अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके महत्त्वाची : प्रा. डॉ. होसे नलास्को

अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके महत्त्वाची : प्रा. डॉ. होसे नलास्को
अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके महत्त्वाची : प्रा. डॉ. होसे नलास्को

पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५ जुलै या काळात पार पडले. त्यामध्ये स्पेन येथील ट्रेडकॉर्प इंटरनॅशनल या कंपनीचे संशोधन संचालक प्रा. डॉ. होसे नलास्को यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. त्यांनी वनस्पतींवरील अजैविक ताण व त्यावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या जैवसंप्रेरकाची माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानाचा हा थोडक्यात गोषवारा...  महाराष्ट्रातील शास्त्रोक्त शेती करणाऱ्या व ती समजून घेणाऱ्या द्राक्ष बागायतदारांमुळे येथील द्राक्षशेतीचा विकास झाला आहे. या सतत धडपडी वृत्तीचा शेतकऱ्यांनाही फायदा होतो. शेती करताना निसर्गातील बदलाच्या अनुषंगाने तयार होणारे अजैविक ताण व त्यातील व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. विशेषतः योग्य जैवसंप्रेरकांचा वापर करणे आणि त्यातून विकसित झालेली प्रायमिंग ही संज्ञा याचा अभ्यास करू.  अबायोटिक स्ट्रेस अर्थात ताण व्यवस्थापनामध्ये तापमान, आर्द्रता, ऑक्सिजन, सामू, पोत, जल व्यवस्थापन, पाण्याचा दर्जा, कीडनाशकांच्या फवारण्या, खत व्यवस्थापन अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यातूनच फायदेशीर शेतीकडे जाता येईल. पाऊस किती व केव्हा पडेल याचा भरवसा नसतो. अशा अभरवशाच्या वातावरणामध्येही आपल्याला द्राक्ष शेती फायद्याची करावी लागते. मी मूळ मुद्द्याकडे येतो. बागेत कॅल्शिअमची कमतरता दिसल्यास झाडाला वरून कॅल्शिअम देण्याचा उपाय तुम्ही करता. पण अनेक वेळा अजैविक ताणामुळेही कॅल्शिअमची कमतरता झाडाला भासू शकते. म्हणजेच केवळ बाहेरून कॅल्शिअम देण्याची उपाययोजना चुकीची ठरू शकते.  हितकारक जिवाणू, जमिनीची चांगली रचना, अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले असल्यास शेती फायद्याची होते. पण ते चित्र सर्वत्र नाही. मका, गहू, सोयाबीन, ज्वारी याचे उत्पादन जगभर घटते आहे. कारण, एकट्या गहू पिकात ७० टक्के नुकसान हे अजैविक ताणामुळे होत आहे. त्याला प्रतिबंध घालणाऱ्या जैव उत्प्रेरकांचा व्यवसाय आता जगभर वेगाने वाढत आहे.  अजैविक ताणाच्या स्थितीमध्ये झाडाची सर्व शक्ती या ताणांशी लढण्यातच निघून जाते. केवळ तग धरून राहणे या एकाच बाबीवर वनस्पतीचे लक्ष केंद्रित होते. परिणामी त्याला फुले, फळे कमी व लहान येतात किंवा येतच नाही. त्यातील शर्करेचे प्रमाण कमी राहते. अगदी तीव्र स्थितीमध्ये पानगळ करते. अजैविक ताणांच्या स्थितीमध्ये चांगले जैव उत्प्रेरक झाडाला दिल्यास होणारे नुकसान निश्चितच कमी होऊ शकते.  