agriculture stories in marathi agromoney aarthkatha, Pandirang Kokate (khadangali, Sinnar, Dist. Nashik) | Page 2 ||| Agrowon

हंगामनिहाय पिकांचा नव्या तंत्रज्ञानाशी घातला मेळ

मुकुंद पिंगळे
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

नाशिक जिल्ह्यातील खडांगळी (ता. सिन्नर) येथे पंढरीनाथ कोकाटे यांच्या घरामध्ये ‘आजोबांपासून ते नातवंडापर्यंत’ सर्वजण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करतात. हंगामनिहाय कमी कालावधीची पिके, नवे तंत्रज्ञान यांचा मेळ साधता शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्तम नियोजनासोबतच उत्पादन खर्चातील बचतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शेतीमालाची थेट विक्री यामुळे कोकाटे कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे. या अर्थकारणाला दुग्धव्यवसायाची उत्तम साथ मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील खडांगळी (ता. सिन्नर) येथे पंढरीनाथ कोकाटे यांच्या घरामध्ये ‘आजोबांपासून ते नातवंडापर्यंत’ सर्वजण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करतात. हंगामनिहाय कमी कालावधीची पिके, नवे तंत्रज्ञान यांचा मेळ साधता शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्तम नियोजनासोबतच उत्पादन खर्चातील बचतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शेतीमालाची थेट विक्री यामुळे कोकाटे कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे. या अर्थकारणाला दुग्धव्यवसायाची उत्तम साथ मिळत आहे.

‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ ही शिकवण लक्षात ठेवत पंढरीनाथ कोकाटे व कुटुंबीयांनी कृषी क्षेत्राची कास धरली आहे. पंढरीनाथ कोकाटे यांचे एकत्रित कुटुंब असून, वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. पंढरीनाथ यांची दोन मुले मधुकर व सुधाकर हे प्रामुख्याने शेतीची जबाबदारी पाहतात. घरातील सर्व सदस्यांच्या विचाराने हंगामाचे नियोजन केले जाते. या नियोजनातील कामे ही व्यक्तिनिहाय विभागली जातात. शेतीतील प्रत्येक काम हे वेळेवरच झाले पाहिजे, हा ध्यास असतो.

कामाचे विभाजन :
एकत्रित कुटुंबामध्ये अनेक वेळा एखादे काम कोणी करायचे, यावरून वाद होता. मात्र, कोकाटे यांच्या घरामध्ये शेतीसंबंधात प्रमुख कामांची जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या कौशल्यानुसार ही कामे वाटली गेल्याने व्यवस्थापनामध्ये अधिक सुलभता आली आहे.

कामाचे नियोजन असे :

 • शेतीसिंचन व्यवस्थापन व फवारण्या : मधुकर कोकाटे
 • खते व कीडनाशकांची खरेदी, दुग्धव्यवसाय : सुधाकर कोकाटे
 • इतर तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन व कामकाजाच्या नोंदी : पांडुरंग कोकाटे

पीक लागवडीपूर्व नियोजन :

 • सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व हवामानाचा अंदाज घेऊन हंगामाचे नियोजन
 • उपलब्ध असलेल्या भांडवलाचा अंदाज घेऊन कामकाजाची आखणी केली जाते.
 • पीक लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण खर्चाचा अंदाज घेऊन भांडवलाची उपलब्धता केली जाते.
 • प्रामुख्याने कमी उत्पादन खर्च असलेली, कमी कालावधीच्या पिकांवर भर.
 • अपेक्षित उत्पादन खर्चामध्येही बचत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी नवीन तंत्र, पद्धत, आवश्यक ते बदल केले जातात.
 • शेतीकामासाठी उपलब्ध संसाधनाचा अधिक वापर होतो.

