पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले अर्थकारण

अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड देत दर दिवशी, दरमहा उत्पन्नाची सोय करण्याचा प्रयत्न सिंधी काळेगाव (ता. जि. जालना) येथील दत्ता आप्पाजी गिराम या युवा शेतकऱ्याने केला आहे.
 पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले अर्थकारण
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले अर्थकारण

अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड देत दर दिवशी, दरमहा उत्पन्नाची सोय करण्याचा प्रयत्न सिंधी काळेगाव (ता. जि. जालना) येथील दत्ता आप्पाजी गिराम या युवा शेतकऱ्याने केला आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन अशा उद्योगातून आपले आर्थिक गणित बसवले आहे. अल्पभूधारक असूनही पूरक उद्योगातून विकास साधण्याचा दत्ता गिराम यांचा प्रयत्न नक्कीच आश्वासक आणि अन्य शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.  दत्ता आप्पाजी गिराम यांच्याकडे चार एकर शेती. कुटुंबात चार व्यक्ती. वडील आप्पाजी गिराम यांनी आपल्या कष्टातून २०० मोसंबी, २०० पेरू आणि पन्नास नारळ अशी फळबाग उभी केली होती. हंगामी शेतीसह त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. मात्र, २०१२ च्या दुष्काळात मोसंबी व पेरूची बाग टिकाव धरू शकली नाही. नारळाचीही २५ झाडेही गतप्राण झाली. या तडाख्यानंतर निव्वळ शेतीतून चरितार्थ भागवणे शक्य होणार नसल्याचे ध्यानात घेऊन आधी थोडाबहूत दुग्ध व्यवसाय करणारे दत्ता गिराम कुटुंबीय शेळीपालनाकडे वळले.

अशी झाली शेळीपालनाला सुरुवात २०१५ मध्ये आप्पाजी गिराम थोडे आजारी पडले. शेळीचे दुधाने आरोग्य चांगल राहते, असा सल्ला त्यांना एकाजनाने दिला. ते निमित्त ठरून गिराम कुटुंबीयांनी एक उस्मानाबादी शेळी विकत घेतली. २०१५ जानेवारीमध्ये घेतलेल्या या एका शेळीपासून चार शेळ्या वर्षभरात झाल्या. कुटुंबाची जबाबदारी पडलेल्या दत्ता गिराम यांना शेतीला पूरक म्हणून शेळीपालनात फायद्याची वाट दिसली.  ८० शेळ्यांपर्यंत मजल पहिल्याच वर्षी एका शेळीपासून तीन बोकड व एक पाठ असे चार पिल्ले मिळाली. याच दरम्यान त्यांनी खरपुडी कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांना शेळ्यांचा आहार, आजार, संगोपन या व्यवस्थानाच्या पद्धतीसोबतच बाजारातील दर, अधिक फायदा मिळण्यासाठी करावयाच्या बाबी यांची माहिती मिळाली. त्याचा उपयोग आपल्या घरगुती शेळीपालनामध्ये करून घेऊ लागले. शेळीपालनाकडे आर्थिक उत्पन्नांचे साधन म्हणून काळजीपूर्वक पाहू लागले. बोकड विकण्यायोग्य झाल्यानंतर विक्री करणे, घरच्या कळपातील शेळ्यांची संख्या वाढवत नेणे हा उपक्रम सुरू केला. दुसऱ्या वर्षी त्यांच्याकडे शेळ्यांची संख्या १२, तिसऱ्या वर्षी २७, तर चौथ्या वर्षी थेट ८० पर्यंत पोचली. बोकड विकणे आणि शेळ्या ठेवणे या नियोजनातून आज घडीला त्यांच्याकडे ३० शेळ्या शिल्लक आहेत. शेळीपालनातील महत्त्वाचे 