हवामानातील घटकांमध्ये बदल होताच झाडावर प्रभाव पडतो. जैविक व भौतिक बदल झाडात होतात. त्यातून गुणवत्ता घटून उत्पन्नात घट येते हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम कमतरता झाल्यास बागेत गळ होते. प्रकाश संश्लेषणात अडचणी येतात. शेतकऱ्यांना आता केवळ द्राक्षच नव्हे, तर सर्व पिकांची शेती करताना मातीचा सामू, विद्युत सुवाहकता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, ऑक्सिजन, झाडाचे आरोग्य, समन्वय व विरोधक, प्रकाश, खत-पाणी व्यवस्थापन, उत्पादन व त्यानुसार द्यावयाच्या खतमात्रा यांचा विचार केला पाहिजे; कारण या सर्वांचा परिणाम पिकावर होतो.  बहुतेकांचा विचार खत देणे म्हणजे मुळाजवळ अन्न इथेच थांबतो. पण माझ्या मते पीक पोषण म्हणजे झाडातील अन्नद्रव्यांची वहन व्यवस्था, वनस्पतीमधील शरीरविज्ञानाला उत्तम ठेवणारे व्यवस्थापन हे होय. त्यासाठी मुळांना ह्युमिक ॲसिड व अमिनो ॲसिड ही जैव उत्प्रेरके द्यावी लागतात. ती पोषणाचे उत्तम काम करतात. तुम्हाला अनेकदा झाडातील विकृती अन्नद्रव्याच्या अभावामुळे आल्याचे वाटते, पण तसे नसते. पिकाच्या शरीरशास्त्रीय विकृतीतून ही स्थिती तयार झालेली असते. सुरवातीला नमूद केलेले ८-१० घटक पाहावेत. तसेच अगदी मातीचा पीएच कमी झाल्यास किंवा ऑक्सिजन कमतरतेमुळेदेखील ही विकृती तयार होऊ शकते. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही.  वनस्पतिजन्य जैवसंप्रेरकांमध्ये पदार्थ किंवा सूक्ष्मजीव असतात. संप्रेरके पुढे पिकांवर किंवा मुळांच्या कक्षेत वापरली जाताच झाडाला ती नैसर्गिक उत्तेजन देतात. परिणामी ग्रहण क्षमता, अन्नद्रव्य कार्यक्षमता वाढून अजैविक ताणांच्या विरोधात लढण्याची क्षमता वाढते. आमच्या एबीक संस्थेने याबाबत मूलभूत संशोधन केले आहे. जैवसंप्रेरकांचे प्रकार अनेक आहेत. पण, इथे मी फक्त समुद्री शेवाळ अर्क व अमिनो आम्ल या पुरतेच बोलतो आहे.  द्राक्ष बागांमध्ये ऑक्टोबर छाटणीनंतर झाडाच्या मुळात ऊर्जा नसते. या वेळा ठिबकमधून ह्युमिक व अमिनो आम्ल वापरणे योग्य ठरेल. १२० दिवसांच्या द्राक्ष उत्पादनाच्या कालावधीत बागेत ०-३०, ३०-६०, ६०-९० आणि ९०-१२० दिवस अशा चार खंडांत या संप्रेरकांचा वापर केल्यास बाग सशक्त होते. उत्पादन चांगले येते.  समुद्री शेवाळाचा वापर का करावा?  जैवसंप्रेरकांचा वापर करताना त्यात अस्कोफिलम नोडोझम या समुद्री शेवाळाचा वापर का करावा, हे आपण जाणून घेऊ. हे शेवाळ समुद्राच्या पाण्यात दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जाते व पुन्हा ते वर येते. पाण्याखाली आणि वर जाण्याचा त्याला ताण पडतो. या ताणाशी लढण्यासाठी त्यात पॉलिफिनॉल्स असतात. ते कणखर ॲन्टिऑक्सिडंट आहे. त्यातील मॅनिटॉल्स हे पेशीद्रव्याला मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होण्यापासून रोखतात. पाण्यातील क्षार व त्यापासून येणाऱ्या सुकव्याला रोखून द्रव्याभिसरणामध्ये सुसंगती ते आणते. त्यातील अल्जिनेटस् हे मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवते. यामुळे