घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये काटेकोरपणा हवाच 

घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये काटेकोरपणा हवाच 
घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये काटेकोरपणा हवाच 

सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील तात्यासो रामचंद्र नागावे यांनी केवळ ऊस पिकावर अवलंबून न राहता त्याला अन्य हंगामी पिकांची जोड दिली. हरभरा, सोयाबीन आणि गहू बिजोत्पादनातून उत्पन्नाचे प्रमाण वाढवले आहे. अशा पिकांतून मिळणाऱ्या निव्वळ नफ्यातून शेतीमध्ये सुधारणा केल्या. आपले कुटुंब, मुलांच्या भविष्यासाठी विमा आणि शिक्षणासाठी योग्य आर्थिक नियोजन करतात. त्यांच्या मते, घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये काटेकोरपणा असलाच पाहिजे.  सांगली जिल्ह्यात पलूस-सांगली रस्त्यावर वसगडेपासून पश्‍चिमेला चार किलोमीटरवर खटाव लागते. या गावाच्या वेशीवरून वाहणाऱ्या येरळा नदीला पावसाळ्यात पाणी असते, तर दुसऱ्या बाजूला बारमाही कृष्णा नदी आहे. परिणामी सिंचनासाठी पाण्याची कमतरता नसल्याने ऊस पिकासह द्राक्षे शेतीही परिसरात बहरली आहे. हिरवाईने नटलेल्या गावातील तात्यासो नागावे यांच्याकडे एकूण सात एकर शेती आहे. त्यांच्या छोट्या कुटुंबात आई श्रीमती सुमन, पत्नी निता, मुलगी निकिता आणि मुलगा नीतेश यांचा समावेश आहे. निकिता डिप्लोमाचे शिक्षण घेत असून, नीतेश आठवीत आहे. तात्यासाहेबांचे वडील रामचंद्र यांच्या आजारपणासोबतच काही तांत्रिक कारणांमुळे नागावे कुटुंबीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. अशा स्थितीत सन २००१ पासून तात्यासाहेबांकडे शेतीची धुरा आली. त्या वेळी उसाचे उत्पादन एकरी केवळ ४० ते ४५ टन इतकेच होते. उत्पादनाबरोबरच उत्पन्न वाढवल्याशिवाय पर्याय नाही, हे तात्यासाहेबांच्या लक्षात आले. त्यांनी हळूहळू शेतीमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली.  गावात सहकारी पाणी पुरवठा योजना असून, या संस्थेत सुमारे ३०० सभासद आहेत. पाणी शेतापर्यंत येत असले तरी अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने तात्यासाहेब समाधानी नव्हते. उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना त्यांनी भेटी देत रुंद सरी, रोपे पद्धतीने लागवड, तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार खतमात्रा अशी नवीन पद्धती व तंत्राचा वापर सुरू केला. त्यातून उसाचे एकरी ४० टन उत्पादन वाढवत ७० ते ७५ टनांपर्यंत नेले. ऊस पिकाबरोबर सोयाबीन, गहू, आणि हरभरा ही हंगामी पिकेही ते घेऊ लागले. मात्र, या शेतीमालाच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार असल्याने अपेक्षित दर मिळतीलच याची खात्री नसते. यावर उपाययोजना काय करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावर प्रक्रिया करण्याचा विचार पुढे आला. मग त्यासाठी कृषी विभाग, कसबे डिग्रज येथील संशोधन केंद्र, यासह प्रगतिशील शेतकऱ्यांकडे जाऊन मार्गदर्शन घेतले.  भविष्यासाठी तयारी सुरूच...  गावामध्ये पाणी भरपूर असले तरी अधिक पाण्यामुळे अनेकांना क्षारपडीचा धोका भेडसावत आहे. ती स्थिती आपल्याकडे येऊ नये, यासाठी तात्यासाहेबांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे खास जल व्यवस्थापनाचे धडे गिरवले. तिथे फळबागा पाहिल्यानंतर भविष्यात शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग फायदेशीर ठरू शकते, हे त्यांच्या लक्षात आले. आपल्या परिसरासाठी फळांच्या योग्य जातींची निवड करण्याच्या उद्देशाने नागावे यांनी थेट डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ गाठले. तिथे आंबा, नारळ, चिक्कू यासह विविध फळझाडांची माहिती घेतानाच प्रक्रिया उद्योगही पाहिले. प्रयोगादाखल घराशेजारी आंबा, चिक्कू यांची झाडे लावली आहेत.  शेतात काटेकोरपणा...  शेती करताना पिकांचा उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हे त्यांना विविध प्रगतिशील शेतकऱ्यांना भेटी दिल्यानंतर लक्षात आले. घरगुती आयुष्यामध्ये ज्या प्रमाणे काटकसर उपयुक्त ठरते, त्याच प्रमाणे शेतीमध्ये काटेकोरपणा अवलंबला पाहिजे. कोणाही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानंतर कोणत्या गोष्टीमुळे खर्च वाचला, याकडे तात्यासाहेबांचे बारकाईने लक्ष असते. हीच काटकसर आमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरली आहे. 