शेतीभांडवलाची उपलब्धता :

प्रत्येक हंगामानंतर पिकांच्या काढणी झाल्यानंतर त्याचा आढावा घेतला जातो. त्यामध्ये लागवडीपासून विक्री होईपर्यंतच्या प्रत्येक खर्चाचा समावेश असतो. तो भागवल्यानंतर कृषी निविष्ठांची सर्व देयके, मजुरी खर्च व कौटुंबिक खर्च यांची तजवीज केली जाते. यातून उरणारी रक्कम पुढील हंगामासाठी शेती भांडवल म्हणून बाजूला टाकण्यात येते. केवळ शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीपूरक दुग्धव्यवसाय उभारला आहे.

खर्चाच्या कपातीचे नियोजन :

 • लागवडपूर्व मशागत, पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची बहुतांश शेतीकामे प्राधान्याने घरीच केली जातात.
 • मजुरांची गरजेनुसार मदत घेतली जाते.
 • शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारला असून, रासायनिक खतांवरील खर्चात बचत झाली आहे.
 • पिकांच्या वाढीसाठी आवश्यक जीवामृतांसह विविध निविष्ठा घरीच बनवल्या जातात.
 • रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर अत्यल्प व अत्यावश्यक असल्यास केला जातो.
 • शेतमालासाठी स्वतःची वाहतूक व्यवस्था आहे.

किफायतशीर शेतीतील जमेच्या बाजू :

 • बाजारपेठेतील मागणीनुसार पिकांचे नियोजन
 • त्यातही कमी कालावधीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड.
 • प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर. एकरी खर्च १० ते १२ हजार. फायदा तणनियंत्रण, ओलावा टिकून राहतो, पाणी कमी लागते. पांढरी माशी, फुलकिडे नियंत्रणास मदत होते.
 • भाजीपाला पिकांमध्ये प्राधान्याने जैविक घटकांचा अधिक वापर. उदा. व्हर्सिटीसिलियम, मेटारायझीम, स्युडोमोनास, ट्रायकोडर्मा, निंबोळी अर्क.
 • पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाते.
 • कीड नियंत्रणासाठी मर्यादित रासायनिक कीटकनाशकांचा वापर.
 • नव्याने येत असलेल्या तंत्रज्ञानाचा, पद्धतींचा अभ्यास सातत्याने केला जातो. त्यातील काय वापरायचे, काय नाही, याचाही विचारपूर्वक निर्णय घेतला जातो.
 • शेती उपयुक्त यंत्रे व अवजारे स्वमालकीच्या असल्यामुळे बहुतांश शेतीकामे घरीच केली जातात.

थेट ग्राहक विक्री :

शेतमाल उत्पादित केल्यानंतर टरबूज यांसारख्या फळांची थेट विक्री केली जाते. त्यासाठी उत्पादन हाती आल्यानंतर वाहतूक साधनाद्वारे शहरात आणून कुटुंबातील व्यक्ती स्वतः विक्री करतात. व्यापारी, दलाल या साखळीवरील अवलंबित्व कमी केले आहे. यातून मिळणारा परतावाही अधिक आहे. या अधिकच्या परताव्यातून स्वतःसह सर्व भावंडांच्या शैक्षणिक खर्चाची तजवीज होत असल्याचे पांडुरंग अभिमानाने सांगतो. उत्तम दर मिळण्यासाठी काढणीपश्चात हाताळणी व प्रतवारीला प्राधान्य असते. थेट विक्रीमुळे शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळतात, तसेच ग्राहकालाही रास्त दरामध्ये उत्तम माल मिळतो. असा दोघांचाही फायदा असल्याने थेट विक्रीमध्ये अधिक काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

नफा तोट्याचा समन्वय :

शेती म्हटले की नफा आणि तोटा असतोच. मात्र, अनेक शेतकऱ्यांना नोंदी नसल्यामुळे नक्की किती नफा झाला किंवा तोटा झाला, हेच लवकर लक्षात येत नाही. सरधोपटपणे काम करण्याऐवजी प्रत्येक हंगामाअंती पिकाचे चांगले उत्पादन मिळाले, उत्पन्नही हाती आले, तरच त्या पिकात सातत्य ठेवले जाते. आवश्यकता भासल्यास त्वरित पिकांमध्ये बदल केला जातो. यासाठी कमी कालावधीच्या पिकांकडे त्यांचा कल आहे. एखाद्या पीक परवडले नाही तर तो हंगामदेखील वाया जातो. अशा वेळी शेती व्यवसायाला आर्थिक पाठबळ म्हणून दूध व्यवसाय उपयुक्त ठरतो. यामुळे नफ्या तोट्याचा समन्वय साधत आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यात कोकाटे कुटुंबीयांना यश आले आहे.