ते जगातील सर्वांत चांगले समुद्री शेवाळ आहे. ते समुद्रातून काढून बाटलीत भरेपर्यंत पॉलिफिनॉल्सचा नाश होतो, हेदेखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. त्यासाठी शीतपद्धतीने अर्क काढलेले अस्कोफिलम नोडोझम समुद्री शेवाळ वापरावे. ताण आणि पीक शरीरशास्त्र हा गुंतागुंतीचा विषय आहे. मात्र, ताण येण्याच्या आधीच समुद्री शेवाळ अर्क वापरल्यास त्याचे परिणाम अतिशय चांगले दिसून येतात.  चांगले अमिनो आम्ल कसे ओळखावे?  संप्रेरकांमध्ये अमिनो आम्ले ही महत्त्वाची असून, ती झाडांच्या प्राथमिक चयापचायच्या क्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रकाश संश्लेषण व श्वसन, वहन, प्रथिनांची निर्मिती, अन्नद्रव्याचे एकत्रीकरण करतात. अमिनो आम्लाचे पुढे पेप्टाईड होते. त्यातूनच पुढे प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने झाडाला गरजेची असतात.  चांगले संप्रेरक तयार करणे किंवा त्याचे उत्पादन हीदेखील गुंतागुंतीची प्रक्रिया असते.  चांगल्या झाडावर अति ताण आल्यास झाड मरते. मात्र, ताण कमी असल्यास ते प्रतिकार करते. ताण पडल्यास झाड अमिनो आम्ल बनवत नाही. झाडात प्रकाश संश्लेषणही होणार नाही. त्याला ऊर्जा मिळणार नाही. प्रथिनांची निर्मितीही ते थांबवते. जैवसंप्रेरके अशा वेळी गरजेची असतात. शेतकऱ्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा, असे मला मनापासून वाटते.  प्रायमिंग म्हणजे काय  शेतीत पिकांवर ताण येण्याच्या आधी समुद्री शेवाळ अर्क वापरल्यास फायदे होतात. या प्रक्रियेला प्रायमिंग ही संज्ञा वापरतात. प्रायमिंगमुळे पानातून सिग्नल पाठवले जातात. ताण बसल्यावर वृद्धत्वाच्या अवस्थेला उशीर होतो. उत्पादन जास्त घटत नाही. त्यामुळे जैवसंप्रेरकांवर आधारित ‘प्रायमिंग’ उपचार पद्धतीचा अभ्यास शेतकऱ्यांना करावा लागेल. प्रायमिंग संकेतासाठी थोड्या थोड्या फरकाने संप्रेरकांचा वापर करावा. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला असतो.  जैवसंप्रेरके कोणती 

  •  वनस्पतिजन्य घटक 
  •  समुद्रीशेवाळ अर्क 
  •  अमिनो आम्ल 
  •  सूक्ष्मजीव 
  •  ह्युमिक आम्ल 
  • अजैविक ताणाशी कसे लढाल?  

  •  जमिनीला अन्नद्रव्य देऊ नका; पिकाला द्या. 
  •  झाडाच्या भोवती सर्वांगीण विचार करावा . 
  •  बाहेरून अन्नद्रव्यापेक्षा पिकाच्या आतील अन्नद्रव्यांचे संरक्षण महत्त्वाचे. 
  •  नफ्यातील शेतीसाठी वनस्पतीचे शरीरविज्ञान जाणून घ्या. 
  •  अन्नद्रव्यातून येणाऱ्या विकृती अनेकदा पिकाच्या शरीरशास्त्रीय विकृतीतून झालेली असते. 
  •  जैवसंप्रेरके कसे काम करतात, त्यात काय घटक आहे, ते काम करतात हे जाणून घ्या. 
  •  शेतात जैव संप्रेरके किती ,कधी वापरायचे हे महत्त्वाचे ठरते. 
  •  ताणाच्या परिस्थितीचा अभ्यास करा आणि बागेत वेळोवेळी अंदाज घ्या. 
  •  पीक ओळखा, ताण विरोधात लढण्यासाठी तयार राहा, प्रतिबंधात्मक उपाय करा. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com