  • पिकांची फेरपालट 
  • पाचट व्यवस्थापन 
  • मजूरी खर्च कमी करण्यासाठी तणनाशके व यंत्राचा वापर 
  • नियमित माती परीक्षण करून, त्याप्रमाणे खतांचे नियोजन केले जाते. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल 
  • सेंद्रिय कर्ब सुमारे एकच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न. त्यासाठी गांडूळ खत, अन्य सेंद्रिय खतांचा वापर 
  • ताग, धैंचा या हिरवळीच्या खतांची लागवड 
  • वळले बीजोत्पादनाकडे  उसाची उत्पादकता वाढली, उत्पादन खर्चात वाढ होत गेली. उसाला दर त्या मानाने वाढला नाही. परिणामी तात्यासो २०१५ पासून बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. कृषी विभागासह बियाणे उत्पादक कंपन्यांसाठी ते सोयाबीन, गहू व हरभरा यांचे बीजोत्पादन करतात. सोयाबीन बियाणे विक्री विदर्भ, मराठवाडा, पुणे, सांगली येथील शेतकऱ्यांना करतात. परिणामी बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर मिळून ७० ते ७५ टक्के नफा राहतो. हरभरा बियाणे ३० टक्के विक्री करतात, तर उर्वरित बाजारपेठेमध्ये विकले जाते.  नागावे यांची शेती व उत्पादकता 

  • पीक - क्षेत्र - एकरी उत्पादन 
  • आडसाली ऊस - ३ एकर - ७५ टन 
  • खोडवा ऊस -३ एकर - ४० टन 
  • सोयाबीन (केडीएस ३४४ आणि केडीएस ७२६ हे वाण) - २ एकर - १८ क्विंटल 
  • गहू (कुदरत, युस-४२८) - १ एकर- २० क्विंटल 
  • हरभरा (दिग्विजय) - १ एकर - १२ क्विंटल 
  • दुभती जनावरे ः दोन 
  • दररोज ६ लिटर दूध, प्रति लिटर ४५ रुपये याप्रमाणे रतीब 
  • शेतीतून मिळणाऱ्या रकमेची खर्चनिहाय विभागणी 

  • शिक्षणासाठी ः १५ ते २० टक्के 
  • आरोग्य आणि घर खर्चासाठी ः १५ टक्के 
  • पुढील हंगामातील पिकासाठी ः २० टक्के (ही रक्कम सोसायटी कर्ज किंवा बियाणे विक्रीतून उभी करतात.) 
  • नवीन छोट्या अवजारांची खरेदी, दुरुस्ती इ. ः ५ टक्के 
  • मुलांचा विमा वार्षिक हप्ता ः ७ हजार रुपये 
  • तात्यासो यांचा विमा वार्षिक हप्ता ः १ लाख ७ हजार रुपये 
  • शेतातील अन्य कामे, मजुरी आणि खते ः २० ते २५ टक्के 
  • दरवर्षी थोडे थोडे पैसे साठवून सुमारे अर्धा ते एक तोळा सोने खरेदी करतो. ही माझी एक प्रकारची गुंतवणूकच आहे. सन २००५ चा आमच्या गावात महापुराचे पाणी आले नव्हते. मात्र, या वर्षी महापुरामुळे आमच्या गावात पाणी शिरले. शेतीचे फारसे नुकसान झाले नसले तरी अशा आपत्ती कधीही येऊ शकतात. त्यावेळी पैशांची गरज भासते. अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी सोने उपयुक्त ठरते. ते तारण ठेवून कर्ज मिळते किंवा अतिनिकडीच्या स्थितीतच सोने मोडून प्रसंगातून बाहेर पडता येते. गेल्या दहा ते बारा वर्षात अशा प्रकारे साठवलेल्या पैशातून नवीन विहीर खोदली आहे. पाइपलाइन करून संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणल्याचे तात्यासाहेबांनी सांगितले.  तात्यासो रामचंद्र नागावे,  ८६६८९५८१९५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com