  • अर्धबंदिस्त शेळीपालन
  • ब्रीड वाढीसाठी जमुनापरी जातीच्या बोकड व शेळीची खरेदी. वर्षभरापूर्वी घराच्या दोन्ही बाजूने शेळ्यांसाठी सुमारे एक लाख रुपये खर्चून शेड उभारणी केली.
  • वजनानुसार प्रती बोकड पाच हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. सोयाबीन अधिक मका भरडचा खाद्य म्हणून वापर
  • दरवर्षी मिळते ७ ते ८ ट्रॉली खत. त्याचा वापर शेतामध्ये करत असल्याने सुपीकता टिकण्यास मदत झाली. त्याच प्रमाणे सेंद्रिय खतांवरील खर्चात सुमारे २० हजार रुपयांची बचत झाली.
  • शेळ्यांच्या चाऱ्याची शेतीतून सोय
  • कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शेळीपालनाचा शास्त्रोक्त विस्तार सुरू केल्यानंतर शेळ्यांच्या आहारासाठी आवश्यक चारा पिकांचे नियोजन शेतीमध्ये केले आहे. त्यात एक एकरमध्ये ज्वारी आणि सुमारे सव्वा एकर क्षेत्रामध्ये मेथी घास, नेपियर, मका या पिकांची लागवड केली जाते.  साहजिकच शेळ्यांच्या चाऱ्यावरील खर्चात सुमारे ३ लाख रुपये इतकी बचत साधत आहे. 
  •     कुक्कुटपालनाची जोड पुरक व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते, याचा अनुभव आल्यानंतर दत्ता गिराम हे कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील विषय विशेषज्ञांच्या सातत्याने संपर्कात राहू लागले. त्यातून त्यांनी देशी कोंबडीपालनाविषयी माहिती मिळाली. २०१६ मध्ये त्यांनी आपली पत्नी सौ. नंदा आणि आई सौ. रमाबाई यांच्यासोबत कुक्कुटपालनाचे एक प्रशिक्षण घेतले. शेळीपालनासोबत आर.आय. आर. व राजश्री या जातीच्या ६० कोंबड्या पाळण्यास सुरुवात केली. प्रशिक्षणामुळे कुक्कुटपालनातील मूलभूत तत्त्वे चांगल्या प्रकारे ज्ञात झाल्याने गिराम कुटुंबीयांनी या देशी कोंबडीपालनाचा विस्तार केला आहे. किमान ५० कोंबड्यांपासून पिल्ले मिळवणे, १०० ते १५० पर्यंत संख्या वाढवल्यानंतर काही प्रमाणात विक्री करणे, असे चक्र सुरू केले. हे चक्र वर्षभर सुरू राहते. मागणीनुसार पाचशे ते सहाशे रुपये प्रति नग प्रमाणे मांसल कोंबड्यांची विक्री केली जाते. अडचणींच्या वेळी या कोंबडीपालनाचा कुटुंबीयांना मोठा आधार होतो.      कुक्कुटपालनाची शेतीला जोड देणाऱ्या दत्ता गिराम यांच्याकडील कोंबड्याची अंडी दर दिवशी प्रतिअंडी दहा रुपये दराने किमान दहा अंडी विक्रीतून गिराम कुटुंबाला दररोज शंभर रुपये मिळण्याची सोय झाली आहे. महिन्याला साधारण ३००० रुपये मिळत असल्याने कुटुंबाचा दैनंदिन खर्च अंडी विक्रीतून भागत असल्याचे दत्ता गिराम सांगतात.

      शेतीचा अर्थार्जनाला हातभार जवळपास कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग इ. पिके दत्ता गिराम घेतात. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग पिकाच्या संवेदनशील अवस्थेत सिंचनासाठी होतो. त्यामुळे उत्पादनामध्ये काही प्रमाणात शाश्वतता आली आहे. गेल्या काही वर्षांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यातून तुलनेमध्ये ८ ते १० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळत नव्हते. शिवाय शेळ्यांसाठी चारा लागवडीसाठी कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे.     कुटुंबाचे निव्वळ आर्थिक उत्पन्न   शेळीपालनातून वार्षिक २ लाखांपर्यंत उत्पन्न.    कोंबडी पालनातून वार्षिक ५० हजार रुपयांचे उत्पन्न.  शेतीतून ऐंशी हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न. 

    दत्ता गिराम हे युवा शेतकरी असून, आपल्या अल्प शेतीला पूरक उद्योगाची जोड दिली आहे. त्यातून त्यांच्या कुटुंबाचे अर्थकारण बळकट होत आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना केव्हिकेतील प्रशिक्षणाचा लाभ झाला आहे. दरमहा ४ बोकड विक्रीचे ध्येय ठेवून शेळीपालनाचा व्यवसाय केल्यास ग्रामीण युवकांना दरमहा पगाराएवढे म्हणजे २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.  - डॉ. हनुमंत आगे, ७३५००१३१८१ (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना.)  

    शेततळ्यात सोडले मत्स्यबीज शेतीसाठी संरक्षित पाण्याची सोय म्हणून मार्च २०१९ मध्ये शेततळे अस्तरीकरण करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आलेल्या जोरदार पावसाने शेततळे भरून घेतले. त्यात मत्स्यपालन करण्याचे नियोजन केले. पाण्यामध्ये योग्य प्रमाणात शेणखत टाकून प्लवंगाची निर्मिती करून घेतली. या तुडुंब भरलेल्या शेततळ्यात जवळपास सात डबे मत्स्यबीज सोडले. कटला, मृगल आणि सायप्रणस जातीचे हे मत्स्यबीज एका डब्यामध्ये साधारण २५० इतके बसते. प्रती डबा सुमारे २०० रुपये इतका खर्च आला. शेततळ्यात मासे प्रत्येकी अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे झाले आहे. त्यांची विक्री अद्याप सुरू केली नसली तरी शाश्वत उत्पन्नाची खात्री आली आहे. सध्या माशांना प्रतिकिलो २४० ते २६० रुपये इतका दर आहे.       

     : दत्ता आप्पाजी गिराम, ९७३०६८०१२०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com