नवी पिढीकडून कृषी तंत्रज्ञानाची कास :

कोकाटे यांच्या घरातील तिसरी पिढी मधुकर यांचा मुलगा पांडुरंग हा सध्या कृषी तंत्रज्ञान पदविकेच्या अंतिम वर्षाला, तर तुषार हा कला शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. सुधाकर यांची मुले साक्षी आणि ज्ञानेश्वर अनुक्रमे ८ वी, दहावीमध्ये शिकत आहेत. ही सर्व मुले शिक्षण सुरू शेतीमध्ये मदत करतात. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचे प्रयोगही शेतीत करतात. या सर्व मुलांनी कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करण्यापेक्षा शेतीचीच धुरा हाती घ्यावी, असे कुटुंबीयांना वाटते. शेती, शेतीपूरक व्यवसाय यामध्ये एकीच्या बळावर प्रतिष्ठा मिळवता येते, हे कोकाटे कुटुंबीयांनी आपल्या कष्टातून व कृषी तंत्रज्ञानातून सिद्ध केले आहे.

शेतीत घेतली जाणारी विविध पिके :

खरीप : मका, सोयाबीन, गाजर, भुईमूग, टोमॅटो, बाजरी.
रब्बी : लाल कांदा, गहू, कोबी, कांदा.
उन्हाळी : टरबूज, मका, चारा पिके

शेतातील सध्या उभी पिके व नियोजन असे आहे ः

 • कोबी १.५ एकर, गाजर १ एकर, टोमॅटो १ एकर, बाजरी १ एकर, सोयाबीन १.५ एकर, मका १ एकर, चारापिके ०.५ एकर, भुईमूग ०.५ एकर.
 • सध्या गाजर काढणी सुरू असून, ती आणखी २० ते २५ दिवस चालेल. सध्या १० क्विंटल उत्पादन निघाले असून, त्याला ३ ते ३.५ रु. प्रति क्विंटल दर मिळाला. आणखी २० क्विंटल उत्पादन अपेक्षित. उत्पादन खर्च १५ हजार रुपये.
 • नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर अखेर - कोबी उत्पादन सुरू होईल. दरवर्षी एकरी २० ते २५ टन उत्पादन मिळते. उत्पादन खर्च ५० हजार रुपये झाला असून, सरासरी दर १० रुपये प्रतिकिलो मिळेल, अशी अपेक्षा.
 • डिसेंबरनंतर कोबीच्या १.५ एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी कांदा लागवडीचे नियोजन आहे. गाजर क्षेत्रामध्ये विश्रांतीनंतर १५ ते २० जानेवारीपर्यंत खरबूज आणि कलिंगडाची मल्चिंगवर लागवड करणार आहे.
 • खरबूज व कलिंगड लागवड, व्यवस्थापनासाठी एकरी ७० ते ८० हजार रु. खर्च अपेक्षित. तो कोबी पिकाच्या उत्पादनातून भागवला जाईल. गतवर्षी एकरी ३२ टन उत्पादन मिळाले होते. त्याला थेट विक्रीमुळे १२ ते १४ रुपये प्रति किलो दर मिळाला होता. यावर्षीही इतकेच उत्पादन अपेक्षित आहे.
 • जुलैमध्ये टोमॅटोची एक एकरवर लागवड केली होती. त्याच्या लागवड व्यवस्थापनासाठी १.४० लाख रुपये खर्च झाला. त्यातून २००० क्रेट उत्पादन मिळाले असून, प्रति क्रेट ४०० रुपये सरासरी दर मिळाला आहे. (क्रेटमध्ये साधारण २० किलो टोमॅटो.)

