलगेच शेतीकामांचे सर्व नियोजन, व्यवस्थापन सांभाळतात. भाजीपाला शेती  पंडांगे कुटुंबाची आज भाजीपाला हीच मुख्य शेती झाली आहे. वांगी असो वा भेंडी किंवा मिरची हा सर्व शेतमाल ते अकोला येथील बाजारपेठेत विकतात. जुलैपासून विक्रीचे सुरू झालेले चक्र ऑक्टोबरपर्यंत सरू राहते. वांग्यांना असलेली चकाकी, ताजेपणा यामुळे व्यापाऱ्यांची तसेच ग्राहकांची देखील पहिली पसंती मिळते. मालात सातत्याने दर्जा टिकवण्याचे काम पंडांगे यांनी केले आहे. ते सांगतात की आमच्या शेतातील वांगी बाजारात नेहमीच भाव खातात. दरवर्षी एक एकरात लागवड करीत असतो. एकरी सुमारे एकहजार ते पंधराशे क्रेटपर्यंत उत्पादन मिळते. प्रति क्रेटमध्ये १६ किलो वांगी सामावतात. आजवरचा अनुभव पाहता जुलै-ऑगस्टमध्ये दरवर्षी चांगला दर मिळतो. दिवाळीपर्यंत तो  चांगला राहतो. किमान ४०० ते कमाल ७०० रुपयांदरम्यान प्रति क्रेटला विक्री होते. सरासरी ५०० रुपये दर पदरात पडतो.  संपूर्ण कुटुंब राबते शेतात पंडागे यांच्या कुटुंबाचे वैशिष्ट्य़ म्हणजे शेतातील सर्व कामे घरच्याच व्यक्ती करतात. वडील, दोन मुले, व महिला सदस्य मिळून स्वतः भाजीपाल्याची काढणी करतात. व्यवस्थितपणे माल तोडून त्याची प्रतवारी केली जाते. सर्वांनी कामे वाटून घेतल्यामुळे कामांचा भार हलका होतो. दर्जेदार मालच बाजारात पाठवला जात असल्याने व्यापारी व साहजिकच ग्राहकांचीही पसंती राहते. जनावरांना पुरविले पाणी सन २००३ पासून कानशिवणी येथे गौरक्षण संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी असलेल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण होती. संस्थेने पाच ते सहा ठिकाणी बोअर घेतले. परंतु कुठेही पाणी लागले नाही. पाण्यासाठी जनावरांची होणारी परवड पाहून पंडागे यांनी स्वतः आपल्या विहिरीवरून पाण्याची व्यवस्था केली. दररोज ४००  ते ५०० जनावरांना ते पाणी पुरवायचे. अनेक वर्षे त्यांनी या प्रकारे मुक्या जनावरांची सेवा केली. जनावरांच्या आशीर्वादामुळे आपले नशीब पालटले. आज १७ एकर क्षेत्राचा मी मालक असून संपूर्ण बागायती शेती असल्याचे ते कृतार्थ भावनेने सांगतात. बीजोत्पादनाची जोड सतरा एकरांपैकी गावाला लागून असलेल्या तीन एकरात भाजीपाला तर उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, तूर आदी पिके घेण्यात येतात. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते खरिपात बीजोत्पादन कार्यक्रम राबवीत आहेत.  रब्बीत ते हरभऱ्याचे बीजोत्पादन घेतात. या प्रयोगामुळे बाजारपेठेत मालविक्रीपेक्षा मालाला अधिक दर व बोनसही मिळतो असे पंडागे सांगतात.  भेंडी व मिरचीचे उत्पादन  भेंडीचे पीकही चांगल्या पद्धतीने पैसा मिळवून देऊ शकते असा आपला अनुभव असल्याचे पंडागे सांगतात. एकरात एक दिवसाआड तोडणी होते. महिनाभरात किमान २५ ते ३० क्विंटल भेंडी निघते. बाजारात किलोला २० ते २५ रुपयांचा सरासरी दर मिळतो. तीन ते चार महिने तोडणी चालते. यंदा अर्ध्या एकरात मिरचीची लागवड केली आहे. वाळवून विक्री करण्याचा उद्देश आहे. भेंडीचा मशागतीपासून ते तोडणी, वाहतुकीपर्यंतचा उत्पादन खर्च ६८ हजार ५०० रुपये येतो. अन्य भाजीपाल्याचा खर्चही किमान तेवढा वा त्याहून अधिक येतो.  संपर्क-  उत्तम गजानन पंडागे, ९७३०३७४९६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com