पैशांचा अचूक विनियोग :

 • शेती उत्पन्नातून मिळणाऱ्या रकमेतून पुढील पीक घेण्यासाठी भांडवलाची उपलब्धता.
 • दरवर्षी मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची तरतूद केली जाते.
 • आर्थिक बचतीतून गतवर्षी दीड एकर जमिनीची खरेदी केली.

दुग्धव्यवसायाचा मोठा आधार :

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गोपालन केले जाते. गेल्या वर्षीपर्यंत आमच्याकडे २५ गायी होत्या. गत वर्षी सुमारे ५ लाख रुपये खर्चून आधुनिक गोठा तयार केला आहे. त्यामध्ये मिल्किंग मशिन, कुट्टी यंत्र, जनावरांसाठी मॅट अशी अत्याधुनिक व्यवस्था केली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या १२ जर्सी गाई आहेत. त्यातील दोन गाई दुधावर असून, प्रति दिन २५ लिटर दूध संकलन केंद्रावर विकले जाते. सामान्यतः दुग्धव्यवसायातील उत्पन्नावर आमचा कौटुंबिक खर्च भागवला जातो. मात्र, गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे वेगळी तरतूद करावी लागणार आहे.
 

दरवर्षी ८ एकर क्षेत्रातून ४ ते ५ लाख रुपये इतका निव्वळ उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट असते. मात्र, या वर्षी उन्हाळ्यामध्ये कोरड्या दुष्काळाची स्थिती, तर सध्या सततच्या पावसामध्ये रब्बी पिके धोक्यात आहेत. तरीही या वर्षाअखेर किमान २ लाख रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
- पांडुरंग कोकाटे, ७९७२९८५८९७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पारंपरिक शेतीला सिट्रोनेलाची साथपारंपरिक शेतीला पर्याय म्हणून कारंजा (जि.वाशीम)...
घरगुती प्रक्रिया उद्योगातून केले...परभणी जिल्ह्यातील माखणी (ता. पूर्णा) येथील...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
कमी खर्चीक व्यवस्थापन तंत्रातून...औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका मोसंबीसाठी...
भाजीपाला,कलिंगडाची प्रयोगशील शेतीखांबाळे (ता.वैभववाडी,जि.सिंधुदुर्ग) येथील मंगेश...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
रानवनस्पती, पाने, फुलांतून आदिवासींना...भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण, भाद्रपद महिन्यात...
लॉकडाउनमध्ये शिक्षकांनी माळरानावर...सांगली ः कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाने...
महिला शेतकरी कंपनीने दिली शेती, ग्राम...शेती आणि पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी रिहे (...
हापूस आंब्याचे, गरेदार काजूचे दर्जेदार...कोकणातील गणेशोत्सवाचे स्वरूपच दिवाळीसारखे असते....
 ‘व्हिजन’ सह शेतकरी कंपनीची दमदार वाटचाललोणी काळभोर (जि. पुणे) येथील अमोल जाचक या ‘एमबीए...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
पुरीभाजीसाठी सण-उत्सवात काशीफळाला हमखास...श्रावण व गणेशोत्सवाच्या काळात काशीफळाच्या (लाल...
नोकरी सांभाळत शेतीतही केले 'करिअर'सांगली जिल्ह्यातील आसद (ता. कडेगाव) येथील संदीप...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
गणपतीसाठी पान मोदक, गौरींसाठी गोविंदविडाअलीकडील काळात बदलती बाजारपेठ, ग्राहकांची आवड व...
काथ्या, काजू प्रक्रिया उद्योगात...कठोर परिश्रम आणि संकटांना ताकदीने तोंड देत इळये (...
सोळा वर्षांपासून सेंद्रिय प्रमाणित...वडने (जि.धुळे) येथील दिलीप रामदास पाटील आपल्या...
अवघ्या दीड गुंठ्यातील पानमळ्यानं फुलवलं...साठीच्या आसपास वय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त...